जून २०२१ – दृष्टिकोन

वाळूत उमललेलं फूल

डॉ. गीतांजली पुरोहित

 

१९ फेब्रुवारी २०१९च्या वर्तमानपत्रात कंजार भाट समाजातल्या ‘सुशिक्षित वराने केली वधूची कौमार्य चाचणी’ ही बातमी वाचून मी अत्यंत व्यथित झाले होते. लग्नाच्या पहिल्या रात्री पांढऱ्या चादरीवर पडलेले रक्ताचे डाग जातपंचायतीतल्या लोकांना दाखवून वधूचं कौमार्य निश्चित करणं अन्यथा तिला व्यभिचारी ठरवून दंड देणं, ही ती पद्धत! आज एकविसाव्या शतकात विश्वाचा जो वारू सर्व दिशांना प्रगतिपथावर घोडदौड करतो आहे तो मानवी भावनांशी येऊन मात्र कसा अडखळतो आहे याचं हे ताजे उदाहरण आहे.

योगायोगानं काही दिवसांपूर्वी ‘वाळूत उमललेलं फूल’ हे पुस्तक वाचलं आणि त्याची पुनःश्च उजळणी झाली. या पुस्तकाची नायिका ‘वारीस’ हिचं खूप कौतुक वाटलं आणि एक स्त्री म्हणून तिच्या हृदयीची यातना मनाला चटका लावून गेली. लेखक डॉ.श्रीकांत मुंदरगी यांनी ही कहाणी आपल्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार...! आज स्त्री आणि पुरुष समान भावनेनं खांद्याला खांदा लावून आयुष्याचा आनंद घेत आहेत असं चित्र आपल्याला दिसत असलं तरी जगाच्या पाठीवर कुठेतरी अजुनही स्त्रियांवर अमानुष अत्याचार करणाऱ्या चालीरिती सुरुच आहेत ही वस्तुस्थिती आहे. स्त्रियांवरच्या अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या अशा वारीसची कथा तुम्ही वाचायलाच हवी असं मला वाटलं...

सोमालिया म्हटलं की आठवतात ते फक्त सोमालियन पायरेट्स म्हणजेच समुद्री चाचे! बाकी जगाच्या पाठीवर हा देश नक्की आहे तरी कुठे हे देखील बहुतेकांना माहीत नसतं. सोमालिया इतका गरीब देश आहे की तिथल्या खेड्यापाड्यातल्या जनतेला आधुनिकतेचा स्पर्श सोडा अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांचीही वानवा आहे इतकं दारिद्रय...! ‘शिलिंग’ हे या देशाचं चलन आहे; जे जगात कुठेही चालत नाही. मूळ सोमाली रहिवासी म्हणजे काळे आफ्रिकन लोक. इथं सोमाली ही अगम्य भाषा बोलली जाते. इथले बहुतेक लोक सुन्नी मुस्लीम आहेत. इटलीनी एकेकाळी इथं बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला पण त्या वाळवंटात ना तेल सापडलं ना खनिजं त्यामुळे त्यांनी जरी काढता पाय घेतला तरी आजही इथल्या काही शहरांत अरेबिक, इटालियन आणि इंग्लीश भाषा बोलल्या जातात. ‘मोगादिशू’ ही आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेली सोमालियाची राजधानी...! काही शहरं सोडल्यास इथं क्षितिजापर्यंत पसरलेल्या रुक्ष, वैराण अशा वाळवंटात टोळीवाल्यांच्या पाच-पन्नास खोपटी असलेल्या छोट्या छोट्या वस्त्या असतात; या टोळ्या आजुबाजूची पाण्याची डबकी संपली की सतत पाण्यासाठी नव्या जागेच्या शोधात भटकत राहतात.

‘वाळूत उमललेलं फूल’ हे पुस्तक आपल्याला वर्षांनुवर्षं दुष्काळानी ग्रस्त आणि त्रस्त झालेल्या सोमालियासारख्या देशातल्या एका छोट्या वस्तीतल्या एका खोपटात जन्मलेल्या वारीस डेअरी या मुलीची कथा सांगतं.

१९६५ साली गायकोया नावाच्या वस्तीत दारिद्र्यानं गांजलेल्या मातापित्यांच्या पोटी वारीसचा जन्म झाला. खाण्याचीच वानवा असल्यानं आईचं दूध आटल्यावर घरातल्या चार शेळ्यांचं दूध आणि दुष्काळामुळं त्यांनीही दूध द्यायचं बंद केल्यावर उंटीणीचं आंबट खारट दूध पिऊन वारीस मोठी होत होती. मोहाच्या दारूची धुंदी उतरल्यावर बापानी एखादा पक्षी, ससा मारून घरी आणलाच तर कधीतरी मेजवानी असायची अशी एकूण परिस्थिती!

कळू लागल्यापासून वारीस शेळ्या चरायला घेऊन जाऊ लागली. झुडपं आणि पाण्यासाठी शेळ्या जशा धावत तशी वारीसही त्यांच्या मागे मैल अन् मैल धावायची त्यामुळे दिवसा रणरणतं ऊन आणि रात्री कडाक्याची थंडी अशा विषम हवामानात ती तावून सुलाखून निघत होती. दोन-दोन दिवस उपाशी राहणं किंवा चोवीस तास पाण्याविना काढणं या तिच्यासाठी अगदीच किरकोळ गोष्टी होत्या पण त्यामुळे तिचं शरीर काटक आणि निरोगी बनलं होतं. आफ्रिकन असली तरी ती अगदी काळी नव्हती तर तिनं वडिलांचा सावळा रंग आणि आखीवरेखीवपणा उचलला होता. जंगलात वाढल्यानं भीती कशी ती तिला ठाऊक नव्हती. वारीसला शाळा म्हणजे काय असतं तेही माहीत नव्हतं पण तिच्या मनात अनेक प्रश्न आणि डोळ्यांत असंख्य स्वप्नं होती.

सोमाली स्त्रियाच जरी कुटुंब चालवत असल्या तरी त्यांच्या मताला मात्र घरात काडीची किंमत नव्हती. अखेरचा निर्णय पुरुषाचाच असे! एक दिवस वारीसच्या बापानं वयानं बऱ्याच मोठ्या आणि चार पोरं असलेल्या इसमाबरोबर वारीसचं लग्न ठरवलं कारण या बदल्यात तो पाच उंट आणि पंचवीस शेळ्या देणार होता. वारीसचं मन बंड करून उठलं! मुलीवरच्या प्रेमाखातर रात्री बाप झोपल्याची खात्री करून आईनं वारीसला उठवलं आणि म्हणाली; “हीच ती अखेरची संधी! आता नाही तर कधीच नाही! मला तुझ्या आयुष्याचं वाळवंट होऊ द्यायचं नाही. यापुढे तू आणि तुझं नशीब!’’

वारीस जिवाच्या आकांतानं पूर्वेकडं धावत सुटली. अंधारातून मार्ग काढत, अन्न पाण्याविना, ऊन, थंडी, वाटेतली हिंस्त्र श्वापदं हे सगळे अडथळे पार करून ती मोगदिशूला पोहोचली. पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या वारीसचे डोळे समुद्राचं अथांग पाणी पाहून आश्चर्यानं विस्फारले. नशिबानं वारीसला तिथं तिची मावशी भेटली. मावशीचे यजमान सोमालियाचे राजदूत म्हणून इंग्लंडला निघाले होते. त्यांनी घरकामासाठी वारीसला आपल्याबरोबर घेतलं. नशीब वारीसला लंडनला घेऊन आलं. तिथल्या भव्य महालात राहताना स्वर्ग म्हणतात तो हाच असेल असं तिला वाटलं. तिथं देखील दिवसभर कष्टाचं जीवन असलं तरी पोटभर खायला मिळत होतं आणि पाण्यासाठीची वणवण नव्हती याचाच तिला कोण आनंद होता. मुदत संपल्यावर मावशीच्या कुटुंबाला सोमालियाला परतावं लागलं... पण वारीसनी परत मायदेशी न जाण्याचा निर्धार केला आणि स्वतःचा पासपोर्टच लपवून ठेवला. आयुष्याची निम्मी लढाई तिनं तिथंच जिंकली! इंग्लंडमध्ये एकटीनं निभावून नेणं सोपं नव्हतं. इंग्लीश भाषा येत नसताना, वर्क परमिट नसतांना, विविध नोकऱ्या करत, धडपडत ती नशीब आजमावत राहिली. एक दिवस पोटाची भूक भागवायला चार पैसे मिळतील म्हणून धैर्य एकवटून एका अनोळखी फोटोग्राफर समोर ती फोटो काढायला उभी राहिली... आणि वारीसचा फोटो १९८७च्या ‘पिरेल्ली’ कलेंडरच्या मुखपृष्ठावर छापला गेला. जगाच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या हजारो छायाचित्रांतून अशी निवड होणं हा फॅशनच्या जगतातला सर्वोच्च सन्मान समजला जातो. पाहतापाहता वारीस जगप्रसिद्ध मॉडेल झाली. ‘वाळूत उमललेलं फूल’ या पुस्तकात वारीसची हीच ‘मेड टू मॉडेल’ कहाणी वाचताना आपण आवाक होऊन जातो. थोड्याच कालावधीत रॅग्ज टू रीचेस ही अशक्यप्राय वाटणारी तिची कथा जगात सर्वश्रुत झाली.

वारीसनी आजवर फक्त अपमान आणि अवहेलनाच सोसली होती पण आज कौतुकाचा प्रपात तिच्यावर कोसळत होता. पिरेल्लीनी तयार केलेल्या त्यावर्षीच्या कॅलेंडरवर फक्त कृष्णवर्णीय स्त्रियांचे फोटो होते. त्यांतील इतर स्त्रिया फॅशनच्या आणि ॲक्टिंगच्या जगात आधीच प्रसिद्ध होत्या. बट वारीस वॉज अ न्यू ब्राईट स्टार बॉर्न फ्रॉम द ब्लॅक होल! सोमालियात खरा पाऊस देखील कधीतरीच पडत असे आणि तो ही भुरभुर पडत असे आणि आज वारीसवर पैशांचा धोधो पाऊस कोसळत होता. ‘वारीस’ म्हणजे वाळवंटात उमलणारं एक केशरी रंगाचं फूल! वैराण वाळवंटात उमललेल्या या फुलाचा सुगंध आता जगभर दरवळू लागला होता.

वारीसला आता आपल्या मायभूमिची आणि आपल्या जन्मदात्या आईची आठवण दाटून येत होती. वारीसला हे सर्व वैभव तिच्या आईला दाखवायचं होतं. आईमुळेच आपल्याला हे भाग्य लाभल्याची तिची दृढ भावना होती... पण सोमालियातल्या त्या विस्तीर्ण वाळवंटात एका छोट्या भटक्या टोळीतल्या तिच्या आईला शोधायचं तरी कसं? मग भेटली का तिला तिची आई? पुस्तक वाचताना आपलेही डोळे कधी वाहू लागतात ते समजत नाही.

१९९५ साली बीबीसीनी वारीसच्या जीवनावर ‘अ नोमॅड इन न्यूयॉर्क’ नावाचा एक लघुपट केला. दारिद्र्यातून वैभवाकडं वाटचाल केलेल्या एका अजाण, अडाणी सोमालियन मुलीची ती जीवनकहाणी होती. मनात मागासलेपण आणि कृष्णवर्णाचा न्यूनगंड असलेल्या आफ्रिका खंडातल्या असंख्य मुलींना हा लघुपट दीपस्तंभासारखा मार्गदर्शक ठरला. वारीसमुळे नकाशावर नगण्य असलेल्या सोमालियाची दखल संपूर्ण जगानं घेतली. १९७८साली तेरा वर्षांची वारीस लंडनला आली. वयाच्या सतराव्या वर्षांपर्यंत तिला शिक्षणाचा आणि इंग्लीशचा गंध नव्हता... पण जिद्दीनी ही मुलगी इंग्लीश भाषा उत्तम प्रकारे शिकली आणि तिनं तेहेतिसाव्या वर्षी अस्खलित इंग्लीशमध्ये ‘डेझर्ट फ्लॉवर’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध केलं. तिला मिळालेल्या अमाप संपत्तीतून तिनं आफ्रिकन स्त्रियांसाठी आणि आफ्रिकन मुलांसाठी शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य आणि आरोग्य याविषयांत खूप मोठं सामाजिक काम सुरू केलं. आजही डेझर्ट फ्लॉवर नावानी सुरू केलेलं फाऊंडेशन यासाठी हरतऱ्हेनी काम करत आहे.

एक दिवस लॉरा झिव्ह नावाची स्त्री पत्रकार वारीसला भेटायला आली. मुलाखतीत ती म्हणाली; ‘मॉडेल वारीसला आता सारं जग ओळखतं. मला तुझ्या बालपणाविषयी जाणून घ्यायचे आहे.’ वारीसनं इतके दिवस हृदयाच्या खोल कप्प्यात गाडून टाकलेल्या; बालपणी भोगलेल्या भयानक यातना, निर्दय आणि निष्ठुर आठवणी त्या बेसावध क्षणी भावनेच्या भरात भडाभडा सांगितल्या. लॉराचा त्या भीषण अनुभवांवर विश्वास बसेना. तिनं ती मुलाखत फॅशनला वाहिलेल्या ‘मेरी क्लेयर’ या मासिकात छापून आणली आणि संपूर्ण जग खडबडून जागं झालं.

पाच वर्षांची वारीस सोमालियातल्या अडाणी अंधश्रद्ध आणि पुरुषांची मक्तेदारी असलेल्या समाजातल्या निर्घृण परंपरेची बळी ठरली होती. स्त्रीची योनी म्हणजे नरकाचं प्रवेशद्वार! मुलगी विवाहास योग्य ठरवायची तर तिच्या कौमार्याचं प्रशस्तीपत्रक हवं... म्हणून वयात येण्यापूर्वीच तिच्या योनीमार्गाची कत्तल करायची! तिच्या स्त्रित्वाची अक्षरशः चिरफाड! फिमेल जनायटल म्युटीलेशन! क्लायटोरीस, लेबिया मेजोरा आणि लेबिया मायनोरा हे अवयव चक्क कापूनच टाकायचे. समागमात मिळणारं सर्वोच्च स्वर्गीय सुख स्त्रीला कधीच मिळू नये आणि ती व्यभिचारी होऊ नये म्हणून पुरुषसत्ताक समाज पद्धतीनं केलेली ही नराधम व्यवस्था! वारीसनं हे स्वतः सोसलं होतं. तिला मोहाची दारू पाजून, नवीन कपडे घालून आई आणि बहीण कुठेतरी घेऊन गेल्या होत्या. अर्धवट बेशुद्धीत हात पाय बांधलेल्या अवस्थेत तिनं पाहिलं होतं की एक जिप्सी स्त्री अर्धवट तुटलेल्या वस्तऱ्यानं तिचे दोन मांड्यांमधले अवयव कापून काढत होती. इतकेच करून ती थांबली नाही तर बाभळीच्या काट्यांनी तिथं खालच्या भागात भोकं पाडून सुईदोऱ्यानी ती जागा तिनं चक्क शिवून टाकली. मुलगी कुमारिका असल्याचा हा घ्या पुरावा!

या प्रक्रियेत अनेक मुली घाबरून, रक्तस्राव होऊन, जंतुसंसर्ग होऊन मरून जात, ज्या जगत त्यांना आयुष्यभर मरणप्राय वेदना सहन करावी लागे. बऱ्याचजणी गर्भधारणेला मुकत किंवा प्रसूतिदरम्यान दगावत. वारीसच्या दोन बहिणी या अघोरी प्रकारात मृत्युमुखी पडल्या होत्या. वारीस म्हणाली,“मी मात्र जिवंतपणी मरणयातना भोगणारी, कामक्रीडेच्या परमोच्च सुखाला कायमची मुकलेली, स्त्री नावाचं संवेदनाहीन यंत्र होऊन उरले आहे.” हे सगळं वर्णन वाचताना आपल्या आतड्याला पीळ पडतो. वारीसच्या त्या मुलाखतीनं हे विदारक सत्य सर्व जगासमोर आलं. युनोसारख्या जागतिक संघटनेला वारीसच्या या कहाणीची म्हणजेच एफजीएम या मानवतेला काळिमा फासणाऱ्या प्रथेची दखल घ्यावीच लागली. अहवालावरून असं लक्षात आलं की दररोज जगातल्या ६००० मुली या प्रथेला बळी पडत आहेत. या शस्त्रक्रिया फिरस्त्या बायका रानावनात, वाळवंटात, वस्तीपासून दूर, कोणत्याही प्रकारची भूल न देताच करतात आणि या मुलींचा आरडाओरडा, किंकाळ्या ऐकू येऊ नयेत म्हणून स्त्रियाच जोरजोरात ढोल वाजवून मोठ्यानं गाणी म्हणतात. युरोपात अमेरिकेत पंधरा ते सतरा लाख स्त्रिया या प्रथेची शिकार झालेल्या आढळल्या. मग फिमेल जनायटल म्युटिलेशनला पायबंद घालण्याच्या उद्देशानं जागतिक चळवळ सुरू झाली. पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा या साऱ्यांवर पाणी सोडून वारीसनं फिमेल जनायटल म्युटिलेशनसारख्या पाशवी प्रथेला आळा घालण्यासाठी आणि आफ्रिकन देशातल्या मागासलेल्या स्त्रियांच्या उद्धारासाठी आपलं सारं आयुष्य वाहून घेतलं. आजमितीला एफजीएम विरुद्धच्या या चळवळीमुळं या अघोरी पद्धतीला बळी पडणाऱ्या मुलींची संख्या आता निम्म्यानं कमी झाली आहे. वारीसच्या कार्याला मदत म्हणून बिल गेट्स आणि वॉरेन बफे यांसारख्या अनेक धनवान लोकांनी भरभरून आर्थिक सहकार्यही केलं आहे. समाजिक सेवेसाठीचे असंख्य मोठमोठे पुरस्कार, अनेक पदव्या, सत्कार आणि अगणित मानसन्मान यांचा वारीसवर अविरतपणं वर्षाव चालू आहे.

अनेक देशांनी या चळवळीला विरोधही केला. वारीसला जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला गेला... पण जागतिक दडपणाच्या रेट्यामुळं या प्रथेवर कायदेशीर बंदी घातली गेली. युनोच्या एफजीएम प्रतिरोधक मोहिमेचं नेतृत्व करण्याचा बहुमान वारीसला देण्यात आला. वारिसचा आवाज आता जागतिक व्यासपीठावरून ऐकू येऊ लागला. वारिसनं ‘डेझर्ट डॉन’, ‘डेझर्ट चिल्ड्रन’, ‘लेटर टू माय मदर’, ‘ब्लॅक वुमन व्हाइट कंट्री’ अशी अनेक पुस्तकं प्रकाशित केली. या सर्व पुस्तकांची जगातल्या सर्व प्रमुख ६५ भाषांमध्ये भाषांतरं झाली आणि त्यांची रेकॉर्ड्स ब्रेक करणारी विक्री झाली आहे. हॉलिवूडनं सुदधा २०११साली ‘डेझर्ट फ्लॉवर’ हा वारीस डेअरीच्या जीवनावर चित्रपट प्रदर्शित केला आहे. वारीसच्या आयुष्यातल्या चंद्राप्रमाणं लखलखणाऱ्या एका अंगानं सर्वांची मनं जिंकली पण दुसऱ्या रखरखीत बाजूनं मात्र लोकांच्या काळजाला हात घातला. वारीसच्या या कार्याकरता तिला नोबेल पारितोषिक मिळावं यासाठी जोरदार शिफारस केली जात आहे. त्यासाठी माझंही एक अनुमोदन! तुमचं?

सत्पात्री दान...

रो. योगेश नांदुरकर

 

प्रिय पात्रा

तू अगदी नाही म्हणजे नाही ताकास तूर लागून देत... म्हणून शेवटी हा इमेल प्रपंच!

नक्की तुझ्या मनात काय आहे हे मी अनेकवेळा ताडायचा प्रयत्न केला. ते अगदी अंतरंगात डोकावणं वगैरेपण करून बघितलं... पण छ्याऽ कसलं काय...?
म्हणजे बघ हं… तू जसा डोळ्यांसमोर दिसतोस, भावतोस तसा लेखनात उतरताना नसतोस रे...! वाटतं... मी शाकाहारी आहे म्हणजे तूपण शाकाहारी असणार… मी मद्यपान करत नाही म्हणजे तूपण दारू पीत नसणार... पण जसजशी गोष्ट उलगडत जाते नाऽ तसतसा तू केवळ मांसाहार नि मद्यपानच नाही तर भांग-गांजा यांचाही कैफ लुटताना सापडतोस.

तो वाचक तुला सुरुवातीपासून त्याच्या कल्पनाविश्वात रंगवायला लागतो, निळ त्याच्यापुरता. काहींना तू एकसारखा भावतोस तर काहींना भावभिन्न. मग तेही तुझ्याबद्दल काही आडाखे बांधायला लागतात. काही जुळतात तर काही फसतात. काही आडाखे जुळले तर ते आधीच जोखल्यामुळं गंमतच निघून जाते किंवा कधीकधी असं झाल्यामुळं आत्मज्ञानाचा अहंभाव. काही आडाखे फसल्यामुळं धक्का बसतो किंवा फसगत झाल्यासारखं वाटतं. त्या बिचाऱ्या वाचकाच्या मनःपटाचा ठाव घेतोस नि त्याची पार कठपुतळी करून टाकतोस. तू नदीच्या पात्रासारखा अनाकलनीयही असतोस. पाणी काय नि संचित काय... दुथडी भरून वाहायला लागलं की कधी पात्र बदलतं ते कळतच नाही.

काहीवेळा तू मला हुलकावणी देत त्या प्रतिभेशी सलगी करत, वशिला लावत मलाही तोंडात बोटं घालायला लावशील असं वागतोस. कसलं सुचलंय ना... असं मनोमन वाटून तू अप्रूप आनंदही देऊन जातोस. तू एकाचवेळी अनेक वाचकांच्या भावविश्वात बहरत असतोस… कसा रे असा तू सर्वव्यापी, अथांग. तू कथाकादंबरीत आढळतोस; कवितेत ढळतोस; व्यक्तिचित्र, चरित्र, आत्मचरित्र, ललित लेख, निबंध; सगळीकडं असतोस. तुला पुन्हा एकदा न्याहाळलं नाऽ की तुझ्यात कुठंकुठं मी मलाच बघतो तर कधी आवडत्या व्यक्तीला, कधी न पाहिलेल्या व्यक्तीला तर कधी कल्पनेत असलेल्या व्यक्तीला. या सगळ्यांचे गुणावगुण बाळगून कसा वावरू शकतोस रे...? ना तुला लिंगाचं वावडं ना एखादी वस्तू असण्याचं...

अरेऽ तुला सांगतो… म्हणजे तू अनुभवलं असशीलच म्हणा… काही लेखक तर पात्राचं व्यक्तस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य नि अभिव्यक्तिस्वातंत्र्य यांचा अजिबात मुलाहिजा न ठेवता त्या पात्राला अगदी हव्वं तस्सं वागायला लावतात. बघ नाऽ काही आईबाबा आपल्या मुलांना ताब्यात ठेवतात नाऽ अगदी तस्सं... तर काही लेखक आपल्या पात्राला मोकाट सोडून देतात. त्याला हवं तसं वागू देतात. थोडे संस्कार म्हणून काही बात असते की नाही. काही लेखकांना तर त्यांच्या पात्राला (पुरुष असला तरी...) आजाबात हात लावलेला चालत नाही. शेवटी संगोपन, व्यक्तिमत्त्व नावाची चीज काही असते की नाही...

एयऽऽ मला शंका येतीय आता… हेही सगळं तूच तर लिहून घेत नसशील ना माझ्याकडून...? नको… नको… मग थांबलेलंच बरं आत्ता...
बोलत राहूच.…

तुझा जन्मदाता
लेखक

ता. क. - एक गंमत तुला सांगून ठेवतो. कुणाला सांगू नकोस. हा इमेल मी इतर पात्रांना सीसी केलाय नि सर्व लेखकांना, संपादकांना बीसीसी केलाय....