जून २०२१ – कलाकारी

रोमन साम्राज्य - एक रक्तरंजित साम्राज्य - भाग २

रो. डॉ. सुभाष देशपांडे

 

निरो हा रोमन साम्राज्याचा पाचवा सम्राट आणि कदाचित सगळ्यांत जास्त रक्तपिपासू... त्याच्या अगोदरच्या चार सम्राटांच्या काळात खून, विषप्रयोग हे नेहमीचेच होते. तीन सम्राट अशाप्रकारे मारले गेले. चौथा सम्राट क्लॉडिअस याने त्याची पुतणी अग्रिपिनाशी दुसरे लग्न केले. तिला पहिल्या नवर्‍यापासून झालेला लूसिअस् नावाचा अकरा वर्षांचा मुलगा होता. हाच तो पुढील सम्राट निरो होय. निरो सत्तेवर यावा म्हणून अग्रिपिनाने हत्याकांड सुरू केले. स्वतःचा नवरा सम्राट क्लॉडिअसलासुद्धा विषप्रयोगाने मारले आणि इतर दावेदारांना बाजूला सारून आपल्या मुलाला निरोला सम्राट म्हणून घोषित केले. लवकरच अग्रिपिना आणि निरो या दोघांमध्ये मतभेद सुरू झाले आणि अग्रिपिनाने मृत क्लॉडिअसचा पहिला मुलगा ब्रिटानीकस् हा सम्राट होण्यास जास्त लायक आहे असे घोषित केले. निरोने एका मेजवानीमध्ये ब्रिटानीकसला विषप्रयोगाने मारले. अग्रिपिना निरोच्या महत्त्वाकांक्षेमध्ये अडसर होती म्हणून ५९ साली निरोने आपल्या आईचा काटा काढला. असे म्हणतात की जेव्हा मारेकरी अग्रिपिनाला मारावयास आले तेव्हा तिने मारेकऱ्यांना आपल्या ओटीपोटात सुरा खुपसायला सांगितले कारण निरोचा जन्म तेथून झाला होता. निरो अत्यंत विलासी होता. त्याला अभिनयाची आणि संगीताची आवड होती. निरोचे लग्न मृत सम्राट क्लॉडिअसची मुलगी आणि ब्रिटानिकसची बहीण ऑक्टोव्हिआबरोबर झाले होते. निरोला त्याची प्रेयसी पॉपीबरोबर करावयाचे होते म्हणून त्याने त्याच्या वीस वर्षे वयाच्या पत्नीला ऑक्टोव्हिआला ठार मारले. १९ जुलै ६४ साली रोममध्ये एका लहानशा दुकानाला आग लागली आणि म्हणता म्हणता सर्वत्र पसरली. रोम नऊ दिवस जळत होते. निरो त्यावेळेस रोमपासून तीस मैलांवर होता. त्याने लगेच सर्व सूत्रे हातांत घेऊन आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आग विझविल्यानंतर त्याने रोमची पुनर्बांधणीसुद्धा केली. त्यांमध्ये स्वतःचा पण हात धुवून घेतला आणि एका अद्वितीय अशा सोनेरी राजवाड्याची उभारणी केली या सर्व गोष्टींकरिता अमाप पैसा लागला जो रयतेकडून वसूल करण्यात आला त्यामुळे रयत आणि उमराव दोघेही नाराज झाले. निरोच्या हत्येचा कट शिजला पण त्याचा पत्ता निरोला लागला. शेकडो लोक मारण्यात आले किंवा त्यांनी आत्महत्या केल्या. त्यानंतरही निरोने हत्याकांड चालूच ठेवले. स्वतःची पत्नी आणि तिच्या पोटातील मूल निरोने लाथाबुक्क्यांनी मारले. राज्यात सर्वत्र बंडाळी सुरू झाली. सर्वांनी निरोशी प्रतारणा केली. निरोच्या खर्चिक स्वभावामुळे रोमन साम्राज्य आर्थिक अडचणीत सापडले होते. पैशांची कमतरता भागवण्यासाठी निरोने त्यावेळेस रोमन साम्राज्यात असलेल्या ज्युदाई उर्फ ज्यू समाजाच्या प्रदेशांमधून मोठ्या प्रमाणात कर रुपाने पैसा गोळा केला. त्याचबरोबर ज्यू समाजाच्या सर्वांत पवित्र देवळाच्या खजिन्यातील चांदी-सोने लूटले गेले त्यामुळे ज्यू समाज बंड करून उठला. बंड शमवण्यासाठी रोमन सैन्य पाठविण्यात आले. जवळजवळ ३००० लोकांची हत्या करण्यात आली. सार्वजनिक लूट करण्यात आली ६६ सालच्या मे महिन्यापर्यंत ज्यू समाजाचे बंड चालूच राहिले. ६६ सालच्या ऑक्टोबर महिन्यात रोमन सैन्य ज्यू सैन्याच्या सापळ्यात सापडले आणि त्यांचे ६००० सैनिक मारले गेले. निरोने व्हेसपासिअन् आणि त्याचा मुलगा टायटस् यांच्या नैतृत्वाखाली ६०,००० सैनिक ज्युडाई प्रांतात पाठवले. ६७ सालापर्यंत ४७ दिवसांच्या लढाईनंतर जोटपाटा किल्ला रोमन सैन्याने जिंकला. रोमन सैन्याने दहशत बसविण्याकरिता ज्युंची सररास कत्तल केली. तारीची येथे ६००० ज्यू मारले गेले आणि ३१,००० ज्युंना गुलाम म्हणून विकले. गामला येथे ४००० ज्यू मारले गेले तर ५००० ज्यू लोकांनी एका दरीत उड्या मारून आत्महत्या केल्या.
८ जून ६८ साली निरोने स्वतःच्या मानेत सुरा खुपसून आत्महत्या केली त्यावेळेस तो एकोणचाळीस वर्षांचा होता. अशारितीने क्रूरकर्मा निरोचा शेवट झाला.

जून ६८ साली निरोने आत्महत्या केली आणि रोमन साम्राज्यात गोंधळ माजला. ९ जुलै ६९ साली व्हेस्पासिअनला रोमन साम्राज्याचा सम्राट म्हणून घोषित केले गेले. रोमन साम्राज्यात परत यादवी सुरू झाली. त्यात व्हेस्पासिअनचा विजय झाला. या यादवीत हजारो रोमन ठार झाले. व्हेस्पासिअनने आपला मुलगा टायटसला ज्युडाईमधील मोहिमेचा प्रमुख नियुक्त केले. मार्च ७० साली टायटसने जेरूसलेमवर हल्ला केला. जेरूसलेमभोवती एक तटबंदी बांधण्यात आली ज्यामुळे ज्यू लोकांची उपासमार सुरू झाली. जेरूसलेमच्या पवित्र देवळापर्यंत जाण्यास रोमन सैन्याला तीन महिने लागले. ज्यू सैन्याची आणि नागरिकांची सररास कत्तल करण्यात आली. पवित्र देऊळ संपूर्ण लुटले गेले आणि भस्मसात केले. देवळातील खजिना लुटला गेला आणि त्याला आग लावली गेली. त्या आगीत हजारो स्त्रिया आणि मुले बळी पडली. रस्त्यांवर प्रेतांचा खच पडला होता. ११ लाख ज्यू मारले गेले. ९७००० गुलाम केले गेले. ७४ सालापर्यंत उरलेल्या बंडाळीचा बिमोड करण्यात आला. मासदा येथे ९६६ बंडखोर ज्यू एका दुर्गम किल्ल्यातून लढले पण शेवटी सर्वांना आत्महत्या करावी लागली.
जेव्हा टायटस रोममध्ये आला तेव्हा त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. लुटलेल्या पैशांतून ८० साली जगप्रसिद्ध कोलोसियम् बांधण्यात आले. त्याच्या एका कोपर्‍याजवळ एक कमान बांधण्यात आली ज्यामधे जेरूसलेमच्या लुटीची शिल्पे आहेत. ही दोन्ही बांधकामे अजूनही उभी आहेत आणि आपल्यापैकी कित्येकांनी बघितली आहेत.
अकरा ऑगस्ट ११७ साली चौदावा सम्राट हाड्रियन् सिंहासनावर बसला. त्याच्या २१ वर्षांच्या कारकिर्दीत रोमन साम्राज्यात शांतता आणि सुबत्ता नांदली. ही सुबत्ता पुढील १४० वर्षे चालू राहिली. २३५ ते २८५ या वर्षांत रोमन साम्राज्यावर अनेक आक्रमणे झाली. २८५ साली डायक्लेशीयन् रोमन साम्राज्याचा सम्राट बनला. त्याने अनेक सुधारणा केल्या. त्यामधील एक म्हणजे साम्राज्य चार भागात विभागले आणि चार सम्राट नेमले. दोन मुख्य आणि दोन दुय्यम सम्राट.
६६ सालापासून निरोच्या काळात ख्रिश्चनांचा जो छळ चालला होता तो डायक्लेशीयनच्या काळात शिगेला पोहोचला. ३०५ साली डायक्लेशीयनने सत्ता सोडली आणि त्याने स्थापलेल्या चार विभाग आणि चार सम्राट या पद्धतीचा बोजवारा उडाला. ३०६ साली एक मुख्य सम्राट कॉनस्टंटिअस् मृत्यू पावला आणि त्याचा मुलगा कॉनस्टन्टीन त्याच्या जागी पश्चिम भागाचा सम्राट म्हणून निवडून आला. पुढील सहा वर्षे पूर्व आणि पश्चिम सम्राटांमध्ये सत्तेकरता संघर्ष चालू राहिला. पश्चिमेकडील सम्राट कॉनस्टंटीनने पूर्वेकडील सम्राट मॅक्सेनशिअस् विरुद्ध युद्ध पुकारले आणि रोमन साम्राज्यात परत यादवी सुरू झाली. मॅक्सेनशिअसच्या सैन्यात एक लाख सैनिक होते तर कॉनस्टंटीनजवळ चाळीस हजार सैनिक होते परंतु विशेष म्हणजे कॉनस्टंटीनच्या सैन्यात ख्रिश्चन सैनिक होते कारण कॉनस्टंटीनला ख्रिश्चनांविषयी सहानुभुती होती. २८ ऑक्टोबर ३१२ साली कॉनस्टंटीनने मॅक्सेनशिअसचा पराभव केला आणि रोमन साम्राज्यात ख्रिश्चन धर्म सुरू झाला.
३९३ साली पूर्वेकडील सम्राट म्हणून कॉनस्टंनटीनचा मेव्हणा लिसिनिअस् याची नियुक्ती झाली. कॉनस्टंनटीन आणि धर्माने रोमन असलेल्या लिसिनिअसमध्ये धार्मिक समझोता होता. तो समझोता ३१६ साली मोडला गेला आणि त्या दोघांत युद्ध सुरू झाले. ३२४ साली लिसिनिअसचा पराभव झाला. लिसिनिअस् आपल्या पत्नीच्या आणि कॉनस्टनटीनची बहीण कॉनस्टनटीनच्या सांगण्यावरून सम्राटाला शरण गेला. त्या युद्धात एक लाख सैनिक मारले गेले. एका वर्षातच कॉनस्टनटीनने आपल्या मेव्हण्याला आणि नऊ वर्षांच्या भाच्याला फासावर चढवले. ३२६ साली कॉनस्टनटीनने आपली पत्नी फॉसटा आणि पहिला मुलगा क्रिसपस् यांची हत्या केली. कॉनस्टनटीनने कॉनस्टंटीनोपल म्हणजेच इस्तांबूलची स्थापना केली. कॉनस्टनटीन २२ मे ३३७ साली मृत्यू पावला.
सन ४७६ मध्ये जर्मन राजा ओडोव्हकर याने साम्राज्य खालसा केले आणि पश्चिम रोमन साम्राज्याचा शेवट झाला. पूर्व साम्राज्य आणखीन एक हजार वर्षे चालू राहिले १२०० वर्षे सलग तग धरलेल्या साम्राज्याचा असा शेवट का झाला असावा? याचे मुख्य कारण म्हणजे बार्बारिअन जमातींनी रोमन साम्राज्यावर केलेले सततचे हल्ले हे असावे. सन ३७८ ते ४७६ या शंभर वर्षांत बार्बारिअननी पश्चिम साम्राज्य अगदी खिळखिळे करून टाकले होते. बार्बारिअन म्हणजे जे रोमन भाषा बोलत नाहीत आणि म्हणून ज्यांचे बोलणे रोमन लोकांना बडबड केल्यासारखेच वाटायचे ते... आपल्याकडील बडबड हा शब्द बार्बारिअन या शब्दावरून आला का? गोथ, व्हॅन्डाल, ॲलन, सुएव्ही, वगैरे समाज बार्बारिअन म्हणून ओळखले जात असत.
सन ३७६च्या सुमारास आजच्या बल्गेरिया आणि रूमानिया दरम्यान दोन लाख गोथ लोक रोमन साम्राज्यामध्ये स्थलांतर करण्यासाठी जमले होते. त्यांना त्यांच्या प्रदेशातून हून लोकांनी हाकलून दिले होते. हे हून मंगोलियामधून आले होते. हिंदुस्थानाच्या इतिहासातसुद्धा हून लोकांचा उल्लेख आहे. आज युरोपमधे जे स्थलांतर चालू आहे त्याचा हा एक नमुनाच होय. ३७६-३७७ सालांत या निर्वासितांचे खूप खूप हाल झाले. ३७७ ते ३८२ सालांत गोथ आणि रोमन सैन्यांत लढाया झाल्या. ९ ऑगस्ट ३७८ साली तुर्कस्तानातील एडीर्न येथील लढाईत रोमन सैन्याचा पराभव होऊन १३००० रोमन सैनिक मारले गेले. या गोथिक सैन्याच्या सेनाप्रमुखाचे नाव ॲलरिक असे होते.
४०८ साली ॲलरिकने इटलीवर हल्ला केला आणि एकामागून एक शहरे काबीज केली. त्यानंतर त्याने रोम शहराला वेढा घातला. तीन दिवसांकरिता वेढा उठविण्यासाठी ॲलरिकने रोमकडून प्रचंड खंडणी उकळली. सरतेशेवटी २४ ऑगस्ट ४१० साली गोथिक सैन्याने रोम शहरावर हल्ला केला आणि रोम शहर लुटण्यात आले. ख्रिश्चन देवळांना हात लावण्यात आला नाही परंतु इतर धर्मांची देवळे लुटण्यात आली. स्त्रियांवर, मुलींवर अत्याचार झाले. जे पळून गेले ते वाचले... जे हातांत सापडले त्यांची हत्या करण्यात आली. ४१० साली अॅलरिक मृत्यू पावला.
३७६ सालापासून हून समाजाच्या आक्रमणांमुळे रोमन साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला होता. हून लोकांनी ॲटिली द हून या सेनापतीच्या नैतृत्वाखाली ४३० साली परत परत रोमन साम्राज्यावर आक्रमणे केली. सन ४५२ पर्यंत हून सैन्य मिलान शहरापर्यंत आले परंतु वाटेत ॲटिलाचे निधन झाले. आतापर्यंत फ्रान्स, स्पेन, उत्तर अफ्रिका हे प्रदेश निरनिराळया बार्बारिअन्सच्या ताब्यात गेले होते. खरेतर पश्चिम रोमन साम्राज्य आता रोमन सम्राटांच्या ताब्यात राहिले नव्हते. ते ओडोव्हकर या जर्मन राजाच्या ताब्यात होते. त्याने पश्चिम साम्राज्य खालसा केले आणि पश्चिम सम्राटाची राजवस्त्रे पूर्व सम्राट झेनो याच्याकडे पाठवून दिली. अशारितीने २७७३ वर्षांपूर्वी रोम्युलस् आणि रिमस् या जुळ्या बंधूंनी स्थापलेले साम्राज्य १२२९ वर्षांच्या रक्तरंजित प्रवासानंतर संपुष्टात आले.

‘गंध’ पुण्याचा गेला सांगून...

रो. अरविंद शिराळकर

 

देवानं दिलेल्या इंद्रियांपैकी चार इंद्रियांच्या साहाय्यानं माणूस आस्वाद घेऊ शकतो. डोळ्यांनी पाहून, कानांनी ऐकून, तोंडानं चव घेऊन आणि नाकानं गंध (वास) घेऊन. एखाद्या अस्सल पुणेकराचे डोळे आणि कान बंद करुन जर त्याला पुण्याची सफर घडवली तर तो त्याला नाकानं जाणवणाऱ्या त्या त्या परिचित गंधांवरुन ते ते ठिकाण हमखास सांगू शकतो...

मी हा प्रयोग एकदा केला. एका अस्सल पुणेकर मित्राच्या डोळ्यांवरून आणि कानांवरून काळी पट्टी बांधून त्याला पुण्यातल्या अनेक ठिकाणी गाडीवरुन उलटंसुलटं फिरवलं. मी जिथं-जिथं त्याला घेऊन गेलो त्या-त्या ठिकाणाबद्दलची पोपटासारखी ‘अचूक उत्तरं’ त्यानं मला दिली...

पहिल्यांदा त्याला फर्ग्युसन रोडवरच्या एका सुप्रसिद्ध हॉटेलसमोर नेलं. येणाऱ्या सांबाराचा गंध घेऊन तो छातीठोकपणं बोलला, ‘वैशाली!’

तिथून त्याला गुडलककडं आणल्यावर कॉफीचा टिपिकल वास घेऊन तो म्हणाला, ‘रूपाली!’ आपटे रोडला घेऊन गेल्यावर गरमगरम पॅटीसच्या वासावरुन त्यानं ओळखलं, ‘संतोष बेकरी!’ डेक्कनच्या छोट्या पुलावरून जाताना नदीचा तो वास आल्यावर त्यानं माझ्या कानात हळू आवाजात सांगितलं, ‘भिडे पूल’ तिथून शनिवारात गेल्यावर मिरची, हळद, शिकेकाई, वेखंड, या दळणांच्या संमिश्र वासावरुन तो ओरडला, ‘अरे मित्रा, हेच ते ठिकाण जिथं या मसाल्याच्या वासानं पुणेरी स्त्रियांच्या नाकांचे शेंडे लाल होतात... राजमाचिकर गिरणी.’

जुन्या प्रभात टॉकीजच्या चौकात त्याला एका दुकानापुढं उभं केलं, नव्या कोऱ्या पुस्तकांचा गंध त्याच्या नाकात शिरल्यावर तो म्हणाला, ‘अप्पा बळवंत चौक’ कुंटे चौकात त्याला घेऊन गेल्यावर नव्या कोऱ्या साड्यांच्या वासावरुन त्यानं ओळखलं, ‘हा तर लक्ष्मी रोड!’ सिटीपोस्टकडून पुढच्या चौकात गेल्यावर अत्तरांच्या वासांवरुन तो पुटपुटला, ‘सोन्या मारुती चौक!’

तिथून रविवार पेठ रेल्वे बुकींग ऑफिसकडे गेल्यावर उदबत्त्यांच्या येणाऱ्या वासांवरून तो म्हणाला, ‘विठ्ठलदास सुगंधी.’ गणेशोत्सवात दहा दिवस जिथं दगडूशेठ हलवाई गणपती असतो तिथं गेल्यावर चक्क्याच्या, खव्याच्या वासांवरून त्यानं ओळखलं की आपण बुधवार पेठेतल्या दत्त मंदिराजवळ आहोत. निंबाळकर चौकात आल्यावर तो वासावरुनच मिटक्या मारत म्हणाला, ‘सुजाता मस्तानी!’ नेहरु चौकातल्या कोपऱ्यावरच्या दुकानापुढं उभं राहिल्यावर येणाऱ्या भट्टीतल्या ताज्या फुटाण्यांच्या वासावरून त्यानं सांगितलं, ‘गिरे फरसाण.’ कांद्याबटाट्याच्या वासावरून तो म्हणाला, ‘आपण जुन्या आणि नव्या मंडईंच्या मधे आहोत.’ टिळक रोडवरच्या टिळक स्मारक चौकात गेल्यावर त्याला अस्सल ‘पुणेरी’ जेवणाचा गंध जाणवला आणि तो म्हणाला, ‘बादशाही बोर्डींग.’ एव्हाना पेट्रोल भरण्यासाठी मी नेहमीच्या ठिकाणी गेलो तेव्हा या पुणेकराच्या तोंडून शब्द बाहेर पडले, ‘कुलकर्णी पेट्रोल पंपाशिवाय पुणेकरांना पर्याय नाही’. पेट्रोल भरल्यानंतर मी कुमठेकर रस्त्याला वळलो. तिथून जाताना येणाऱ्या तांबड्या रस्याच्या  वासावरून हा शुद्ध शाकाहारी मला सांगू लागला, ‘आवारे मटनाची खानावळ!’. मला चहाची तल्लफ आली आणि मी चिमणबागेत चहासाठी गाडी लावली. तिथं येणाऱ्या चहाच्या वासावरून यानं ओळखलं ‘तिलक’चा चहा!

गणपती चौकात गेल्यावर जोगेश्वरी देवीकडे जाताना याच्या नाकाला टिपिकल दक्षिण दावणगिरी डोश्याचा वास आला आणि हा म्हणाला, ‘शितळा देवी’च्या इथला लोणी स्पंज डोसा मला फार आवडतो.’ त्याला केसरी वाड्यासमोर घेऊन गेल्यावर येणाऱ्या बटाटेवड्याच्या वासावरून त्यानं ओळखलं... तो म्हणाला, ‘मित्रा, आलोच आहोत तर ‘प्रभा विश्रांती गृह’मधून पार्सल घेऊयात ना!’ मी पार्सल घेतलं आणि मुंजाबाच्या बोळात वळलो तर तिथं येणाऱ्या वासावरून या पठ्यानं ओळखलं, ‘बेडेकर मिसळसेंटरमध्ये गर्दी आहे का रे?’ मी त्याला किती तरी ठिकाणी घेऊन गेलो त्यानं सर्व ठिकाणं बरोबर सांगितली... मला त्याचं कौतुक वाटलं. आपल्यालाही पुणं माहिती आहे मात्र न बघता, न ऐकता आणि न खातापिता फक्त वासावरुनच अख्खं पुणं ओळखणाऱ्याच्या रक्तातच पुणं आहे, तोच ‘खरा पुणेकर’...