जून २०२१ – साप्ताहिक सभा
‘बिगरी ते मॅट्रीक’
सादरकर्ते - रो. राजेंद्र उत्तूरकर
दिनांक - ३ मे २०२१
तीन मेला झालेल्या साप्ताहिक सभेत प्रसिद्ध साहित्यिक श्री.पु.ल. देशपांडेलिखित ‘बिगरी ते मॅट्रीक’ या एकपात्री कथन-अभिवाचन प्रयोगाचा कार्यक्रम पार पडला. सादरकर्ते होते रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोचे रो.राजेंद्र उत्तूरकर....
भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतनमध्ये प्राचार्य असलेल्या रो.राजेंद्र उत्तूरकर यांना व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमीवर काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. समन्वयक रो.अनिल गोगटे यांनी त्यांची ओळख करून देताना सांगितलं की, रो.राजेंद्र उत्तूरकर हे एक बहुरंगी आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. ते उत्तम कथाकथनकार आहेत. टेलीफिल्म, ॲडफिल्म, सूत्रसंचालन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. १९९८पासून ते भारती कला अकादमीच्या संचालकपदी काम करत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामासाठी भारती विद्यापीठाचा ‘सेवागौरव’ पुरस्कार त्यांना मिळाला आहे. रो.राजेंद्र उत्तूरकर हे गिर्यारोहकही आहेत. आत्तापर्यंत शंभराहून जास्त गड-किल्ल्यांवर त्यांनी भ्रमंती केली आहे.
श्री.पु.ल. देशपांडेलिखित ‘बिगरी ते मॅट्रीक’ ही अतिशय प्रसिद्ध कथा रो.राजेंद्र उत्तूरकर यांनी सादर करून आजच्या नकारात्मक आणि तणावाच्या परिस्थितीतून थोड्यावेळासाठी तरी बाहेर पडायला मदत केली. त्यांच्या रंजक आणि नाट्यमय भाषाशैलीमुळे त्यांनी कथेतली वेगवेगळी पात्रं जिवंत करून रसिकांसमोर उभी केली. रंगभूमीवर काम करत असल्यामुळे कथेतल्या वेगवेगळ्या पात्रांचे संवाद, स्पष्ट आणि शुद्ध उच्चारांमुळे अतिशय उत्तम रितीनं सगळ्यांपर्यंत पोहोचत होते. साक्षात पुलंनी सादर केलेली ही कथा बहुतेक सगळ्यांनीच ऐकली आहे तरीही रो.राजेंद्र उत्तूरकर यांच्या कथाकथनाची शैली स्वतंत्र तरीही परिणामकारक आहे याची अनुभूती जसजसं कथाकथन पुढे सरकत होतं तसतशी येत होती.
रो.अतुल अत्रे यांनी रो.राजेंद्र उत्तूरकर यांच्या संवाद साधण्याच्या कलेचं, देहबोलीचं कौतुक केलं. सगळ्यांना मनभरून आणि मनमोकळं हसवल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथतर्फे त्यांचे आभार मानले आणि निखळ मनोरंजनाचा हा कार्यक्रम संपन्न झाला.
श्रद्धांजली विशेष सभा
दिनांक - १० मे २०२१
एप्रिल महिन्यात रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथच्या पाच सदस्यांना देवाज्ञा झाली. दहा मे या दिवशी साप्ताहिक सभेत या पाच सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथच्या सदस्यांनी विशेष शोकसभा आयोजित केली होती.
विश्वनाथ उर्फ विसुभाऊ गोडबोले नेहमी उत्स्फुर्तपणे क्लबच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेत असत. काश्मीर सद्भावना कॅम्पबद्दल त्यांना झालेला आनंद त्यांनी रो.प्रे.सुदर्शन नातू यांच्याकडे व्यक्त केला होता तसंच योग्य ती काळजी घेण्याबद्दलही सांगितलं होतं. सदैव हसतमुख, उत्साही, मदतीला तत्पर, दिलखुलास विनोदी स्वभाव, सामाजिक कार्यात पुढे असणारे, चिरतरुण, दागिन्यांच्या डिझाइन्सची उत्तम जाण असणारं असं हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व काळानं आपल्यापासून हिरावून नेलं अशा शब्दांत रो.प्रे.सुदर्शन नातू, रो.भाउसाहेब कुदळे, पी.पी.रो.दादासाहेब बेंद्रे, रो.अनिल लोखंडे, रो.गोविंदराव पटवर्धन, रो.सुभाष देशपांडे, रो.विरेन शहा, रो.शाम कुलकर्णी, रो.अनिल सुपनेकर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
मेडिकल क्षेत्रातले डॉक्टर असल्यानं त्या आणि सगळ्यांच बाबतीतली मदत करायला सदैव तयार असे रो.नाना गोरे, त्यांच्या सेवाभावी वृत्तीसाठी कायम स्मरणात राहतील. आदिवासी भागात त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं आहे. त्यांच्या सेवाधाम ट्रस्टमार्फत आदिवासी समाजाच्या छोट्याछोट्या अडचणी त्यांनी वेळोवेळी दूर करायचा प्रयत्न केला आहे. सर्वसमावेशक स्वभाव, उत्साही आणि सामाजिक भान असलेले कल्पक डॉक्टर रो.नाना गोरे यांची उणीव कायम जाणवत राहील अशा शब्दांत रो.प्रे.सुदर्शन नातू, पीपी.रो.दादासाहेब बेंद्रे, रो.भाउसाहेब कुदळे, रो.गोविंदराव पटवर्धन, रो.सुभाष देशपांडे, रो.विरेन शहा, रो.शाम कुलकर्णी, रो.अनिल लोखंडे, रो.अनिल सुपनेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यशस्वी उद्योजक, स्पष्ट विचार आणि परखड मतं असणारे रो.श्रीकांत पोफळे यांच्या निधनाबद्दल सगळ्या सदस्यांनी दुःख व्यक्त केलं. क्लबच्या अनेक सदस्यांबरोबर त्यांचं मैत्रीचं, मार्गदर्शकाचं नातं होतं. यशस्वी व्यवसायिक असले तरी त्यांची आध्यात्मिक बैठक पक्की होती. नवीन उद्योजकांना मदत करायला ते कायम तयार असत या शब्दांत त्यांना रो.भाउसाहेब कुदळे, रो.गोविंदराव पटवर्धन, रो.विरेन शहा, रो.शाम कुलकर्णी, रो.अनिल सुपनेकर या सगळ्यांनी श्रद्धांजली वाहिली.
ॲन शैलजा महाजन आणि ॲन शैला ताम्हणकर या दोन ॲन्सना या विशेष शोकसभेत सगळ्या सदस्यांनी श्रद्धांजली वाहिली. या दोघीही रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथच्या जुन्या आणि जाणत्या सदस्या होत्या. रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथच्या ॲन्सचा भिशी कार्यक्रम असो किंवा क्लबचा एखादा सामाजिक उपक्रम असो रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथच्या सर्व कार्यक्रमात त्यांचा उल्लेखनीय सहभाग असायचा. घर-संसार, सणवार, पै-पाहुणा, कुळाचार, व्रतवैकल्यं हे सगळं सांभाळून दोघीही सतत हसतमुख, प्रसन्न आणि उत्साही असायच्या. अशा ॲन्समुळेच क्लबमधला आनंद आणि उत्साह टिकून असतो अशा भावना रो.अनिल सुपनेकर, रो.सुभाष देशपांडे, रो.गोविंदराव पटवर्धन, रो.प्रे.सुदर्शन नातू, पी.पी.रो.दादासाहेब बेंद्रे, रो.भाउसाहेब कुदळे, रो.शाम कुलकर्णी, रो.विरेन शहा, रो.अनिल लोखंडे यांनी व्यक्त केल्या. सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहून ही विशेष शोकसभा संपली.
‘काश्मीरचे अंतरंग’
रो. पीपी डॉ. सुधांशु गोरे
दिनांक - १७ मे २०२१
सतरा मे या दिवशी झालेल्या साप्ताहिक सभेत ‘काश्मीरचे अंतरंग’ हा विशेष कार्यक्रम सादर झाला. रो.प्रे.सुदर्शन नातू यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन या संस्थेनं आर्मी गुडविल स्कूलमध्ये कोणत्या कोणत्या सुधारणा करता येतील याची पाहाणी करण्यासाठी रो.डॉ.सुधांशू गोरे यांना पाठवलं होतं. त्यानिमित्तानं गोरे सरांनी तिथल्या काही छोट्या-छोट्या खेड्यांना भेटी दिल्या. सद्भावना मेडीकल कॅम्पच्या आधी एक महिना गोरे सर काश्मीरला या स्पेशल मिशनवर पोहोचले होते असं कार्यक्रमाची सुरुवात करताना रो.प्रे.सुदर्शन नातू यांनी सांगितलं.
१९ मार्च २०२१ ते २ मे २०२१ या काळात रो.डॉ.सुधांशू गोरे काश्मीरमध्ये होते. गुरेज सेक्टरमधल्या दावर इथली तसंच मछल सेक्टरमधल्या राघवन पोस्ट इथली आर्मी गुडविल स्कूल आणि आजुबाजुच्या शक्य त्या सगळ्या आर्मी गुडविल स्कूल्स कशा चालतात याचा अभ्यास करणं, ‘शिकणं आणि शिकवणं’ या गोष्टी सहज सोप्या कशा होतील, त्यांत अधिक सुधारणा कशा होतील याचा अभ्यास करणं हे काम रो.डॉ.सुधांशू गोरे यांनी केलं. मार्चमधल्या कडाक्याच्या थंडीत आणि बर्फात गोरे सर गुरेजला पोहोचले. काश्मीरमध्ये मार्च ते ऑक्टोबर या काळात शाळा पूर्ण क्षमतेने चालतात. विद्यार्थी पूर्ण संख्येनं उपस्थित असतात. याच काळात शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, पालक सभा यांचं आयोजन होतं. गुरेजमधल्या आर्मी गुडविल स्कूलच्या विद्यार्थांशी आणि पालकांशी गोरे सरांनी संवाद साधला. विद्यार्थांच्या तसंच पालकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काश्मीरमधल्या मुलांना योग्य प्रशिक्षणाची खूप गरज असल्याचं गोरे सरांना प्रकर्षानं जाणवलं. स्थानिक महिला भिशीच्या निमित्तानं एकत्र येतात, एकमेकींबरोबर संवाद साधतात. काश्मिरी कशिदाकारी त्यांना चांगली अवगत असल्याचं लक्षात येताच गोरे सरांनी त्यांना अर्थाजनाचा आणि गाव स्वयंपूर्ण करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे असं तर सुचवलंच पण त्यासाठी रोटरी क्लब त्यांना नक्की मदत करेल असंही सांगितलं.
काश्मीरमधली भौगोलिक स्थिती ही भारताच्या बाकीच्या प्रदेशांपेक्षा खूप वेगळी आहे. बहुतांश दुर्गम असा हा भूभाग आहे. बहुदा याच कारणामुळे काश्मिरी जनतेला त्यांचे प्रश्न हे इतर भारतीयांच्या प्रश्नांपेक्षा जास्त गंभीर आणि जटील आहेत असं वाटत राहातं. आपल्याला हव्या तशा सुविधा आणि अधिकच्या सवलती मिळत नाहीत ही त्यांची खंत गोरे सरांच्या लक्षात आली. वेगवेगळी उदाहरणं देऊन हा गैरसमज दूर करण्याचा गोरे सरांनी वेळोवेळी प्रयत्न केला. काश्मीरमध्ये आर्मी जवानांचा एवढा त्रास नाही जेवढा स्थानिक पोलिसांचा आहे हे स्थानिक काश्मिरी लोकांशी बोलताना समजलं. आर्मी आहे म्हणून शांतता आहे हे ऐकल्यावर गोरे सरांना इंडीअन आर्मीचा खूप अभिमान वाटला. काश्मिरी जनतेला सगळ्या गोष्टी वर्षांनुवर्षं आयत्या मिळाल्या आहेत त्यामुळे त्यांना श्रम करण्याची सवय नाही आणि त्यांची तशी तयारीही नाही. काश्मीरमध्ये अति मागासलेपणही नाही आणि अति पुढारलेपणही नाही... ही काही निरिक्षणं गोरे सरांनी नोंदवली. काश्मीरमधल्या वास्तव्यात भव्या चिक्कारा ही गोरे सरांबरोबर या उपक्रमात सहभागी झाली होती. तिचे वडील आर्मीत आहेत. वडील बरोबर नसताना पहिल्यांदाच एकट्यानी ती काश्मीरला गेली होती. या प्रवासात खूप गोष्टी शिकायला मिळाल्याचं तिनं सांगितलं. एक माणूस म्हणून प्रगल्भ करणारा असा हा अनुभव होता असं तिनं नमुद केलं.
वेळेच्या मर्यादेमुळे खूप काही ऐकायचं राहून गेलं आहे. हा कार्यक्रम अजून पूर्ण झाला आहे असं वाटत नाही तरी पुन्हा संधी मिळाल्यावर काश्मीरमध्ये शिक्षण क्षेत्रात आपण काय काम करू शकतो याबाबत आपण बोललं पाहिजे असं सांगून रो.मंदार पूर्णपात्रे यांनी रो.डॉ.सुधांशू गोरे यांचे आभार मानले आणि हा उद्बोधक कार्यक्रम संपन्न झाला.
एक्कावन्नावा वर्धापनदिन विशेष सभा
दिनांक - २५ मे २०२१
पंचवीस मे या दिवशी झालेल्या साप्ताहिक सभेत डॉ.विजया विपिन गुजराथी यांना रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथचं सदस्यत्व दिलं. रो.गोविंद पटवर्धन यांनी डॉ.विजया विपिन गुजराथी यांची औपचारिक ओळख करून दिली. डॉ.विजया विपिन गुजराथी आयुर्वेदिक वैद्य आहेत. त्या अनेक संस्थांमध्ये अधिकारी पदांवर कार्यरत आहेत. गेली अनेक वर्षं रोटरी क्लबबरोबर वेगवेगळ्या सामाजिक कार्यांत त्यांचा सक्रीय सहभाग आहे.
आधीपासून रोटरॅक्ट असलेल्या श्री.अधिक कदम यांच्या काश्मीरमध्ये सुरू असलेल्या उपक्रमांची, कार्याची सव्विस्तर ओळख रो.गोरे सरांनी करून दिली तसंच देश-विदेशातून त्यांना मिळालेल्या सन्मानांबद्दल, पुरस्कारांबद्दलही त्यांनी सांगितलं. या विशेष सभेत बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या संस्थापक, अध्यक्ष श्री.अधिक कदम यांना रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथचं ‘मानद सभासदत्व’ देऊन गौरवण्यात आलं. रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ आणि यातले सगळे सदस्य मला माझ्या कुटुंबासारखेच आहेत तसंच रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथमधले सगळे ज्येष्ठ सदस्य मला माझ्या आई-वडिलांच्या ठिकाणी आहेत या शब्दांत अधिक कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आपल्या मनावर राज्य करणारी सदाबहार गाणी रो.ह्रषिकेश बडवे यांनी रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथच्या एकावन्नाव्या वर्धापनदिनानिमित्त ‘ओठांवरची गाणी’ या कार्यक्रमातून सादर केली. एजी. रो. अभय जबडे यांनी कार्यक्रमाचं खुमासदार सुत्रसंचालन केलं. ‘तू सुखकर्ता तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता’ या गाण्यानी गणेशवंदन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुंबईचा जावई या सिनेमातलं ‘प्रथम तुज पाहता’, अवघाची संसार या सिनेमातलं ‘जे वेड मजला लागले’ अशा एकामागोमाग एक सुरेल गाण्यांनी कार्यक्रम रंगत गेला. अभंगसदृश ‘इंद्रायणी काठी’ हे गाणं, ‘गुंतता हृदय हे’, ‘रम्य ही स्वर्गाहुनी लंका’ अशी शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी रो. ह्रषिकेश बडवे यांनी खूप समरसून सादर केली. या कार्यक्रमाची संकल्पना रो.मंदार पूर्णपात्रे आणि रो.प्रे.सुदर्शन नातू यांची होती तर ध्वनी आणि तंत्र साहाय्य हेमंत उत्तेकर यांचं होतं. ‘मास्टरपीस’ हा स्वतंत्र संवादिनीवादनाचा कार्यक्रम करणाऱ्या आणि या विषयावर लेखन करणाऱ्या दिप्ती कुलकर्णी यांनी संवादिनी संगत केली तर संगीत अलंकार पदवीप्राप्त, आकाशवाणीचे मान्यवर तबलावादक अभिजित जायदे यांनी तबल्याची उत्तम साथ दिली. स्वतः रो.ह्रषिकेश बडवे हे चार्टड अकाउंटंट असून लहानपणापासून संगीत शिकत आहेत. अनेक संगीत नाटकांत त्यांनी काम केलं आहे. शास्त्रीय संगीताचा मानबिंदू असलेल्या ‘सवाई गंधर्व महोत्सवा’त आपली कला सादर करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. ‘सुरत पिया की न छिन बिसरायी’ या अनेक रागांत आणि अनेक तालांत बांधलेल्या गाण्यानी या अभिरुचीपूर्ण मैफिलीची सांगता झाली.
श्री. अधिक कदम आणि डॉ.विजया गुजराथी या दोन सदस्यांचं रो.रवींद्र प्रभुणे यांनी रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथमध्ये स्वागत केलं. अप्रतिम निवेदन, सुश्राव्य गायन आणि सुरेल साथसंगत लाभलेल्या या सांगितिक मेजवानीला ‘वाह!’ या एका शब्दातच खरी दाद द्यायला हवी असं सांगून रो.रवींद्र प्रभुणे यांनी सगळ्या कलाकारांचे आभार मानले आणि ही साप्ताहिक सभा संपन्न झाली.
अष्टपैलू लेखिका - सौ.शकुंतला फडणीस
सादरकर्त्या - रो. लीना अनिल गोगटे
दिनांक - ३१ मे २०२१
३१ मे या दिवशी झालेल्या साप्ताहिक सभेत ‘अष्टपैलू लेखिका - सौ.शकुंतला फडणीस’ हा कार्यक्रम सादर झाला. सौ.शकुंतला फडणीस यांची कन्या, रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथच्या ॲन आणि रोटरी क्लब ऑफ हेरिटेजच्या रो. लीना गोगटे यांनी कार्यक्रमाचं संयोजन केलं. सौ.शकुंतला फडणीस विनोदी लेखिका होत्या. विनोदी कथा, विविध लेख, बालकविता आणि बालनाट्य या क्षेत्रांत त्यांचं भरीव योगदान आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आचार्य अत्रे पुरस्कारप्राप्त प्रा.मिलिंद जोशी तसंच प्रसिद्ध साहित्यिक आणि समीक्षक डॉ.निलिमा गुंडी यांचा विशेष सहभाग होता.
रो.मंदार पूर्णपात्रे यांनी दोन्ही मान्यवरांचं आणि रो. लीना गोगटे यांचं स्वागत केलं. सौ.शकुंतला फडणीस यांची ओळख करून देताना रो.मंदार पूर्णपात्रे यांनी सांगितलं की, सौ.शकुंतला फडणीस एक उत्तम विनोदी कथालेखिका होत्या. बालसाहित्य लेखन, व्यंगचित्रांवर आस्वादक लेखन, कथाकथन, भाषणलेखन या क्षेत्रांतही त्यांनी खूप काम केलं आहे. त्यांना उत्कृष्ट बालसाहित्यासाठी राज्य शासनाचे तीन पुरस्कार तसंच अनेक खासगी पुरस्कार मिळाले आहेत.
अनेक वर्षांपासूनच्या सौ.शकुंतला फडणीस यांच्या स्नेही प्रसिद्ध साहित्यिक आणि समीक्षक डॉ.निलिमा गुंडी यांनी सौ.शकुंतला फडणीस यांच्या आठवणी सांगितल्या. साहसकथा, बालनाट्यलेखन, बालकविता यांबरोबरच विविध भाषा व्यवहारांवरचं विनोदी लेखन, त्यासाठी भाषेवर असलेली पकड, अचुक निरिक्षण हे सौ.शकुंतला फडणीस यांचे गुणविशेष त्यांनी नमुद केले. सौ.शकुंतला फडणीस यांच्या वेगवेगळ्या पुस्तकांचा उल्लेख करून त्यांतलं कायकाय भावलं, आवडलं ते डॉ.निलिमा गुंडी यांनी सांगितलं. असं आनंदी, उत्साही, खेळकर आणि हसरं व्यक्तिमत्त्व आपल्यात नाही याबद्दल डॉ.निलिमा गुंडी यांनी हळहळ व्यक्त केली.
सौ.शकुंतला फडणीस यांच्याकडे चौकटीबाहेरचं, परिघाबाहेरचं जग दाखवण्याचं कसब होतं. त्यांनी वर्मावर बोट ठेवणारी पण हास्य निर्माण करणारी विनोदनिर्मिती केली असं प्रा.मिलिंद जोशी यांनी सांगितलं. त्यांनी निरपेक्ष भावनेनं साहित्यनिर्मिती केली म्हणूनच त्या समाधानी होत्या आणि या समाधानामुळेच त्या कायम प्रसन्न असायच्या. कुशल गृहिणी असूनही जगात काय चाललं आहे याचा त्या कायम कानोसा घ्यायच्या. त्यांच्या या गुणाचा बालसाहित्य क्षेत्रात काम करताना त्यांना खूप उपयोग झाला. चांगल्या कामासाठी पाठीवर कौतुकाची थाप देणाऱ्या, निखळ स्नेह असणाऱ्या वडीलधाऱ्या व्यक्तीची उणीव कायम जाणवेल अशा भावना प्रा.मिलिंद जोशी यांनी व्यक्त केल्या.
आपल्या आईकडून कथाकथनाचा वारसा घेतलेल्या रो. लीना गोगटे यांनी वाघ-वाघीण आणि दोन बालमित्र या सौ.शकुंतला फडणीस यांच्या दोन कथा वाचिक अभिनयातून सादर केल्या. सौ.शकुंतला फडणीस या उत्तम संयोजक, सहचर, सचिव होत्याच पण या भूमिका पार पाडतानाच एक वक्तशीर, कडक शिस्तीची आईही होत्या. शुद्धलेखनातला अचुकपणा, एकूणच लेखनातला टापटीपपणा, नीटनेटकेपणा हे त्यांचे गुण वाखाणण्यासारखे होते. पुण्यासारख्या मध्यवर्ती शहरात राहत असल्यामुळे घरात सतत पाहुण्यांचा, नातेवाइकांचा राबता असला तरी घरातल्यांची योग्य ती काळजी घेण्याचं कसब त्यांना अवगत होतं असं रो.लीना गोगटे यांनी सगळ्यांना सांगितलं. क्षौर्य देसाई, अवंती आणि मीरा प्रभुमिराशी, प्रिशा पटवर्धन, अस्मी प्रभुणे आणि मुक्ता देशपांडे या ॲनेट्सनी कार्यक्रमात सौ.शकुंतला फडणीस यांच्या काही बालकविता सादर केल्या.
मराठी साहित्य विश्र्वात सर्जनशील पतीपत्नींच्या जोड्या बघायला मिळतात. श्री.शि.द.फडणीस आणि सौ.शकुंतला फडणीस हे असंच एकमेकांना पुरक जोडपं... आज सौ.शकुंतला फडणीस यांच्या कर्तृत्वाच्या वेगळ्या पैलूंची ओळख सगळ्यांना झाली. रो.लीना गोगटे यांच्याबरोबरच प्रा.मिलिंद जोशी आणि डॉ.निलिमा गुंडी यांनीही सौ.शकुंतला फडणीस यांची स्वभाववैशिष्ट्यं आपल्यासमोर ठेवली असं सांगून आयपीपी अभिजित जोग यांनी प्रा.मिलिंद जोशी, डॉ.निलिमा गुंडी आणि रो.लीना गोगटे यांचे रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथच्या वतीनं आभार मानले. सौ.शकुंतला फडणीस यांच्या बालकविता सादर केलेल्या सगळ्या ॲनेट्सचेही त्यांनी मनापासून कौतुक केलं आणि हा कार्यक्रम संपन्न झाला.
साप्ताहिक सभा
तुमचा लेख आवर्जून द्या...
समन्वयक - एके / यामिनी पोंक्षे