ऑक्टोबर २०२० – क्लबकारी
Platinum Ranking
CONGRATULATIONS!
IPP Abhijit Joag, BoD 2019-20 & Members...!
Platinum ranking for Rotary Club of Pune South
मेगा इ-रायला
रोटरी क्लब ऑफ कल्याणीनगरने २७ ऑगस्ट रोजी ‘मेगा इ-रायला’चा प्रोग्राम होस्ट केला होता. त्यात इतर सिनर्जी पार्टनर्स असलेले चौदा रोटरी क्लब सहभागी झाले होते. हा प्रोजेक्ट अठरा ते तीस या वयोगटातल्या मुलांसाठी होता. या कार्यक्रमासाठी बावीसशे मेंबर्सनी रजिस्ट्रेशन केलं होतं. या उपक्रमात रोटरी क्लब पुणे साऊथचासुद्धा महत्त्वपूर्ण सहभाग होता.
रो. सुदर्शन नातू यांच्यामुळे पंढरपूर येथील एसव्हीइआरवाय कॉलेजमधील विद्यार्थी, रो. श्रीकृष्ण चितळे यांच्यामुळे स. प. कॉलेजचे विद्यार्थी आणि इतर रायला टीम्सच्या प्रयत्नांमुळे आपल्या क्लबमार्फत सुमारे अकराशे विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालं. या उपक्रमासाठी पुणे, पनवेल, चेन्नई, श्रीलंका, मलेशिया, यूएसए अशा विविध ठिकाणांहून स्टुडंट्स, रोटरॅक्टर्स, इंटरॅक्टर्स आणि इतर मेंबर्सचा चांगला प्रतिसाद मिळाला.
प्रोग्रॅमची सुरुवात प्रेसिडेंट मेघा शर्मा (रोटरी क्लब कल्याणीनगर) आणि प्रमुख पाहुण्या रो. डि. जी. रश्मी कुलकर्णी यांच्या भाषणाने झाली.
अवी आर्या हे या कार्यक्रमाचे पहिले वक्ते होते. त्यांचा बोलण्याचा विषय होता ‘रीन्यू.’ त्यांनी आजच्या बदलत्या काळात स्मार्टफोन, डिजिटल मार्केटिंग, ऑनलाईन प्रेझेन्स याचं महत्त्व समजून सांगितलं, तसंच ऑनलाइन प्रेझेन्ससाठी ‘३३ मायक्रो व्हिडिओज इन २० डेज’ ही आयडिया त्यांनी सर्वांसमोर मांडली. त्यांनी नवीन बिझनेसला उपयोगी पडतील अशा टिप्स दिल्या आणि आर्थिक साहाय्यासाठी कुणीकडे शोध घ्यावा याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलं.
दुसरे वक्ते डॉक्टर राधाकृष्ण पिलाई ‘रिडायरेक्ट्’ या विषयावर बोलले. चाणक्य नीतीच्या चार तत्त्वांना अनुसरून काम केल्यास तुम्ही उत्तम नेता बनू शकता याबद्दल अतिशय सुंदर माहिती त्यांनी दिली.
अविनाश आनंदा हे पुढील वक्ते होते. त्यांच्या बोलण्याचा विषय ‘रिचार्ज’ हा होता. हसरा चेहरा ही आनंदी राहण्याची गुरुकिल्ली आहे. ‘आनंदी राहिल्याने कुठल्याही गोष्टीत यश मिळवणं सोपं जातं’ असा सुंदर विचार त्यांनी सर्वांना दिला.
रो. मेघा यांची उत्तम आखणी, तज्ञ वक्ते, उपयुक्त विषय, भरघोस मेंबरचा सहभाग यांमुळे लक्षात राहील असा हा कार्यक्रम झाला. आपल्या क्लबतर्फे प्रे. सुदर्शन यांच्या प्रयत्नांमुळे अनेक विद्यार्थी सहभागी झाल्याने हा प्रोग्राम खूपच वैशिष्ट्यपूर्ण ठरला.
काका- एक जिवलग सखा…
सोमवार २४ ऑगस्टची दुपार… नुकतीच वामकुक्षी संपवून, चहा घेऊन मी परत ऑफिसला जाण्याच्या तयारीत होतो. तेवढ्यात माझा फोन खणाणला आणि ‘मी डॉक्टर अविनाश भोंडवे बोलतोय. एक दु:खद बातमी सांगण्याकरता फोन केलाय…’ असा आवाज पलीकडून आला. क्षणभर माझ्या काळजाचा ठोका चुकला आणि आता काय दुःखद बातमी ऐकायला लागते असा प्रश्न मला पडला. माझ्या पत्नीनं शोभानं माझ्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले आणि ‘शांततेनं घ्या…’ असं तिनं हातानं मला खुणवलं. पलीकडून आमचे रोटेरिअन डॉक्टर भोंडवे सांगत होते, ‘अहोऽ काका आपल्याला सोडून गेले…’ डॉक्टर भोंडवे हे आमच्या जिवलग मित्राचे म्हणजे काका सावंतांचे जावई असल्यामुळे ते कोणाबद्दल बोलतायत हे मला लगेच समजलं आणि माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले, ‘अहोऽ काय सांगताय? कोण? आपले काका सावंत? माझं चारच दिवसांपूर्वी त्यांच्याशी फोनवर चांगलं अर्धा तास बोलणं झालं. एकदम ठणठणीत तब्येत होती आणि अचानक हे कसं काय झालं?’
पलीकडून अविनाशजी बोलत होते.
…आणि मी सुन्नपणे ऐकत होतो.
दुपारी तीन वाजता रुटीन चेकअपसाठी काका डॉक्टरांच्या शिवाजीनगरच्या दवाखान्यात गेले होते. त्यांनी केलेल्या काही वैद्यकीय चाचण्यांचे रिपोर्टही त्यांना डॉक्टरांना दाखवायचे होते. अतिशय शिस्तीचे असलेले काका दवाखान्यात थोडी गर्दी होती म्हणून आपला नंबर येईपर्यंत गाडीतच बसून होते. त्यांचा नंबर आल्यानंतर गाडीतून उतरून डॉक्टरांच्या केबीनपर्यंत ते चालत गेले आणि केबीनच्या दारातच कोसळले. काकांना मॅसिव्ह हार्ट अटॅक आला होता. डॉक्टरांच्या ते लगेचच लक्षात आलं आणि ते काकांना घेऊन त्यांच्या सुनेसोबत सूर्या हॉस्पिटलला गेले. तिथं डॉक्टरांच्या टेबलवर पोहोचेपर्यंत काकांनी दम धरला होता पण टेबलावर पोहोचताच क्षणी खेळ संपला… थोड्या वेळानं तिथूनच अविनाशजींनी मला फोन केला होता.
काकांची आणि माझी अठ्ठेचाळीस वर्षांची मैत्री होती. आम्ही १९७२ सालापासून एकमेकांचे परिचित होतो. स्वभावामुळे एकमेकांचे सूर जुळत गेले आणि केव्हा आमची मैत्री वाढत गेली ते कळलंच नाही. आम्ही दोघंही मेट्रॉलॉजीच्या क्षेत्रातली उत्पादनं करत होतो पण एकमेकांचे स्पर्धक नव्हतो. काकांचा भर गेजेस करण्याकडे होता तर आम्ही इंस्ट्रुमेंट्सचं उत्पादन करत् होतो. पुष्कळदा आमचे ग्राहकही एकच असायचे आणि आमची उत्पादनं एकमेकाला पूरक असायची… त्यामुळंही आमची मैत्री लवकर जमली असावी. माझं लग्न लवकर म्हणजे १९७१ साली झालं. काकांचं आणि लतावहिनींचं लग्न उशिरा म्हणजे १९७६ साली झालं. मित्रमंडळ सभागृहात त्यांच्या लग्नाप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या स्वागत समारंभाला मी आणि शोभा, दोघंही उपस्थित होतो. काकांमधला आणि माझ्यातला एक समान दुवा म्हणजे आम्ही दोघंही पुण्याच्या सुप्रसिद्ध ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (COEP)’ या संस्थेचे विद्यार्थी. काका १९६४ला पास होऊन बाहेर पडले तर मी १९७०च्या बॅचचा विद्यार्थी पण वयातलं हे अंतर आमच्यात कधीच नव्हतं… १९८२ साली आम्ही दोघंही रोटरीत आल्यानंतर ते अंतर आपोआपच गळून पडलं.
व्यवसायानिमित्त आम्ही दोघंही परदेशी औद्योगिक प्रदर्शनाला नियमित भेटी द्यायचो. १९८२ साली मराठा चेंबरच्या माध्यमातून मी पहिल्यांदाच जर्मनीला हॅनोव्हर येथील जगद्विख्यात मशीन टूलच्या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी गेलो होतो. काकांची यूरोपची बहुतेक दुसरी-तिसरी खेप असावी. एस्.ओ.टी.सीने आयोजित केलेल्या या प्रवासात पुण्यातील सुमारे पन्नास साठ उद्योजक होते. आमचा मुक्काम हॅनोव्हरपासून दोन तासांच्या अंतरावर असलेल्या हॅम्बुर्ग शहरात होता. प्रदर्शनाचं ठिकाण आमच्या हॉटेलपासून बसने दोन तासांच्या अंतरावर होतं. आम्ही पाच दिवस हे प्रदर्शन पाहाणार होतो. प्रदर्शनाचा दुसराच दिवस होता. मी संध्याकाळी पाच वाजता प्रदर्शनातून बाहेर येऊन बसकडे निघालो पण बसच सापडेना… झालं असं की, या प्रदर्शनाला अनेक बाजुंनी प्रवेशदारं होती. एका दारापासून दुसऱ्यापर्यंत जायला किमान पाऊण तास लागायचा. मी चुकीच्या प्रवेशदारानं बाहेर गेलो होतो. काकांनी आयोजकांना सांगून माझ्यासाठी पाऊण तास बस थांबवून ठेवली होती पण मला काही शेवटपर्यंत बस सापडली नाही. शेवटी माझी वाट पाहून बस निघून गेली. पुढे दीड तास वाहनतळावर हिंडल्यावर् मी बस शोधायचा नाद सोडून दिला. तेथील एका मुलीनं मला हॅनोव्हर रेल्वे स्टेशनपर्यंत लिफ्ट दिली आणि मी धडपडत रात्री अकरा वाजता आमच्या हॉटेलवर पोहोचलो. तिसऱ्या दिवशी प्रदर्शनावरून परत येताना काकांनी बसमध्ये माझ्या जाहीर फिरक्या घेतल्या. मी मुद्दामच बस चुकवली वगैरे वगैरे... आणि मला काल घडलेला प्रसंग संपूर्ण तासभर बसच्या माईकवरून सविस्तरपणे सांगायला लावला. याचा परिणाम असा झाला की, परदेशात चुकल्यानंतर गडबडून न जाता आपल्या मुक्कामावर परत येण्यासंबंधीची माझी भीती तर गेलीच पण इतरांनासुद्धा ती एक केस स्टडी झाली आणि त्यांचीपण अशा आपत्तीच्या प्रसंगी काय करायचं याची मानसिक तयारी झाली.
मी काकांच्या समवेत किमान आठदहा तरी परदेशवाऱ्या केल्या असतील. एकदा प्रदर्शन पाहायला आम्ही बर्मिंगहॅमला गेलो होतो. मी मुंबईवरून थेट गेलो होतो आणि काका स्वित्झर्लंडवरून येणार होते. त्यांच्यासोबत इलेकट्रोनिकाचे प्रकाश रत्नपारखी होते. त्या दोघांच्या रूम्स मी माझ्याच हॉटेलमध्ये बुक केल्या होत्या. त्यावेळी आंतरराष्ट्रीय मोबाईल फारसे वापरले जात नव्हते. माझं हॉटेल बर्मिंगहॅम एअरपोर्टजवळ होतं पण काका बर्मिंगहॅम रेल्वेस्टेशनला गेले. ते फक्त जागाच चुकले नव्हते तर हॉटेलचं नावपण चुकीचं लिहून घेतलं होतं. झालं… आता कुठे शोधायचं? शेवटी त्यांनी माझ्या ऑफीसला फोन करून अचूक पत्ता घेतला आणि मला प्रेमानं शिव्यांची लाखोली वाहात दोघंही उशिरा हॉटेलवर आले. शेवटी ही चुकामूक आम्ही आपलं शब्दभांडार एकमेकांवर मुक्तपणे उधळत संध्याकाळी पेल्यात बुडवून साजरी केली हे वेगळं सांगायला नकोच.
आम्ही दोघांनी एकदा बँकॉकचं प्रदर्शन पाहण्यासाठी सहकुटुंब जाण्याचं ठरवलं. अशी परदेशातली प्रदर्शनं म्हणजे आमच्या दोघांकरता नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायच्या कार्यशाळाच असायच्या. तिथं पाहिलेलं नवीन उत्पादन परत आल्यानंतर आपल्या कारखान्यात तयार करायचं असा माझा खाक्याच असायचा. प्रसंगी आमच्या उत्पादनाला अशा प्रदर्शनांतून गिऱ्हाईकसुद्धा मिळायचं. प्रदर्शनाच्या जागी पोहोचल्यानंतर आम्ही आपापली कामं स्वतंत्रपणे करायचो. दुर्दैवानं शेवटपर्यंत लता(उमा)वहिनींना बँकॉकचा व्हिसा मिळू शकला नव्हता. त्यामुळे काकांनी त्यांचे मित्र अगरवाल यांना या ट्रिपला बरोबर घेतलं पण या ट्रीपमध्ये आमची भट्टी काही फारशी जमली नाही. मात्र या दहा दिवसांत पुण्याला उमावहिनींनी आमच्या मुलांची चांगली काळजी घेतली आणि त्यामुळे आम्ही ही ट्रिप निर्धास्तपणे केली. या दिवसांत आमची मुलं स्मिता, संग्राम आणि सुवर्णा यांची काकांच्या आणि उमावहिनींच्या विक्रम, जाई आणि पूनम यांच्याबरोबर समवयस्क असल्यामुळे आणि आमची घरंही जवळच असल्यामुळे चांगली मैत्री झाली.
काकांचा व्यावसायिक व्याप पुणे, कोल्हापूर इथे पसरलेला असल्यामुळे रोटरीसाठी त्यांना फार वेळ देता यायचा नाही पण उमावाहिनी मात्र सगळीकडे सहभागी असायच्या. रोटरीतील आम्ही सात जोडप्यांनी १९९५च्या सुमारास एकत्र केलेली दुसरी ट्रिप म्हणजे हिमालयातील चारधाम यात्रा. खर तर आम्हाला काकांनी आणि श्रीभाऊ पोफळेंनी या सहलीला खेचूनच नेलं. म्हटलं तर ती तीर्थयात्रा होती आणि म्हटलं तर हिमालयातील निसर्ग सौंदर्य निरीक्षणातून अनुभवलेल्या अप्रतिम नेत्रसुखाची अनोखी अनुभूती होती. या सहलीमुळे आम्ही सर्वजण खूप जवळ आलो.
काकांनी २००५-२००६च्या रोटरी वर्षात आपल्या रोटरी क्लब पुणे साऊथच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. त्या वर्षात मात्र त्यांनी आणि उमावहिनींनी झोकून देऊन काम केलं. त्यांचं वर्ष हे आमच्या सर्वांच्या कायमचं लक्षात राहील. त्या वर्षी काकांनी क्लबची सहल कोल्हापूर, पन्हाळा आणि वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या अतुलनीय पराक्रमानं गाजवलेल्या पावन खिंडीत नेली होती. काकांनी कोल्हापूरला रोटरी सभासदांचा केलेला पाहुणचार झोडून आम्ही तृप्त झालो होतो. कोल्हापूरच्या पांढरा रस्सा, तांबडा रस्सा आणि मटणाची चव अजून आमच्या जिभेवर रेंगाळत आहे.
एकदा आम्ही दहा बारा रोटेरिअन आपले जुने सभासद, माजी अध्यक्ष दिलीप जोशी यांच्या वाई इथल्या नदीकाठच्या घरी ओव्हर नाईट सहलीला गेलो होतो. संध्याकाळनंतर फेलोशिपची धमाल चालू झाली. कृष्णा नदीचं पाणी शेजारूनच खळखळ वाहत होतं. मंद सुखावणारा वारा अंगावर घेत आमचं अपेय पान आणि अभक्ष भक्षण चालू होतं. गप्पाटप्पा चांगल्या रंगल्या होत्या. बोलता बोलता दिलीपरावनं सांगितलं की त्यांच्या घराजवळच वाईमधले प्रसिद्ध ज्योतिषी राहातात. काकांना ज्योतिषाचा भारी नाद होता. कधी त्या ज्योतिषाच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतले असतील असं मला वाटत नाही पण त्याला भविष्य विचारायची त्यांना भारी आवड. मला म्हटले, ‘भाऊसाहेबऽ आपल्याला त्या ज्योतिषाकडं उद्या जायचंय.’ मलापण थोडीशी आवड असल्यामुळं मी हो म्हटलं. सकाळी उठून पुण्याला यायची घाई असल्यामुळे मी ते रात्रीचे संभाषण विसरून गेलो होतो पण सकाळी नाष्टा, स्नान उरकून तयार झाल्यानंतर काकांनी आठवण करून दिली आणि त्यांच्या आग्रहाखातर आम्ही दोघंच त्या ज्योतिषाकडे जाऊन त्यांना दोन तास पिडून आलो. काकांचा जन्म अमावास्येचा होता. ते नेहमी म्हणायचे की ज्योतिषी अमावास्येला अपवित्र मानतात पण मी मात्र पवित्र मानतो. …आणि खरंच दक्षिण भारतात अमावास्या हा पवित्र दिवस मानला जातो.
आम्ही १९९६ साली आमच्या बंगल्यात शिफ्ट झालो तेव्हा काका आणि उमावाहिनी एकदा येऊन गेले. आमच्या बंगल्याचं इंटिरियर आपलेच एक सभासद बळवंत गोगटे यांनी केलं होतं. काकांना ते एवढं आवडलं की त्यांनी त्यांच्या पुण्यातील आणि कोल्हापुरातील फ्लॅटचं आणि फॅक्टरी ऑफिसेसचं इंटिरियर बळवंत गोगटे यांच्याकडूनच करून घेतलं. काकांकडे गुणग्राहकता होती. त्यांना माणसांची पारख होती आणि सौंदर्य दृष्टीसुद्धा तेवढीच प्रखर होती.
आमचे सदाशिव पेठेतील बालमित्र नंदूशेठ गोराडे हे काकांचे व्याही. त्यांचे वडील तात्या गोराडे आणि आमचे वडील दादासाहेब जानी दोस्त. आमच्या वडलांनी १९३२ साली गोराड्यांच्या जागेत निंबाळकर तालमीजवळ पहिली गिरणी टाकली आणि तिथेच त्यांच्या व्यावसायिक जीवनाला सुरुवात झाली. पुढे नंदूशेठ कारभार पाहायला लागल्यावर ही जागा आम्हाला डेव्हलपमेंटसाठी पाहिजे म्हणून त्यांनी आमच्या मागे तगादा लावला. सुमारे आठदहा वर्षं कोर्ट-कचेऱ्या चालल्या होत्या. एकदिवस काकांचा फोन आला की नंदूशेठला घेऊन येतो आहे. काका मला म्हणाले, ‘अहो भाऊसाहेबऽ माझा जावई तो तुमचा जावई. कशाला हे कोर्ट-कचेऱ्या करत बसताय? मिटवून टाका हे प्रकरण इथेच.’ काकांच्या शब्दाखातर त्या जागेसंबंधीच्या आमच्या भावनांना आवर घालून मी आणि आमचे बंधू दीपक, आम्ही दोघांनी आमच्याच बालमित्राबरोबर इतके वर्षं चाललेलं भांडण अर्ध्या तासात मिटवून जागेचा ताबा देऊन टाकला. आज या गोष्टीला पाचसात वर्षं झाली असतील.
आमच्या या मित्राच्या आठवणी सांगाव्यात तेवढ्या थोड्याच आहेत. जेव्हा डॉक्टर अविनाशजींचा फोन आला तेव्हा हा आठवणींचा पट झरकन माझ्या डोळ्यांसमोरून गेला.
काकांच्या पवित्र स्मृतींस आमची भावपूर्ण आदरांजली!
वृक्षारोपण - एक नम्र आवाहन
मित्रहो…
चांबळी येथे पाणी पंचायतीबरोबर आपण वृक्षारोपणाचे दोन मोठे प्रकल्प राबवले आणि आगामी दोन वर्षंही ते राबवले जातील याची हमी पुढील दोन्ही निर्वाचित अध्यक्षांनी घेतली आहे.
वृक्षारोपणाचे प्रकल्प यशस्वी व्हायचे असतील तर झाडांचं योग्य प्रकारे संगोपन होणं आवश्यक आहे. पाण्याची सोय आणि संरक्षण यांची उत्तम व्यवस्था पाणी पंचायत करत आहे. त्याबरोबरच देखभालीसाठी किमान एका माणसाची आवश्यकता असते. ती जबाबदारी आपण उचलावी अशी रास्त अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी एका स्थानिक माणसाची नेमणूक केलेली आहे. त्याचा वार्षिक खर्च साधारणपणे नव्वद हजार ते एक लाखांपर्यंत अपेक्षित आहे.
माझे असं नम्र आवाहन आहे की, आपण सर्व पर्यावरणप्रेमी सभासदांनी आपला खारीचा वाटा उचलावा आणि आपली बांधिलकी व्यक्त करावी.
याची सुरुवात झाली असून खालील सदस्यांनी कमिटमेंट दिली आहे.
१) पीपी. डॉ सुधांशू गोरे - रु. १०,५००/-
२) रो. रवींद्र प्रभुणे. - रु. ११,०००/-
३) रो. माधुरी किरपेकर - रु. ११०००/-
४) रो. नितीन कुर्ले. - रु. १०५००/- (डिसेंबर)
५) रो. संजीव ओगले - रु. ५५००/-
६) ॲन स्नेहा ओगले - रु. ५५००/-
७) फर्स्ट लेडी ॲन सुगंधा नातू - रु. १०,५००/-
८) ॲन मोहिनी नातू - रु. १०,५००/-
९) पीपी विनायकराव देशपांडे - रु. ५५००/-
(२८ सप्टेंबर २०२०पर्यंतची यादी)
तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. तुमच्या सहकार्याने वृक्ष संवर्धनाचे काम उत्तम होणार ह्यात शंकाच नाही.
क्लबकारी
विविध विभाग संचालक किंवा कमिटी मुख्य संवाद
क्लबमधील विविध प्रोजेक्ट्स, कार्यक्रम, फेलोशिप्स
जावे त्यांच्या क्षेत्रा… / मागील एखाद्या प्रोजेक्टची गोष्ट
तुमचा लेख आवर्जून द्या...
समन्वयक: आनंद / यामिनी