ऑक्टोबर २०२० – साप्ताहिक सभा

अजिंठा - एक अद्भुत कालातीत कलाविष्कार

रो. रवींद्र प्रभुणे

वक्ते - प्राध्यापक डॉ. शार्वेय धोंगडे

दिनांक ७ सप्टेंबर २०२०

प्रत्येक भारतीयाला अजिंठा वेरूळची लेणी जगप्रसिद्ध आहेत याचा सार्थ अभिमान आहे पण या प्रसिद्धीपलीकडे त्यांची खरी ओळख प्रत्येकाला असतेच असं नाही म्हणून ७ सप्टेंबरच्या साप्ताहिक कार्यक्रमात प्राध्यापक डॉक्टर शार्वेय धोंगडे यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं. विषय होता ‘अजिंठा - एक अद्भुत कालातीत कलाविष्कार’. विषयाचं शीर्षक सुबकपणे मांडलं होतं.

शिक्षणानं आणि व्यवसायानं एक आघाडीचे वास्तुविशारद (आर्किटेक्ट), मनानं कलासक्त आणि पेशानं प्राध्यापक असलेल्या डॉक्टर शार्वेय धोंगडे यांच्यापेक्षा सुयोग्य व्यक्ती या निरूपणासाठी मिळाली नसती.

एका वास्तुविशारदाच्या भूमिकेतून अजिंठा लेण्यांची रचना कशी आहे, त्याचं बांधकाम कसं केलं गेलं असेल याचं शास्त्रीय आणि बारकाव्यांसहित विवेचन त्यांनी केलं. त्यांच्या कलासक्त मनाला तिथली चित्रकला आणि शिल्पं अधिक भावली. त्यांतली विविधता, विषय, आशय, व्यक्ती, भावभावनांची अभिव्यक्ती, रंगरेषांची योजना, सुंदर, सुडौल, मोहक प्रमाणबद्धता असे अनेकानेक पैलू त्यांनी सविस्तरपणे उलगडून दाखवल्यानंतर या कलेचा आवाका लक्षात आला आणि त्याला अद्भुत का म्हणतात… याचं प्रत्यंतर आलं. प्रत्येक कालखंडाशी सुसंगत असा हा कलाविष्कार त्यातल्या अंगभूत गूढतेसोबत जेव्हा आपली नाळ पारलौकिक तत्त्वाशी जोडतो तेव्हा तो आपोआपच कालातीत बनून राहतो.

त्यांच्या बोलण्यातून असं लक्षात आलं की, विषयाचा आवाका तासाभरात मांडता येणं केवळ अशक्य आहे. या सागरात जितकी खोलवर बुडी मारू तितकी अधिक रत्नं हाताशी लागतात आणि ती आपल्या फाटक्या झोळीत सामावू शकत नाहीत… या अगतिकतेची जाणीव अधिकच होत राहते.

वेळेअभावी विषयाला पूर्णपणे न्याय देऊ शकत नाही याची खंत व्याख्यात्याबरोबरच श्रोत्यांनाही झाल्याचं जाणवलं. याची भरपाई कशी करायची… तर याच विषयावर आठदहा व्याख्यानांची मालिका, त्यानंतर डॉ. धोंगडेंच्या सोबतीनं अजिंठ्याला भेट देऊन तो आनंद अनुभवणं, त्यानंतर चिंतन करून त्या अनमोल ठेव्याची अद्भुतता आणि कालातीतता अनुभवायची आणि एक चिरस्मरणीय आनंदानुभव जतन करायचा असा एक विचार झाला.

https://www.facebook.com/RotaryClubPuneSouth/videos/350167569688346

Members Activity Day

रो. श्वेता करंदीकर

दिनांक १४ सप्टेंबर २०२०

सोमवार १४ सप्टेंबर २०२० रोजी बुलेटिन कमिटीने विशेष रंगारंग कार्यक्रम ‘MAD’ सादर केला.

MAD म्हणजे ‘Members Activity Day’. आपल्या क्लबमधील सर्व सभासद आणि ॲनेट्स यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

कार्यक्रमाची सुरुवात रो. जितेंद्र महाजन यांची मुलगी मधुरा आणि मुलगा मिहीर यांच्या जेम्बे या अफ्रिकन तालवाद्य वादनानं झाली. मधुरा आणि मिहीर, दोघंही एक वर्ष हे वाद्य शिकत आहेत. त्यांच्या धडाकेबाज वादनाच्या ठेक्यावर उपस्थितांनीही ताल धरला.

त्यानंतर रो. अभिजित देशपांडे यांनी 'मॅडमास्‍टर' हे हलकंफुलकं रोटरी क्वीझ घेतलं. आपल्या क्लबविषयी आणि त्यातल्या सभासदांविषयी आपल्याला किती माहिती आहे हे सगळ्यांनी पडताळून पाहिलं. नंतर झालेल्या बॉलीवूड क्वीझमध्ये अभिजितनं सगळ्यांनाच कार्यक्रमात सहभागी करून घेतलं.

क्वीझनंतर झालेल्या ‘हसवणूक’ या कार्यक्रमात रो. मिलिंद क्षीरसागर आणि रो. विवेक वेलणकर यांनी मजेदार किस्से सांगून सगळ्यांची हसवणूक केली.

कार्यक्रमाच्या शेवटी रो. संदीप कुलकर्णी यांची मुलगी रिद्धी कुलकर्णी हिनं ‘पोल्युशन’ या विषयावर तिची मतं मांडली. तसंच तिने 'आर्जव' ही संजीवनी बोकील यांची कविता सादर केली.
रो. श्वेता करंदीकर हिनं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं.

बुलेटिन कमिटीमधल्या सर्वच सदस्यांनी कार्यक्रम नीटनेटका होण्यासाठी मेहनत घेतल्यामुळे कार्यक्रम तर खूप दर्जेदार झालाच... शिवाय सर्वच सभासदांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्यामुळे कार्यक्रमाला खरी रंगत आली.

इतिहास हा विषय का शिकायचा? इतिहासाकडून काय शिकायचं?

वक्ते - श्री. अमृत भट

दिनांक - २१ सप्टेंबर २०२०

व्यासंगी इतिहास अभ्यासकाकडून इतिहास शिक्षणाचं महत्त्व समजून घेणं ही पर्वणीच असते म्हणूनच २१ सप्टेंबरच्या साप्ताहिक सभेत श्री. अमृत भट यांचे व्याख्यान आयोजित केलं होतं.

रो. विलास आपटे आणि ॲन अस्मिता आपटे यांची पुतणी अपूर्वा आपटे यांनी वक्ते श्री. अमृत भट यांचा परिचय करून दिला. त्या ज्ञान प्रबोधिनीच्या विद्यार्थिनी आहेत.

श्री. अमृत भट हेही ज्ञान प्रबोधिनीचेच विद्यार्थी. त्यांनी इतिहास आणि शिक्षणशास्त्र या दोन्ही विषयांत पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शांतिलाल मुथा फाउंडेशनमध्ये मूल्यवर्धन प्रकल्पाच्या अधिकारीपदी काम केलं आहे. सध्या ते प्रबोधिनीच्या हराळी केंद्रावर भटक्या विमुक्त मुलांसाठी राबवल्या जात असलेल्या शैक्षणिक प्रकल्पांचं काम बघतात.

त्यांनी प्रश्नोत्तरं आणि स्लाईड शोद्वारे इतिहास या विषयाची तंत्रशुद्ध माहिती दिली. इतिहास म्हणजे गतकालीन मानवी जीवनाची कथा. मानवी जीवनाच्या अखंड प्रवाहातून सतत नवीन इतिहास घडत असतो. संशोधकांनी इतिहास लेखन बौद्धिक उंचीवर नेऊन ठेवलं आणि इतिहास हा शैक्षणिक अंगानं लिहिला गेला त्यामुळे उपयुक्ततावादी सामान्य माणसाला तो आवडेनासा झाला.

इतिहास शिक्षणाचं महत्त्व सांगताना ते म्हणाले की, इतिहास माणसाचं निखळ मनोरंजन करतो. इतिहास उदाहरणं देऊन ज्ञान देतो. पूर्वीपेक्षा अधिक चांगलं जगण्यासाठी, प्रेरणा घेण्यासाठी, काय करायचं नाही हे कळण्यासाठी, जिज्ञासा पूर्तीसाठी, व्यक्तिमत्त्व विकासासाठी इतिहास अवश्य शिकला पाहिजे. इतिहासामुळे दूरदृष्टी वाढते.

भट सरांनी त्यांच्या संशोधन प्रकल्पासाठी गुजरातमधल्या शाळेत सहावी ते दहावीच्या मुलांसाठी एक प्रकल्प राबवला. ‘मुलांना इतिहास का आवडत नाही?’ असा विषय निवडला. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मुलाखती आणि निरीक्षणं यांतून समजलं की, इतिहास शिकवण्याची पद्धत मुलांना आवडत नाही. मुलांना सनावळी पाठ करायला लावल्या जातात. त्यात मुलांना रस नसतो. इतिहास समजून घेण्याचा दृष्टिकोन खूप कमी असतो. इतिहास अध्यापनामध्ये प्रचलित पद्धत आणि इतर पर्यायांचा विचार करता नाटक, चित्रपट या माध्यमांचा सुयोग्य वापर करून इतिहास रंजकतेनं शिकवता येईल.

इतिहास माणसाला निरंतरता आणि बदल, कारण आणि संबंध, मानवी समाजानं पुढे कसं जायचं, जगाकडे कसं बघायचं, इतिहासाची पुनरावृत्ती टाळत आजचा वर्तमानकाळ सुधारण्यासाठी कसे प्रयत्न करायचे हे शिकवतो. दोन पिढ्यांचा दुवा साधत युवा अभ्यासकानं इतिहास शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगितल्यानं सभासदांनी त्यांचं विशेष कौतुक केलं.

 

https://www.facebook.com/SudarshanNatu/videos/10221419355986919

नॅशनल एज्युकेशन पॉलिसी - २०२०

वक्ते – डॉ. अर्चना सुदामे, नमिता जोशी

दिनांक - २८ सप्टेंबर २०२०

नव्या राष्ट्रीय शैक्षणिकधोरणानुसार शालेय आणि उच्च शिक्षणाच्या रचनेत आमूलाग्र बदल करण्यात आले. यासाठीअनेक शिक्षणतज्ज्ञांनी धोरणपत्रिका तयार केल्या आणि त्यांना मान्यताही मिळाली. यासर्व विषयांची सविस्तर माहिती देण्यासाठी २७ सप्टेंबरच्या साप्ताहिकसभेसाठी शिक्षणतज्ज्ञ डॉ. अर्चना सुदामे आणि नमिता जोशी यांना आमंत्रित केले होते.

पीपी अनिलदा सुपनेकर यांनी डॉ. अर्चना सुदामे आणि नमिता जोशी यांच्या कार्याचा परिचय करून दिला.

अनिलदा सुपनेकर यांची कन्या, शिक्षणशास्त्र अभ्यासक डॉ. अर्चना सुदामे यांनी एन्व्हायरनमेंटल मायक्रोबायोलॉजी या विषयात पीएचडी केलेलीआहे. महाविद्यालयीन शिक्षण आणि करिअर सल्लागार म्हणून त्या परिचित आहेत. उच्चशिक्षण घेणार्‍या तीन हजार सहाशे विद्यार्थ्यांना त्यांनी आत्तापर्यंत मार्गदर्शन केले आहे.

नमिता जोशी यांनी ‘पब्लिक पॉलिसी’ या विषयांतर्गत पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी आणि एज्युकेशन आणि डेमॉक्रसी या विषयातही इंग्लंडमधून पदव्युत्तर पदवी मिळवली. सुरुवातीला काही काळ त्या जर्मन भाषा शिकवत होत्या. ‘डेमोक्रॅटिक प्रॅक्टिसेस विदीन एज्युकेशन’ या विषयातील प्रावीण्यामुळे त्या यूकेमधील नामवंत संस्थांशी संलग्न आहेत. ‘आत्मन ट्रेनिंग सेंटर’द्वारे सुमारे दोनशे विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करतात आणि स्वतंत्र व्यवसायही करतात.

पुणे इंटरनॅशनल सेंटरने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अनुसरून ‘रेकमेंडेशन्स फॉर ड्राफ्ट नॅशनल एज्युकेशन पॉलिसी’ याविषयी पॉलिसी पेपरच्या लीड ऑथर म्हणून डॉ. अर्चना सुदामे यांनी नमिता जोशी यांच्याबरोबर काम केलं. नमिता जोशी त्यांच्याबरोबर एडिटोरिअल कोऑर्डिनेटर म्हणून काम करत आहेत.

२०१९मध्ये पुणे इंटरनॅशनल सेंटरने सादर केलेल्या ‘नर्चरिंग गिफ्टेड स्टुडन्ट्‌स’ या विषयावर या दोघींनी दुसरी एक धोरणपत्रिका सादर केली २०१६मध्ये त्यांनी ज्या धोरणपत्रिका सादर केल्या होत्या त्यांतील अनेक पत्रिका नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये अंतर्भूत केल्या गेल्या.

डॉ. अर्चना सुदामे आणि नमिता जोशी यांनी स्लाईड शोमधून सविस्तर माहिती दिली. शालेय शिक्षणाची रचना दहा अधिक दोनऐवजी पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार; मातृभाषेत प्राथमिक शिक्षणाला प्राधान्य; सहावीनंतर व्यावसायिक शिक्षण; बहुभाषिक शिक्षण; बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक विकासासाठी आवश्यक सुविधा; शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे; नववी ते बारावी एकत्र करून चार वर्षांचा कोर्सअंतर्गत आंतरशाखीय शिक्षण; शिक्षकांना विशेष प्रशिक्षण आणि मूल्यमापन; एमफीलऐवजी थेट पीएचडीसाठी प्रवेश; उच्च शिक्षणातील विविध अभ्यासक्रमांसाठी एकच नियामक मंडळ; शैक्षणिक मूल्यवर्धन; मूल्यांकन; तसेच नियोजन; प्रशासन यांसाठी तंत्रज्ञानाचा वापर यांतून शिक्षण चौकटबाह्य, आंतरशाखीय आणि समन्वयी करण्यात आले आहे.

हे सर्व या विदुशींकडून ऐकताना, ‘विद्वान सर्वत्र पूज्यते |’ या उक्तीचा प्रत्यय येत होता. त्यांनी शैक्षणिक धोरण, सुधारणा अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितल्याबद्दल रो. विवेक वेलणकर यांनी आभार मानले.

 

https://www.facebook.com/RotaryClubPuneSouth/videos/350465292860918