जून २०२१ – क्लबकारी
कल, आज और कल
रो. प्रे. सुदर्शन नातू
रोटरीच्या मित्रमैत्रिणींनोऽ बघता-बघता हे वर्ष संपत आलं. हा आपल्या बुलेटीनचा या वर्षातला शेवटचा अंक. या अंकामध्ये प्रेसिडेंटनं काहीतरी लिहावं असं बुलेटीन कमिटीचे चेअरमन रोटेरिअन योगेश यांनी सुचवल्यावर विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की, वर्षभर घडलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचा वृत्तान्त आपण सर्वांना देत आलो पण हे सर्व किंवा काही विशिष्ट कार्यक्रम ठरवताना त्यामागे बऱ्याच घटना आणि काही गमतीजमती घडतात. त्या आपल्यापुढं येतातच असं नाही त्यामुळं या रोटरी वर्षातल्या काही ठळक उपक्रमांचं वेगळेपण मी थोडक्यात विशद करणार आहे.
कोविड-१९मुळं या वर्षीचे कार्यक्रम ठरवताना नेहमीप्रमाणे आपण टीम एकत्र करून त्यावर विस्तारानं चर्चा करून मग कार्यक्रमाची रूपरेषा आखणी करू शकलो नाही त्यामुळं कार्यक्रम ठरवताना या वेळी वेगळ्याप्रकारे ग्रुपबरोबर चर्चा करावी लागली. फोनद्वारे किंवा झूमद्वारे मिटिंग्ज घ्याव्या लागल्या आणि ते वाटलं तेवढं सोपं नव्हतं. आपण एकदा भेटून ठरवू आणि पुढं जाऊ असं नुसतं म्हणायला लागायचं. मला आठवतंय, नेहमी आपला पहिलाच कार्यक्रम हा वृक्षारोपणाचा असतो पण त्या वेळी करोनामुळं प्रत्यक्ष भेटणं अवघड होतं...! सर्वत्र संचारबंदी, भयभीत वातावरण यांमुळं त्या कार्यक्रमाचं नियोजन कसं करावं हेच आम्हाला सुचत नव्हतं. वृक्षारोपण म्हटलं की त्या जागेची पाहणी, तिथे असणाऱ्या सोयी, झाडं कुठून मिळणार, ती कशी न्यायची, अशी फार तयारी लागते पण आपल्या क्लबमध्ये वर्षानुवर्षं ही धुरा सांभाळणारे रो.नितीन, उत्साही आणि उत्तम साथ देणारे रो.रवींद्र प्रभुणे आणि पीपी रो.डॉ.सुधांशु गोरे कामाला लागले होते आम्ही भेटून किंवा फोनवर बोलून रूपरेषा ठरवत होतो. डॉ.गोरे सरांच्या अथश्रीमध्ये राहणाऱ्या त्यांच्या मित्रांनी बीजरोपणाची कल्पना दिली आणि मला ती अतिशय आवडली. आपण दरवेळी वाढलेली झाडं आणून लावतो पण त्यापेक्षा रोपं तयार केली तर पुढील अनेक वर्षांचा प्रश्न सुटू शकतो असं वाटलं आणि तो पहिला कार्यक्रम झाला. ‘आम के आम और गुठलियों के दाम।’ वृक्षरोपणाचे कार्यक्रम दोन जागी करायचं असं ठरवलं... एक कर्नलवाडीला आणि दुसरा चांबळीला. ग्रामगौरवच्या डॉ.सोनाली शिंदे यांनी आपण मिळून कार्यक्रम करू या असं आनंदानं सांगितलं. झाडं जगवणं हा महत्त्वाचा उद्देश असल्यानं ती जागा निश्चित केली. त्यांचं फार मोठं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि आपल्या क्लबनंपण गोरे सरांच्या अध्यक्षीय काळात जवळजवळ साडेतीन हजार झाडं लावली होती. श्री.रघुनाथ ढोलेंबरोबर बोलून झाडांची सोय पण केली पण तिकडं जाणार कसं? करोनाच्या भीतीमुळं आणि संचारबंदीमुळं जायचं म्हणजे आम्हाला नितीनची गाडी! पोलीस पास असल्यानं आम्ही थोडेफार का होईना निर्धास्तपणे जाऊ शकत होतो पण रस्त्यावर लोकांची वानवा... त्यामुळं टेम्पो, मजूर मिळवायचे कुठून? आम्ही एक टेम्पोवाला ठरवला तर पठ्ठा दर दहा मिनटांनी दर वाढवत होता आणि शेवटी पळून गेला. मग परत दुसऱ्या दिवशी वरात जेजुरीकडं! या तिघांनीही जेजुरीला जाऊन श्री. रघुनाथ ढोले यांच्याकडून थोडीथोडकी नाहीत तर तब्बल दोनशेहून अधिक झाडं स्वतः उचलून गाडीत टाकली आणि चांबळीला पाठवली. त्या ठिकाणी खड्डे करण्याचं काम ग्रामगौरवनं पूर्ण केलं. ही तयारी झाल्यावर क्लबमध्ये आपण सांगितलं आणि हो-नाही करत-करत काही मंडळी तयार झाली! आपण जेव्हा वृक्षारोपणासाठी तिथे गेलो त्या वेळी ही जय्यत तयारी केली होती ना... त्यामुळंच आनंद घेऊ शकलो. त्या वेळचे फोटो बघितल्यानं पुढील वेळी अधिक मंडळी आली हे आपल्याला माहीत आहेच. मोकळ्या हवेमध्ये थोडा वेळ का होईना करोनाच्या भीतीपासून मुक्त होऊन एक दिवस आनंदात घालवू शकलो...! पुढील कार्यक्रम तर अजून छान झाला पण त्याआधी आम्ही जेजुरीला जाऊन चारशे झाडं आणून ठेवली होती!
दरवर्षी आपण दिवाळीला वेल्ह्यात पासलीतल्या आणि इतर गावांमधल्या गोरगरीब मित्रमंडळींना धान्याचं आणि दिवाळी फराळाचं वाटप करत असतो. या वर्षी तो कार्यक्रम होणार की नाही अशी शंका होती. या वर्षी हा कार्यक्रम बहुधा रद्द करावा लागेल असंच वाटत होतं. रो.नितीन आणि श्री.आशिष क्षीरसागर यांच्याबरोबर बोलणं झालं होतं... पण आपले मेंबर्स येतील का याची खात्री नव्हती. त्याच सुमारास मी बोर्ड मिटिंगनिमित्त एक डिनर मिटिंग आयोजित केली होती आणि सुदैवानं हॉटेलपण मिळालं. त्या मिटिंगला आपल्या क्लबचे खूप जण सहभागी झाले होते. मी हा विषय विपीनभाई यांच्याकडे काढला त्या वेळेस त्यांनी आणि विनोद भाईंनी मिटिंगमध्ये आवाहन करू आणि मग ठरवू असं सुचवलं आणि गंमत म्हणजे मिटिंगमध्ये आपण या वर्षीही हा कार्यक्रम करावा आणि त्यासाठी लोकांनी मदत करावी असं आवाहन त्या दिवशी केलं आणि नेहमीप्रमाणे विपीनभाईंनी सुरुवात केली आणि बघता-बघता आपण तब्बल एक लाख रुपये जमा केले. रो.विनोदनं स्वस्त दरात उत्तम धान्य मिळवून दिलं त्यामुळं आपण जास्त लोकांना धान्य आणि फराळ यांचं वाटप करू शकलो. या वेळी फराळ नको, धान्यच देऊ असं ठरलं पण गाड्या माझ्या घराकडून घ्या असं रो. विपीननं रात्री ऐन वेळी सांगितलं. मी शंभर बॉक्सेस लाडू ऑर्डर केले आहेत असंही सांगितलं. अचानक ठरल्यामुळं सगळ्यांचीच धांदल उडाली. मग सगळी वरात त्यांच्या घराकडं! गाड्यांमध्ये बॉक्सेस भरून मग पुढं वेल्ह्याकडं निघालो आणि नेहमीप्रमाणे वेल्ह्यात वडापाव खाऊन पुढं. त्या वेळी आपण पुण्याहून टोमॅटो, काकडी, गाजर, कांदे हे सलाड करायला नेले होते याचीपण आठवण झाली. त्या कार्यक्रमाच्या वेळी आणि दुपारी जेवणाच्या वेळी रो.विपीननं सर्वांना आग्रहानं लाडू खाऊ घातले. अतिशय आनंदात होता तो त्या दिवशी. सर्वांसोबत आनंदाचे क्षण घालवून आणि वाटून गेला असं मला वाटतं.
एके दिवशी आपले पीडीजी भाऊसाहेब यांचा फोन आला. ‘आमच्या सोसायटीत श्री.रणजित पाल राहतात आणि ते रिटायर्ड आयएएस ऑफिसर आहेत आणि सोयाबीनपासून दूध आणि दुधाचे पदार्थ कसे तयार करायचे हे शिकवण्याची रणजित पाल यांची इच्छा आहे आणि रोटरी हे काम पुढे करू शकते असं त्यांना वाटतं त्यामुळे तुम्ही त्यांना भेटण्यासाठी माझ्या ऑफिसमध्ये नक्की या. दत्ताजी देवधर, सुधांशु गोरे सर, तुम्ही, नितीन पाठक आणि मी- असे आपण त्यांच्याबरोबर चर्चा करून पुढे काय करता येईल याचा विचार करू.’ असं भाऊसाहेबांनी फोनवरून सुचवलं. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याबरोबर अपॉइंटमेंट ठरवून भाऊसाहेबांच्या ऑफिसमध्ये वाट पाहत बसलो होतो. थोड्या वेळानं एक सद्गृहस्थ आत आले आणि ‘मी रणजित पाल’ अशी त्यांची ओळख त्यांनी करून दिली. त्यांना बघून आम्ही आश्चर्यचकित झालो कारण ते फारच तरुण म्हणजे जवळपास ऐंशी वर्षाचे होते! पण त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा होता. त्यांनी आम्हाला सोयाबीनची आणि त्यापासून होणाऱ्या पदार्थांची भरपूर उपयुक्त माहिती दिली आणि गंमत म्हणजे ‘तुम्ही सोया टोफू (पनीर), सोया ताक/लस्सी आणि सोयाखंड हे पदार्थ खाल्ले आहेत का?’ असं त्यांनी विचारलं. आम्ही नाही म्हटल्यावर त्यांनी आग्रह केला की, तुम्ही माझ्या घरी ते पदार्थ खायला आलंच पाहिजे. तुम्ही ते खाल्ले की मी काय म्हणतो आहे ते तुम्हाला पटेल! पुण्याच्या लोकांना चितळे श्रीखंड माहीत आहे म्हणून एक वेळ सोयाखंड माहीत नसणार असंही सांगितलं! हा उपक्रम मला गोरगरीब बायकांपर्यंत नेऊन पोहोचवायचा आहे... जेणेकरून त्यांना उत्पन्नाचं साधन होईलच शिवाय खेड्यातल्या कुपोषित मुलांना दूधपण मिळेल असं कळकळीनं सांगितलं. लवकरच कळवतो असं उत्तर त्यांना देऊन आम्ही परतलो आणि हा कार्यक्रम करता येईल का, कुठे करता येईल याची चाचपणी सुरू केली... पण दोनच दिवसांत भाऊसाहेबांचा फोन की, ‘अहोऽ ते विचारत आहेत की, तुम्ही लोक माझ्याकडे सोया जेवण करायला केव्हा येणार? प्रशिक्षणाचा कार्यक्रम लवकर करा. मी त्यासाठी मिक्सरपण आणून ठेवला आहे.’ आम्ही त्यांना कळवलं की, ‘तुमच्या घरी आम्ही जेवायला नंतर येऊ पण हा कार्यक्रम नक्की करू.’ मंडळी, तुम्हाला कल्पना आहेच... १८ जानेवारीचा हा कार्यक्रम अतिशय उत्तम झाला आणि त्या कार्यक्रमाचं फळ म्हणजे आज आंबवणे, करंजवणे, आस्कवाडी, सांगवी या आजूबाजूच्या खेड्यांतील जवळपास शंभर मुलांना सोयाबीनपासून तयार केलेलं दूध आणि लस्सी त्यांच्या आहारात रोज मिळतं. रोटरीच्या कामांमध्ये बाहेरील लोकांचा कसा सहभाग असतो याचं हे उत्तम उदाहरण. रो.दत्ताजींच्या फार्महाऊसवर हा कार्यक्रम झाला आणि रणजित पाल यांनी तो खूप एन्जॉय केला. फार्महाऊस आणि दत्ताजींचं अगत्य यांनी तर ते खूश झाले. आम्ही चौघं त्यांच्याकडे चार मार्चला संध्याकाळी जेवायला गेलो. पोळ्या, भात आणि डाळ सोडून सर्व पदार्थ सोयापासून तयार केले होते. सोया पनीर, सोया टिक्की, मसाला ताक आणि योगर्ट अतिशय उत्तम. त्यांची चेतरन नावाची सोया प्रॉडक्टची फॅक्टरी आहे पण तरीसुद्धा हे पदार्थ तयार करायला शिकवून खेड्यातील बायकांना स्वावलंबी करण्याची त्यांची प्रबळ इच्छा आहे! सोयाखंड आणि आम्रखंड दोन्ही खा बरं!
गेल्या वर्षी रोटरीला भारतामध्ये येऊन शंभर वर्षं झाली. त्यानिमित्तानं कलकत्त्यामध्ये एक मोठी कॉन्फरन्स आयोजित केली होती. तिच्यात भारतातील अनेक नामवंत लोकांना गौरवण्यात आलं... ज्या लोकांनी रोटरीबाहेर असूनही सामाजिक सेवेमध्ये मोठी कामगिरी बजावली आहे. अशा लोकांचे रोटरी इंटरनॅशनल प्रेसिडेंटच्या हस्ते सत्कार करण्यात आले. त्यामध्ये श्री.अधिक कदम (आपल्या रोटरॅक्ट क्लबचे पूर्वसदस्य) यांना ‘रोटरी हिरो ऑफ द ह्युमॅनिटी’ असा सन्मान देऊन गौरवण्यात आलं. तो दिवस होता १० फेब्रुवारी २०२०. आपले पीपी रो.वीरेनभाई त्या ठिकाणी जातीनं हजर होते आणि मी तो कार्यक्रम यूट्युबवर पाहत होतो. त्यांचं आणि माझं फोनवर बोलणं झालं आणि त्याच वेळी त्यांनी ‘आपण बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनबरोबर पुढच्या वर्षी काश्मीरमध्ये एखादा कॅम्प करायचा का?’ असे सुचवलं. मी फोनवरच त्यांना तत्काळ होकार देऊन टाकला. श्री.अधिक कदम रोट्रॅक्टर असताना आमच्या घरी यायचे आणि नंतर ते करत असलेल्या कामाची माहिती असल्यामुळे मी लगेचच हो म्हणालो. सद्भावना मेडिकल कॅम्प करायचा असं ठरलं त्या वेळी... मात्र येणाऱ्या अडचणी खूपच आहेत हे जाणवलं आणि करोनामुळं तर हे आव्हानच होतं. डॉ.गोसावी यांनी भरपूर कॅम्प घेतले आहेत आणि अटेंडपण केले आहेत... त्यामुळं कॅम्पची धुरा त्यांच्या खांद्यांवर होती. मुळात हा कार्यक्रम केव्हा घ्यायचा, त्याला कुठल्या तारखा सोयीच्या होतील, लसीकरण झालेलं असेल का... काश्मीरमधील परिस्थिती आणि महाराष्ट्राची सद्यःस्थिती यांमुळं अनेक प्रश्नचिन्ह होती. इंडिअन आर्मीनं जरी निमंत्रण दिलं होतं तरीसुद्धा सर्व तयारी करणं म्हणजे एक मोठं आव्हान... पण बघता-बघता तेही शक्य झालं आणि आपल्या क्लबनं आणि डिस्ट्रिक्टनं एक उत्तम प्रोजेक्ट केला. अर्थातच याचं श्रेय श्री.अधिक कदम, वीरेंद्र शहा आणि रो.डॉक्टर गोसावी यांना आहे. कॅम्प झाला, आम्ही सर्व जण सुखरूप परत आलो आणि आता काश्मीरमध्ये लॉकडाऊन आहे. ‘ईश्वरेच्छा बलियसी’ असं म्हणतात ते खोटं नाही बरं का. माझ्या अध्यक्षीय कारकिर्दीत हा प्रोजेक्ट झाला याचा आनंद वेगळाच.
आमच्यासाठी काहीतरी करा म्हणजे आम्हाला शेतीबरोबर जोडउत्पन्नाचं साधन मिळेल आणि परिस्थिती सुधारेल अशी विनंती शेनवड गावातील लोक आपले रो.नितीन पाठक यांना गेल्या काही वर्षांपासून करत होते. त्याकरता गोदानचा प्रोजेक्ट करावा असं त्याला वाटत होतं. अर्थात याआधी त्याची वेळ आली नसल्यानं तो प्रोजेक्ट या वर्षी सुरू केला. काऊ डोनेशनचा प्रोजेक्ट ग्लोबल ग्रॅन्ट प्रोजेक्ट म्हणून रोटरी क्लब ऑफ नॉर्थ अनेक वर्षं राबवत आहे... पण आपण ते करू शकणार नसल्यानं आपल्याच अर्थसाहाय्यातून गोदान करता येईल का असा विचार सुरू झाला. त्या दृष्टीनं तयारी करावी असं नितीन, गोरे सर आणि मी, आम्ही तिघांनी ठरवलं. कुठल्या गायी विकत घ्यायच्या, त्या वेल्हे भागात टिकतील का, कुठून मिळतील इत्यादी अनेक प्रश्न निर्माण झाले. वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करून त्याबद्दल बरीच माहिती करून घेतली. नितीन तर स्वतः वझे गुरुजींच्या गोशाळेत जाऊन रोज दोन तास तिथं घालवायचा आणि माहिती गोळा करायचा. गोरे सरांनीपण त्यांच्या ओळखीचे श्री.देवल यांच्याबरोबर चर्चा केली. बऱ्याच दिवसांनंतर एकमत झालं आणि मसुदा ठरला आणि मग प्रोजेक्ट आकार घेऊ लागला. क्लबमध्ये आव्हान केल्यानंतर फर्स्ट लेडी सुगंधा, रो.माधुरी किरपेकर आणि त्यांचे मित्र श्री.दड्डीकर यांनी पैसे दिले आणि प्रोजेक्टला सुरुवात झाली आणि बघता-बघता आपण तीसपेक्षा अधिक गोदान सत्पात्री करू शकलो. गायी मिळवणं हे अत्यंत कठीण काम नितीन आणि त्या गावचे पोलीसपाटील यांनी सांभाळलं. एकदा पाच गायी आणायला ही मंडळी खाली कोकणात महाडला गेली आणि गायींना डोंगर चढून पायी आणताना एक गाय पळाली की! रात्रभर शोधत होते. शेवटी मिळाली पण मग मात्र टेम्पो करून आणल्या आणि येताना कुणी पकडलं तर (कसाईखान्यात नेत नाही ना?) म्हणून आपलं पत्र दिलं आणि ते ऐन वेळी द्यायला लागल्यानं एकच धावपळ झाली. रो.जितेंद्रनं रात्री दहा वाजता ते पत्र दिलं. प्रत्येक गाय विकत घेताना आणि आणताना काहीतरी नवीन समस्या येतात पण गोमाता कृपेनं त्या सुटतातही!
आपला क्लब गेली कित्येक वर्षं नाट्यस्पर्धेत भाग घेत आहे आणि या रोटरी वर्षात आपण स्पर्धेत नक्की भाग घेणार असं ठरवलं होतं आणि त्यासाठी आपल्या परदेश सहलीची तारखासुद्धा ॲडजस्ट करायच्या असं मी ठरवलं होतं पण विधिलिखित वेगळंच होतं. ट्रिपपण नाही आणि नाट्यस्पर्धापण नाही त्यामुळं मंडळी जरा खट्टूच झाली होती पण डिसेंबर महिन्यात वातावरण पूर्ववत होऊ लागलं तसं ही स्पर्धा घ्यायची असं शिवाजीनगर क्लबनं ठरवलं. आपल्या टीमला विचारलं... करू या पण शक्य आहे का, होणार का, कुणी प्रॅक्टिसला येईल का याची चौकशी सुरू केली. नाटकाच्या प्रॅक्टीससाठी एकत्र येणं अत्यंत जरुरीचं असतं आणि करोनामुळं ते कठीण होतं. जागेचा प्रॉब्लेम आला पण आपले स्नेहा आणि संजीव पुढं आले आणि नाटकाची प्रॅक्टीस कुठं घ्यायची हा प्रश्न सुटला! एका वेळी दोन ते चार लोकांनी प्रॅक्टीस सुरू केली आणि नाटक थोडा थोडा आकार घेऊ लागलं. आता सर्वांनी एकत्र येऊन प्रॅक्टीस करायला लागणार म्हणेपर्यंत किरण आणि स्वाती वेलणकर, दोघंही करोनाग्रस्त झाले त्यामुळं वातावरण टेन्स झालं. त्यांच्याबरोबर कोण होतं वगैरे प्रश्न सुरू झाले. तेवढ्यात रो.अनिल गोगटे आजारी पडले आणि मग नाटकाच्या संहितेत बदल झाला आणि काही पात्रं गळली. धमाल चालू होती. रोज नवीन डायलॉग पाठ करायला लागायचे. रो.श्वेता तर अक्षरशः रडकुंडीला यायची कारण ती प्रमुख भूमिकेत! एका भागात कँटीनचा सीन... त्यामुळं प्रत्येक प्रॅक्टीसला ‘जे’ ग्रीन बेकरीचे सामोसे आणायचा. बाकीचे खूश. ज्या दिवशी सर्वांची एकत्र रंगीत तालीम झाली नाऽ तेव्हाची धमाल बघण्याची मजा काही औरच होती. थोड्या वेळ का होईना पण सगळे वेगळ्या विश्वात रमायचे! स्टेजवर आपलं नाटक अतिशय उत्तम झालं. आपल्याला जरी पारितोषक मिळालं नाही तरीसुद्धा नाटकात काम करण्याची गंमत मात्र अफाट होती. सर्वांनी आनंद लुटला. मला मात्र या वर्षी नाटकात काम करायला मिळालं नाही याची खंत वाटली म्हणजे डायरेक्टरला मी नकोच होतो. ‘...पण तुम्ही या वर्षी प्रेसिडेंट म्हणजे भरपूर काम आणि प्रॅक्टीसला दांडी...’ या त्यांनीच दिलेल्या सबबीमुळं आम्ही कट! पण ही कसर या वर्षी फर्स्ट लेडी सुगंधा हिनं भरून काढली. आता पुढल्या वर्षी मी नक्की काम करणार बरं का!
तसं म्हटलं तर या वर्षी बऱ्याच किंवा प्रत्येक कार्यक्रमामध्ये, प्रोजेक्टमध्ये, मिटिंगमध्ये काहीतरी वेगळेपण होतं. पडद्यमागे बरेच कलाकार खूप कष्ट घेत होते आणि आपण ते प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये लिहितोच असं नाही त्यामुळं काही प्रोजेक्ट करत असताना काय काय झालं आणि कुणी काय केलं असं सांगावंसं वाटलं म्हणून हा खटाटोप. या सर्व गोष्टी करत असताना एक नक्की जाणवलं की, आपल्या क्लबचे सदस्य मनापासून प्रत्येक प्रोजेक्टसाठी जमेल तसं सहकार्य करत आहेत. प्रत्येकाला कितीतरी अडचणी होत्या. स्वतःची, घरच्यांची आणि इतरांची काळजी घेऊन, सर्व सांभाळून हे काम करणं सोपं नाही त्यामुळं सर्वांचं खूप खूप कौतुक आणि आभार.
बाकीच्या प्रोजेक्टच्या गमतीजमती पुढं केव्हातरी फेलोशीप घेताना बोलण्यासाठी ठेवतो.
हे करोनाचं संकट लवकरच संपेल अशी अपेक्षा करू या... नेहमीच्या रोटरीच्या वातावरणात आपण पुन्हा लवकरच परतू असं मला वाटतं.
Dream Team
Rtn. PN Sanjeev Ogale
Year of the Dream Team
Rotary Club of Pune South Year 2020-21
On being nominated as PN and Director of Club Administration Committee during this Rotary Year 2020-21 it was a task not planned for a pandemic, hence assembling a team and living through this year in literally isolation was the most difficult task faced by all of us.
Beginning of March 2020 we all have been forced to stay in a lockdown and it is still going on. There was a little relief in between where we could meet and look forward to seeing each other every week. Praying that these bad days of pandemic hopefully will get over very soon.
Every dark cloud has a silver lining and this silver lining was the Dream Team of Rotary Club of Pune South.
This Dream Team that has been ambitious and been in a driver’s seat all throughout the year irrespective of the situation. It has been strong enough to fathom anything possible. It has been a Dream Team which has solved the most complex problems with the best solutions. With all volunteering to be a part of the team was most heartwarming with each member of the team giving his best skills and delivering without batting an eyelid.
Before I thank this Dream Team which has proved to be the most dominant team that worked tirelessly and assembled to work in the Year 2020-21 I would say they have set a new bench mark to follow in such difficult times. Having changed the game from regular meetings to zoom meetings with such ease and helping everyone to follow suit have shown us how to play the game in difficult times.
Yes, I am referring to Bulletin Committee, Attendance Committee, and the Programme Committee.
Let me first thank the Chairman and their teams
Bulletin Committee | Attendance Committee | Programme Committee |
Rtn Yogesh Nandurkar | Rtn Abhijit Deshpande | Rtn Mandar Purnapatre |
Rtn Shweta Karandikar | Rtn Sandip Kulkarni | Rtn Vivek Velankar |
Ann Yamani Ponkshe | Rtn Shweta Karandikar | PP Rtn Sandip Vilekar |
Rtn Abhijit Deshpande | Rtn Raghavendra Ponkshe | Ann Asmita Apte |
Rtn. Anand Kulkarni | Rtn. Anand Kulkarni | Ann Chitra Prabhumirashi |
Rtn. Yogendra Natu | Ann Nandini Joag | |
PP Rtn Anil Supanekar | ||
PP Rtn Govind Patwardhan | ||
Rtn. Ramesh Prabhumirashi |
As a Club Administration Committee Director, I would like to be grateful and thankful to all you have done to take up this responsibility and week after week and every month for the complete year working tirelessly to bring to us Members the unmatched Bulletin and also the Cream of Programmes.
Thank You again from all the members of the Rotary Club of Pune South you all really make us feel important and wanted as members of our Club.
कल, आज और कल
रो. योगेश नांदुरकर
बुलेटीन आणि मी
रो. आनंद कुलकर्णी
‘मला लिहायला जमत नाही पण बुलेटीन तयार करण्यात मात्र मी मदत करेन.’ रो.योगेश नांदुरकरने मागच्या वर्षी बुलेटीन टीममध्ये सहभागी होण्यासाठी विचारले तेव्हा मी त्याला हे सांगितले. बघता बघता टीम तयार झाली आणि अडथळे पार करत सुसाट सुटली. सुरुवातीला ऑनलाईन बुलेटीन तयार करणे हे एक आव्हान होते पण रो.अभिजित देशपांडेंच्या अफाट टेक्निकल माईंडमुळे प्रोफेशनल असे बुलेटीन आपण तयार करू शकलो. सगळ्यांना ऑनलाईन बुलेटीन वाचण्याची सवय लावणे हे एक उपआव्हान होते तेसुद्धा पार झाले. माझ्याकडे कलाकारी आणि क्लबकारी अशी दोन सदरे होती. त्यांतल्या कलाकारीकडे माझा ओढा जरा जास्त राहिला. आपल्या मेंबर्सनी अतिशय उत्तम साहित्य वेळोवेळी पुरवून हे सदर ॲक्टिव्ह ठेवले. काव्यपूर्ती स्पर्धेला झकास प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर ‘मेंबर्स ॲक्टिव्हिटी डे’ ही संकल्पनासुद्धा उत्तम प्रकारे राबवता आली ज्यामध्ये साप्ताहिक सभेमध्ये आपल्या मेंबर्सचा सहभाग वाढण्यासाठी प्रयत्न केला गेला.
सगळ्यांची एकत्र मोट बांधण्यासाठी रो.योगेश नांदुरकरनी केलेले नियोजन अप्रतिम होते. पहिला अंक प्रकाशित होण्याच्या आधीच रो.योगेशने संपूर्ण सिस्टीम तयार करून ठेवली होती. विविध सदरे, त्यांचे समन्वयक, लेख अपलोड कोठे होणार, त्यांचा रिव्ह्यू झाला आहे हे कसे कळणार, कुठल्या सदरात, कुठले लेख, कुठल्या महिन्यामध्ये येणार यांसाठी एक उत्तम अशी यंत्रणा त्याने तयार केली होती आणि सहयोगीच्या टीमने या सगळ्याला जबरदस्त साथ दिली. व्यासंगी रो.योगेंद्र नातू, हरहुन्नरी रो.श्वेता करंदीकर, युथफूल रो.संजीव ओगले, चौफेर ज्ञान असलेले रो.अभिजित देशपांडे आणि टीममध्ये मिसळून गेलेले प्रेसिडेंट रो.सुदर्शन नातू, अशा मस्त टीमबरोबर काम करताना खूप मजा आली. एकच छोटी खंत की करोनाच्या नियमांमुळे टीमला एकत्र भेटून दंगा करता नाही आला. तो आता लवकर करुच.
बुलेटीन - एक अनुभव
रो. अभिजित देशपांडे
‘टीम बुलेटीन- आठवणींची साठवण’
रो. श्वेता करंदीकर
मागच्या वर्षी साधारणत: याच वेळेला रो. योगेशचा फोन आला आणि त्यानं सांगितलं की, तुला ‘बुलेटीन टीम’मध्ये ॲड करतोय. मी कॅज्युअली हो म्हणाले. ‘आरसीपीएस’मध्ये मी नवीनच असल्यामुळे हे ‘बुलेटीन’ म्हणजे नक्की काय याची फारशी कल्पना नव्हती.
रो. योगेश, रो. योगेंद्र, रो. अभिजीत, रो. आनंद, ॲन यामिनी आणि मी अशी टीम तयार झाली.
काम सुरू झालं खरं पण माझ्यासाठी सगळंच नवीन होतं. बुलेटीन टीमचा चेअरपर्सन असलेल्या योगेशनं कामाची विभागणी करून दिली. सगळेच दमदार खेळाडू असलेल्या या टीममध्ये काम करताना मला अनेक अनुभव घेता आले आणि त्याद्वारे माझं अनुभवविश्व समृद्ध होत गेलं.
टेक सॅव्ही असलेल्या अभिजीतनं ‘जिथे कमी तिथे आम्ही’ ही भूमिका कायमच बजावली. त्यानं बुलेटीनची तांत्रिक बाजू सांभाळली. रो. योगेंद्र यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवाचा पावलोपावली उपयोग करून घेता आला. बुलेटीन आकर्षक होण्यासाठी रो. आनंदने कल्पकतेनं आयोजित केलेल्या विविध स्पर्धांना आपल्या सभासदांकडून भरभरून प्रतिसाद येत होता. त्यामुळे काम करायलाही हुरूप येत होता. या सर्वांना चेअरपर्सन म्हणून योगेशने एका माळेसारखं बांधून ठेवलं होतं. प्रेसिडेंट सुदर्शन आणि रो. संजीव अनेक वेळेला योग्य सल्ला देऊन योग्य वाट दाखवत होते.
या सगळ्याचा परिणाम म्हणूनच अतिशय देखणं झालेलं हे बुलेटीन, डिजिटल स्वरूपात प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सादर करताना एक वेगळाच आनंद मिळत होता.
एक रोटेरिअन म्हणून मला बुलेटीनमध्ये ‘भाषेचे महत्त्व’, ‘नाटक पाहावे करून’, ‘आठवणीतील पुणे’ हे लेख आणि काही कविता सादर करायला मिळाल्या. एका कवितेला बक्षीसही मिळालं.
या वर्षी दोनदा ‘टीम बुलेटीन'नं ‘MAD’ म्हणजेच ‘मेंबर्स ॲक्टिविटी डे’ हा कार्यक्रम केला. आपल्या क्लबमधले सगळे सभासद आणि ॲनेट्स यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. ‘MAD’ची आखणी करणं आणि तो कार्यक्रम प्रत्यक्षात उतरवणं यात खूप मजा आली.
मला स्वतःला अतिशय दर्जेदार अनुभव मिळवून देण्याऱ्या या बुलेटीनच्या आठवणींची साठवण करत असताना, मी ‘टीम बुलेटीन’चे हार्दिक आभार मानते तसंच आपले काम अतिशय चोख बजावणाऱ्या 'टीम सहयोगी'चे आणि मुख्यत्वे करून ‘उल्का पासलकर’ यांचे आभार मानते. उल्कानं प्रत्येक महिन्याला अगदी न चुकता आम्हाला रिमाइंडर देऊन नेहमीच वेळेत काम केले.
मला आपल्या या ‘सदर्न स्टार’चा एक भाग होता आले याचा आनंद तर आहेच पण त्याहून जास्त आनंद खूप चांगले मित्र मिळाले याचा आहे.
बुलेटीन मॅजिक...
रो. योगेंद्र नातू
कल, आज और कल
रो. मंदार पूर्णपात्रे
रोटरी वर्ष २०२०-२०२१ यातील प्रोग्रॅम कमिटीबद्दल लिहावे असे बुलेटीन कमिटीच्या रो. योगेश नांदुरकर यांच्याकडून सुचवण्यात आले. अध्यक्ष रो. सुदर्शन नातू आणि अध्यक्ष निर्वाचित रो.संजीव ओगले यांनी आमच्या कमिटीकडे साप्ताहिक सभेतील विषय, वक्ते यांचे आयोजन, संयोजन करण्याची जबाबदारी दिली. त्यांनी आमच्या कमिटीवर ठेवलेला विश्वास आणि गेले काही वर्षे याच क्षेत्रात काम करण्याचा अनुभव ही आम्हाला मिळालेली उर्जा होती.
सर्वांत अवघड गोष्ट असते ती स्वतःची ओळख स्वतःला असणे आणि स्वतःची ओळख स्वतःला होणे. आमच्या कमिटीबद्दल ‘लेखाजोखा’ मांडण्यासाठी दुसऱ्या कमिटीने डोळसपणे लक्ष देऊन भाग घ्यायला हवा असे माझे मत आहे. अत्यंत कमी वेळा प्रत्यक्ष उपलब्ध झालेले सभेचे स्थळ, व्यासपीठ, करोना नावाच्या राक्षसाने मांडलेला छळ आणि त्यातून इतरांना उपद्रव होऊ नये यासाठी सदैव दक्ष राहणे खूप गरजेचे झाले होते. प्रत्यक्ष भेटीगाठी आणि वक्ते यांना त्यांच्यासमोर बसून ऐकणे हे खूप कमी वेळा शक्य झाले. ‘झुम’ व ‘फेसबुक लाइव्ह’ या आभासी माध्यमांचा वापर करून, तंत्रज्ञानातील मर्यादा सांभाळून-स्विकारून रंजक तरीही नावीन्यपूर्ण व सर्व सभासदांना उपस्थित राहण्यास प्रोत्साहित करणारी अशी साप्ताहिक सभा आयोजित करणे हे मोठे आव्हान स्वीकारावे लागले. रो. अभिजित देशपांडे यांनी केलेल्या तांत्रिक सहकार्यामुळेच आम्ही हे आव्हान स्वीकारू शकलो याची आम्हाला जाणीव आहे. मी सर्व समन्वयकांचेही आभार मानू इच्छितो. आपल्या क्लबमधील अनेक सभासदांचा आमच्या कार्यक्रम आयोजन-नियोजनातील प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष सहभाग हा आपल्या क्लबमधील गुणवत्तापूर्ण फेलोशिपचा दाखला आहे. बुलेटीन कमिटीमधील रो. आनंद कुलकर्णी या सेनापती रुपातील नेतृत्वाने सादर केलेल्या ‘MAD’ या कार्यक्रमाने आपल्या क्लबमध्ये सादर होणाऱ्या ‘रमण रजनी, रमणी रजनी व चिल्ड्रेन नाईट’ या कार्यक्रमांची उणीव भरून काढली.
फर्स्ट लेडी सुगंधा व सर्व ॲन्स पार्टीसिपेशन कमिटीनेही ‘श्रावणसरी’, ‘नवरात्र स्पेशल’ व ‘चिल्ड्रेन नाईट’ या कार्यक्रमांचे सुरेख आयोजन आणि सादरीकरण केले. सर्वांच्या सातत्यपूर्ण कष्टांना सलाम...! दिवाळी स्पेशल कार्यक्रम हा प्रत्यक्ष सादर झाला असता तर अधिक आनंद झाला असता. काहीसा अनवट परंतु अभिरुचीपूर्ण कलाविष्कार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न केला. दोन वर्षांपूर्वी ‘क्लब डे’च्या निमित्तानी सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी आणि निवेदक मिलिंद कुलकर्णी यांचा कार्यक्रम ऐकण्याची संधी मिळाली होती. या वर्षी आपण प्रत्यक्ष भेटून ‘क्लब डे’ साजरा करू शकत नाही याचे वाईट वाटत आहे. माहिती आणि तंत्रज्ञानातील प्रगती, कला, साहित्यविश्व, वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत अशा अनेक विषयांना स्पर्श करून त्यांतील ‘सुगंध’ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला. नवीन पिढीला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांचे विचार ऐकणे, त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देणे यासाठी विशेष प्रयत्न केले.
प्रासंगिक, व्यावसायिक घडामोडींवर आधारित तसेच जगभर साजरे होणारे ‘दिन-विशेष’ यांवर समयोचित कार्यक्रम सादर करण्यासाठी वेळ व माध्यमांची कमतरता जाणवली. अजूनही बरेच काही करावयाचे बाकी आहे असे वाटते. आमच्या कमिटीच्या वतीने मी सर्वांचे पुनश्च आभार मानतो आणि पुढील नवीन कमिटीस शुभेच्छा देतो.
प्रयत्न केले, जे जे समजले ते ते दिले,
कधी मागितलेले कधी न कधी मागितलेले |
कमी पडलो असू, परि निष्काळजीपणा न केला,
सर्वांच्या सूचनांचा यथोचित सन्मान झाला |
एक वर्ष कमी पडावे एवढे सोडले संकल्प,
राबविले यथाशक्ती यथाअवधी प्रकल्प |
खंत एकचि परी उरली मनी,
‘उपस्थिती’ हर सभेस असू द्यावी बरी |
बोलविलेल्या पाहुण्यांचा आदर
पाहूणचार, विचारपूस करावी खरी |
गोड मानुनी घेतली असावीत
आमुची ही सेवा |
ऐसे विनये सांगतो, मित्रहोऽ
आमुचा रामराम घ्यावा...!
सद्भावना मेडिकल कॅम्प
डॉ. विजया गुजराथी
रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ, आरआयडी ३१३१ मेडिकल ॲव्हेन्यू, बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन आणि भारतीय सैन्य दल यांनी या वर्षी पंधरा एप्रिल ते अठरा एप्रिल या दिवसांत काश्मीरमध्ये मेडिकल कॅम्प घेतला होता त्यासाठी पुण्याहून आम्ही काही डॉक्टर्स आणि स्वयंसेवक तिथं गेलो होतो. अर्थातच आमची राहण्याची व्यवस्था मिलिटरी रेजिमेंटमध्ये करण्यात आली होती. अशा ठिकाणी राहण्याचा अनुभव अगदी अनोखा होता. आयुष्यात असा अनुभव क्वचितच मिळतो. आम्ही डॉक्टर लोक नेहमीच वेगवेगळे आरोग्य उपक्रम, शिबीरं आयोजित करत असतो, समाज सेवा करत असतो. आमच्यापैकी काही जणांनी तर परदेशातही कितीतरी कॅम्पस आयोजित केले आहेत. बहुतेक वेळा असा अनुभव थोड्याफार फरकानं सारखाच असतो. सद्भावना मेडिकल कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या दहा डॉक्टर्सपैकी आम्ही तीन लेडी डॉक्टर्स होतो. एक असिस्टंट हिस्टोपॅथोलॉजी ऑन्कॉलॉजीची टेक्निशियन होती. पुण्यातूनच पाच व्हॉलंटिअर्स आमच्याबरोबर होते. आमच्यातले काही जण आधीच तिथं शिक्षण क्षेत्रात, बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनमध्ये काम करत होते. तेही आमच्या मदतीला होतेच. आमच्या फार्मासिस्ट रोटेरिअनने औषधांची व्यवस्था पुण्यातूनच केलेली होती. डोळ्यांच्या डॉक्टरांनी चष्म्यांची व्यवस्था केलेली होती शिवाय तिथल्या मिलिटरी हॉस्पिटलनंही आम्हाला औषधांचा भरपूर पुरवठा केला त्यामुळे आम्ही सढळ हातांनी रुग्णांना औषधं, चष्मे इत्यादी वाटू शकलो.
काश्मीरमध्ये काम करतानाचा अनुभव मात्र अगदी आगळावेगळा आणि रोमांचक होता.
पहिला कॅम्प होता कमल कोट याठिकाणी कमाल कमान सेतूपासून जवळच ६५००फूट उंचावर. अगदी दुर्गम भाग वळणावळणांनी उंचच उंच जाणारा रस्ता नागमोडी रस्ता... सीमेवरचं शेवटचं गाव त्यामुळे रस्त्यात कुठेही दुकानं, इमारती, जाहिराती काही दिसत नाही. तिथं पोहोचलो तेव्हा गावकरी वाटच पहात होते. गंमत म्हणजे स्त्रिया भरपूर असूनही शांतपणे व्यवस्थित ओळीत खुर्च्यांवर बसल्या होत्या. पुरुष मात्र घोळक्यानं धक्काबुक्की करत, गोंधळ करत उभे होते. थोड्याच वेळात या गावच्या सरपंचांनी कार्यकर्ते आणि मैत्रीचे जवान यांच्या मदतीनं अगदी छान शिस्त लावली.
इथल्या बायका अगदी गोऱ्यापान, नाकेल्या, नितळ कांती पण कुठेतरी आर्थिक परिस्थिती बेताची असल्याची जाणीव करून देणाऱ्या. रोजच्या कपड्यांवर फिरन नावाचा लांबच लांब झगा घातलेल्या आणि पूर्ण डोक्यावर दुपट्टा बांधलेला. पुरुष डॉक्टरांना दाखवायला काय त्यांच्याशी बोलायलाही त्या तयार नव्हत्या पण लेडी डॉक्टरांकडे मात्र अगदी मन मोकळं करत बोलत होत्या. आमच्याकडे आल्यावर कपडे पूर्ण वर करून ‘ये यहाँ मेदीमे दर्द होता हैं’ म्हणायच्या. गुडघेदुखी तर प्रत्येकीचीच तक्रार. त्याचं कारण अगदी सरळ होतं.
प्रचंड थंडीमुळे अन्नपचनाची क्रिया सावकाश त्यात प्रामुख्यानं सामिष भोजन असल्यानं तेल मसाल्याचा भरपूर वापर त्यामुळे पचनाच्या तक्रारी असायच्याच. घराबाहेर पडणारे पुरुष चक्क स्वतःच्या पोटावर कोळशाची शेगडी बांधून बाहेर पडतात त्याला ते कांगरी असं म्हणतात. शरीरातला अग्नी मंद झाल्यावर त्याला बाहेरून चेतवण्याची कल्पना कुणाला आणि कशी सुचली असेल कोण जाणे पण काही ठिकाणी त्याचाही अतिरेक झालेला बघायला मिळतो. बऱ्याचदा पोटात अल्सर किंवा कॅन्सर झालेले पण बघायला मिळतात ते त्यामुळेच...
सतत थंडी आणि पाऊस यांमुळे सूर्यदर्शन विरळच. सहाजिकच विटामिन ‘डी’ची कमतरता कमालीची दिसत होती आणि कॅल्शियम सिंथेसिस कमी होऊन तीही कमतरता आहे हे प्रकर्षानं जाणवत होतं. मुलांची संख्या कमीतकमी चारपाच आणि एकंदर परिस्थिती बघता असं लक्षात येतं की एवढी गर्भारपणं, बाळंतपणं होतात पण त्या नाजूक अवस्थेत अतिरिक्त पोषण व्हायला हवं ते या बायकांना मिळत नसावं त्यामुळे कॅल्शियम विटामिन डीची कमतरता असल्यानं गुडघ्यांना पोषण कमी मिळतं... इथं सपाट प्रदेश नाहीच म्हणजे सतत चढ-उतार त्यामुळे गुडघ्यांवर अधिक ताण पडतो. कमी पोषण आणि जास्त ताण अशा व्यस्त प्रमाणामुळे गुडघे कुरकुर करणारच... मला या ठिकाणी सांगायला अतिशय आनंद वाटतो की, जितक्या कॅन्सरच्या तपासण्या केल्या तितक्या सर्वच्या सर्व निगेटिव्ह आल्या. कदाचित बहु प्रसूतींमुळे असेल पण कर्करोगाचा प्रभाव दिसून येत नाही. उर्वरित भारतात मात्र स्त्रियांच्या कर्करोगाचं प्रमाण अलार्मिंग आहे. खेदाची गोष्ट ही आहे की, ज्या निसर्गानं या प्रदेशावर सौंदर्याची भरभरून लयलूट केली त्यानं सूर्यप्रकाश देताना मात्र हात आखडता घेतला आहे साहजिकच रुग्णांमध्ये ॲलर्जीज, काही त्वचारोग दिसून येत होते. कपडे रोजच्या रोज धुणं किंवा वाळवणं त्यांना शक्यच नाही शिवाय एवढ्या प्रचंड थंडीत रोज अंघोळ, स्वच्छता होत असेल की नाही याबद्दल शंका येते. नेत्रतपासणी करताना त्यांना वाचण्याची वगैरे फार गरज वाटत नव्हती पण डोळ्यांच्या इतर तक्रारींसाठी इलाज केले गेले. चष्मा मिळाल्यावर ते खूश होऊन जात. हा रमादान म्हणजे रमजानचा महिना असल्यानं एक वाजता नमाजाची वेळ म्हणून आम्हीही आमच्या जेवणाची वेळ तीच नक्की केली होती. जेवण झाल्यावर पाहतो तर परत तशीच गर्दी उसळलेली. दिवसभराचा उपवास वरून पावसाच्या सरी असून सुद्धा ते न कंटाळता येत होते. त्यांचा प्रतिसाद बघून मग आम्हीही आमच्या वेळेचं बंधन सैल करून टाकायचो. आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही पुण्याहून जाताना आमच्या नातेवाईकांच्या मनात करोनाची खूपच धास्ती होती पण अति उंचावर असल्यामुळे किंवा शुद्ध वातावरणामुळे असेल पण प्रदूषण, करोना या गोष्टींचा विसर पडल्यासारखं झालं होतं.
उत्साहानं काम करण्याचा स्वयंसेवकांचा वेग वाखाणण्यासारखा होता. रोटरिअन्सच्या अंगात हे गुण मुरलेलेच असतात. तशीच बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या स्वयंसेवकांची आम्हाला खूप मदत झाली. या तरुणांनी रिसेप्शन काउंटर अतिशय छान हाताळलं होतं. प्रत्येकाचा केसपेपर काढणं, त्याचं वजन, रक्तदाब, रक्तातली साखर तपासणी आणि पुढचं मार्गदर्शन करण्याची जबाबदारी यांनी लिलया पेलली आणि आमचा कामाचा भार चांगलाच हलका केला. भाषेची अडचण आली तर एखाद्या दुभाषाला आमच्याकडे पाठवायचं, कुणाला औषध कळलं नाही तर आम्हाला विचारून समजावून सांगायचं, गरज लागल्यास फार्मसीमध्ये जाऊन यायचं ही कामं बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी सहजतेनं केली. या सगळ्यांत इथल्या कमांडींग ऑफिसरच्या सूचना आम्हाला खूप उपयोगी पडायच्या. तिथल्या सरपंचांनी त्यांची व्यवस्थित जाहिरात केलेली असायची आणि त्या ठिकाणी ते जातीनं उपस्थित राहून आम्हाला काय हवं नको ते सगळं बघायचे.
पुढचा कॅम्प होता नवागावला. पुण्यात आमचे पेशंट्स अगदी दूरदूर अंतरावर वेटींग रूममध्ये बसतात, केबिनमध्ये तर एका वेळी एकच पेशंट घ्यायचा आमचा कटाक्ष असतो पण इथं तर एक बाई आत आली की तिच्या बरोबर पाचसहा मुलं, एखाद दुसरी बाई किंवा भाषा येत नसेल तर बाप्या अशी टोळीच आत घुसायची. कधीकधी ती मुलं इतकी एकसारखी दिसायची की कुणाला तपासलं आणि कोण बाकी राहिलं असा आमचा गोंधळ उडायचा. अजून कुटुंब नियोजनाचं वारं त्या गावाला पोचलेलंच नाही. एखाद्या बाईला दोनच मुलं असली तर ती अगदी नाराज असायची. एक मात्र मला नमूद करावंसं वाटतं की त्या खूप समाधानी असायच्या. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांचा हा गुण मनाला भावून गेला.
त्यापुढचा कॅम्प होता नौगाम इथं. तिथून पुढे एक चेकपोस्ट आणि जेमतेम पाच किलोमीटर्सवर सीमारेषा. पूर्वी तर या पहाडीतून एक रस्ता काढून तिथून लोक ये-जा करत असत. आता मात्र तो रस्ता पूर्ण बंद केलाय. हा प्रदेश जरा जास्तच सेन्सिटिव्ह आहे त्यामुळे त्याची सुरक्षा जास्तच कडक... इथंच आम्हाला एके-47 रायफल फोटोपुरती का होईना हाताळायला मिळाली. आज समोरच्या डोंगरावरचा पहारा जास्तच ठेवला होता. आपल्याला मिलिटरीच्या जवानांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल नेहमीच आदर वाटतो. इतक्या असुरक्षित वातावरणात, बिकट अवस्थेत त्यांचं राहणं बघितलं की तो आदर अनेक अनेक पटींनी वाढतो. संपूर्ण रस्त्यावर अगदी थोड्या थोड्या अंतरांवर सैन्य तैनात असतं. जेमतेम वीस-पंचवीस वर्षं वयाचे हे तरुण तिथं गस्त देत असतात. कडाक्याची थंडी, बोचरे वारे, मधूनच पडणाऱ्या पावसाच्या सरी अशा वातावरणात दहादहा बाराबारा तास एकाच जागेवर उभं राहायचं. कशाचीही तमा न बाळगता आपलं कर्तव्य बजावत राहायचं. माणूस नाही, गप्पा नाही, गोष्टी नाही... सदैव सजग तत्पर. ड्युटीवरून घरी गेल्यावरही घरात कुणी नाही. सीमेवर कुटुंब नेता येत नाही. वर्ष-वर्ष घरी जायचं नाही. कुटुंबियांची भेट नाही. नातेवाईक, मित्रपरिवार दिसत नाही. कुणी तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही अशा कष्टप्रद भयावह वातावरणात अशी सेवा बजावणाऱ्यांना आपण फक्त कडक सलाम करू शकतो.
मिलिटरीचे एवढे कष्ट पाहून ऊर अगदी भरून आला. तिथल्या प्रसिद्ध वर्तमानपत्रातून या कॅम्पच्या बातम्या झळकत होत्याच शिवाय टीव्हीवर सविस्तर वर्णन केलं जात होतं त्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांचा आणि आपला संबंध जोपासण्याची सद्भावना निर्माण केली हे नक्की...
शेवटचा कॅम्प बारामुल्लाला होता. आम्ही तिथं पोहोचलो तेव्हा आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला. ते पब्लिक हेल्थ सेंटर असल्यामुळे त्यांच्या तपासणीच्या खोल्या, पॅथॉलॉजी लॅब, रुग्णांसाठी खाटा असा सगळा सरंजाम अगदी अदययावत... पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्व सोयी असल्या तरी पेशंट्स मात्र तेवढे दिसत नव्हते. मन हिरमुसलं होतं पण अर्धा तास गेला आणि रुग्णांचा असा ओघ सुरू झाला की, सगळ्यांना आवरणं अवघड जात होतं. नंतर लक्षात आलं की, ही मंडळी आधी इथं येऊन रागरंग बघून नंतर घरातल्या लोकांना घेऊन येत होती. मात्र इथल्या स्त्रिया त्या मानानं जरा शिकलेल्या, थोडं इंग्लिश येणाऱ्या होत्या ही आनंदाची गोष्ट होती. एकंदरीतच शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यानं त्यांना स्त्री डॉक्टरांना भेटण्याची संधी कमी होती. एक स्त्री म्हणूनही आमच्याशी बोलायला, त्यांच्या समस्यांवर चर्चा करायला मिळाल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं.
संध्याकाळी कॅम्पचा सांगता समारंभ झाला. एखाद्या चित्रपटात शोभेल असा प्रशस्त दिवाणखाना, साधेच पण उंची फर्निचर, विविध पदकं, मानचिन्हं यांनी भरलेल्या शोकेसेस, आपल्या आर्मीच्या पराक्रमाची गाथा सांगत होत्या. त्यातले ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले निवडक फोटो मन वेधून घेत होते.
अशा जादूमय वातावरणात विशिष्ट सेवा मेडल प्राप्त मेजर जनरल वीरेंद्र वत्स यांनी प्रवेश केला आणि वातावरणात वेगळाच रंग भरला. ३७०कलम रद्द झाल्यावर तिथं भारताचा झेंडा फडकला या प्रसंगाचं वर्णन करताना त्यांच्या चेहरा अभिमानानं फुलून आला होता. ते वर्णन प्रत्यक्ष ऐकतांना आमचंही मन आनंदानं भरून आलं. त्यांनी आम्हाला डॅगर्स डिव्हिजनची मानाची टोपी दिली तो प्रसंग आमच्यासाठी सन्मानाचा भाग होता. पुढच्या दोन दिवसांत सद्भावना मेडिकल कॅम्पच्या टीमनी बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या चार होम्सना आणि प्रशिक्षण केंद्रांना भेटी दिल्या. अधिक कदम नावाचा जेमतेम सतरा वर्षांचा एक मुलगा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुण्यात शिकायला आला. रोटरॅक्ट क्लबचा तो सदस्य झाला. सामाजिक शास्त्राचा अभ्यास करताना तो काश्मीरला गेला. फिल्डवर्क करता करता काश्मीरची अशांतता बघून तो इतका अस्वस्थ झाला की तीच त्याची कर्मभूमी झाली. त्यानं तिथं शांततेची बीजं रुजवायला सुरुवात केली. आता त्याची मुळं पक्की झाली आहेत आणि त्याचा वृक्ष होऊ लागलाय.
आपल्या गावात आपलं छोटंसं घर बांधणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. याच्या मनात स्वतःच्या घराचा विचार आलाच नाही. काश्मिरी लोकांच्या मनातच त्यानं असंख्य घरं बांधली. तिथं मुलींकरता अनाथ आश्रम चालू केले पण प्रत्यक्ष बघितल्यावर ‘अनाथ आश्रम’ हा शब्द योग्य वाटत नाही हॅप्पी होम वाटतं. पुण्याहून मेडिकल कॅम्पनिमित्त काश्मीरला गेलो म्हणून आम्हाला या आश्रमांना भेट देण्याची संधी मिळाली. पहिल्या आश्रमाला भेट देताना मनात विचारांचं काहूर उठलं होतं. असंख्य प्रश्न मनात घोंघावत होते. आम्ही गेलो तेव्हा स्वागताला जयादिदी सामोऱ्या आल्या. पहिल्या भेटीतच त्यांनी आमची मनं जिंकून घेतली. इतकं उबदार स्वागत पाहून आम्ही भारावून गेलो. मुलींनी आमच्यासाठी विशेष नाश्त्याची व्यवस्था केली होती. त्यांचा उत्साह बघून आम्हाला खूप आनंद झाला. कोरोनामुळे सध्या फक्त पन्नास टक्के मुलींना इथं राहण्याची परवानगी होती. त्या मुलींनी आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. एकेकीची कहाणी ऐकून आपल्या डोळ्यांत पाणी येतं पण त्या या दुःखाला पार करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात यशस्वीसुद्धा होतात. त्यांची आपल्याबरोबरची वागणूक आणि आदब बघून त्यांच्या प्रेमात पडायला होतं. इथं थांबण्याची खूप इच्छा असूनही उशीर होत असल्यामुळे आम्हाला तिथून बाहेर पडावं लागलं. दुसऱ्या दिवशी आम्ही एका आश्रमात भेट दिली तिथल्या मुलीही खूप गोड आणि सालस होत्या. दयेनं नाही तर मायेनं त्यांनी आम्हाला आपलंसं करून घेतलं. त्यांनी वेगवेगळी गाणी, प्रार्थना म्हणून दाखवल्या. केवढ्या कठीण परिस्थितीत त्या शिक्षण घेतात हे बघून कौतुक वाटतं. अगदी वय वर्षं दोनपासून या मुली इथं सोडून दिलेल्या असतात. अनंत आर्थिक अडचणी, बाहेर सततचे दंगे, लॉकडाऊन या कारणांमुळे...
अगदी मूलभूत सोयीही नाहीत किंवा किंबहुना तुटपुंजा आहेत... पण संकटांनी घाबरून न जाता त्या स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करतात. स्वतःच्या पायांवर उभ्या राहतात. जिथं जयादिदींचं घर आहे तिथं आम्ही तिसऱ्या दिवशी गेलो. दिदी कसल्या त्या मुलींच्या आईच आहेत. आईसारखं नव्हे तर आईचंच प्रेम त्यांना देतात. त्या मुलींना शिक्षणाबरोबर यशस्वी आयुष्याचे धडे देतात. त्यांतल्या दिडशे मुलींची लग्नं झाली आहेत. त्या हुशारीनं संसार करतात. सासरी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याची धिटाई त्यांच्यात निर्माण झाली आहे. वाईट परिस्थिती बदलण्याची त्यांची मानसिक ताकद अतुलनीय आहे. त्यांच्यातल्याच काही मुली तिथं कॉम्पुटर शिकवतात, काही मुली शिवणाचे धडे देतात आणि घेतात. परस्परांना सांभाळून घेत या बिकट आयुष्याची वाटचाल त्या करत आहेत.
आपल्या मुलांना सर्व सोयी उपलब्ध असतात तरी त्यांचं शिक्षण आपल्याला अवघड वाटतं पण या मुलींना कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना दुसऱ्या शहरात शिक्षण घेऊन त्या डॉक्टर, इंजिनिअर होतात. काही मुली आश्रमाच्या प्रती आदर बाळगून परत तिथंच सेवा रुजू करतात. नवीन मुलींना शिक्षण घेण्यासाठी मदत करतात. शेवटच्या दिवशी आम्ही अनंतनाग आश्रमाला भेट दिली. तिथल्या मुलींनी गरम गरम काहवा आणि स्वतः तयार केलेल्या रोट्यांनी आमचं स्वागत केलं.
प्रत्येक ठिकाणी आम्ही त्यांच्या वैद्यकीय तपासण्या केल्या आणि विशेष म्हणजे फारशा सुविधा नसतानाही या मुलींचं आरोग्य उत्तम आहे, त्यांचं मानसिक आरोग्य तर फारच उच्च दर्जाचं आहे हे आमच्या लक्षात आलं. त्यांच्याशी बोलताना आम्हाला वाईट वाटलं तर त्या आमची समजूत घालत होत्या.
रमजानचे सतत उपवास सुरू असूनही त्या उत्साही आणि आनंदी होत्या. रामनवमी आणि रमजान असा राम रहीमचा उत्तम योग त्या दिवशी घडून आला. धर्मापलीकडं जाऊन एक कडी जोडण्याचा योग जुळून आला. ‘एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ हा धडा शिकायला मिळाला.
तिथं आणखी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे अधिक भैयावरचं त्यांचं प्रेम,श्रद्धा... तो त्यांना नुसतं अन्न, पाणी किंवा इतर मदत करत नाही तर त्यांनी स्वावलंबी आणि परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करतो. तिथल्या अशांत वातावरणातही शिक्षणात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करतो. इतकच नव्हे तर दिडशे मुलींची लग्नही त्यांनी लावून दिली आहेत. त्या मुलींची मुलं त्याला आजोबा म्हणतात म्हणून अधिकचा मान वयाच्या चाळीशीच्या आधीच भैयावरून पप्पावर आणि आता आजोबावर गेला आहे. आज त्याची पाच होम्स तिथं आहेत. जम्मूमध्ये अशाच लोकांसाठी आणखी एक अद्ययावत असं मोठ्ठं घर बांधायचं त्याचं स्वप्न आहे. ते लवकरच पूर्ण होवो अशा मनापासून शुभेच्छा! अधिकचं हे काम बघून सगळ्यांना वेगळीच प्रेरणा मिळते. आज स्वतःचा कम्फर्ट झोन आणि प्रायॉरिटीज बाजूला ठेवून लोक बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचं काम करायला तयार होतात. देशाच्या सीमेलगतच्या खेड्यापाड्यात खूप अवघड परिस्थिती आहे. अतिशय उंच आणि दुर्गम प्रदेश असल्यानं तिथं वैद्यकीय सोयी उपलब्ध नाहीत. त्यांना सेवा देण्याचा प्रयत्न बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन करतं. आम्हा डॉक्टरांना अशाच कॅम्पला जाण्याची संधी मिळाली. बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन आणि भारतीय सैन्यदलाच्या सहकार्यानं सीमेवर आरोग्य शिबिरं आयोजित केली होती. बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशननी तिथं पंधरा ऍम्ब्युलन्सेस दिल्या आहेत. त्यांची सखोल तपासणी आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी केली. त्यांचं काम बघून आम्ही फार प्रभावित झालो.
आपल्याला माहीत असलेल्या रोटरीच्या चारही टेस्ट्स आम्ही या भेटीत पूर्ण केल्या असं मला वाटतं. आपण सगळे भारताचे रहिवासी आहोत याची जाणीव आम्ही तिथं निर्माण करू शकलो आणि तुम्ही आमचेच आहात, आपण सगळे बहीणभाऊ आहोत हे समजवण्याचा, ही भावना रुजवण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला. हे लोक इतक्या दूर सीमेवर राहतात, त्यांचं जगणं अतिशय खडतर आहे त्यामुळे आपला या देशाशी काही संबंध आहे हे त्यांच्या गावीही नसतं. या मोहिमेला आम्ही सद्भावना यात्रा नाव दिले होते आणि ही यात्रा यशस्वी झाल्यामुळे ते नाव सार्थ ठरले याचं खूप मोठे समाधान आम्हाला मिळालं... हे अविस्मरणीय दिवस आम्हाला आमच्या आयुष्यात अनुभवता आले त्याबद्दल रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१, भारतीय सैन्य दल आणि बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.
क्लबकारी
विविध विभाग संचालक किंवा कमिटी मुख्य संवाद
क्लबमधील विविध प्रोजेक्ट्स, कार्यक्रम, फेलोशिप्स
जावे त्यांच्या क्षेत्रा… / मागील एखाद्या प्रोजेक्टची गोष्ट
तुमचा लेख आवर्जून द्या...
समन्वयक - आनंद / यामिनी