क्लबकारी
दृष्टिकोन
सप्टेंबर २०२०

कलाकारी

चिरंतन


मी कोण अन् आले कुठून, काहीच नाही स्मरणी

ओळखीची वाटतात, फुले ताऱ्यांची गाणी…!


तोच दिवा अंतराळीचा, दिनरातीचा खेळ

कक्षेमधुनी भ्रमण ग्रहांचे, नाना ऋतूंचा मेळ…!

 

आकाशाची निळाई आठवे, नक्षत्रांची रांगोळी

चंद्राकडे तशाच धावती, जललहरींच्या ओळी…!

 

दर्याची स्मरते गाज, आठवे नदीची ओढ

हिरव्या पान्ह्यातून आठवे, माया भुईची गोड…! 


स्मरती मात्र चरणद्वय ते, जिथे टेकला माथा

बोध जाणवे अंतरात, जो वाट दाखवी चित्ता…!

 

जन्मांतरीच्या संस्कारातुनी, धावे जीवननदी

या थेंबाचा सागर स्वामी, एकच आदी अन् अंती…!

 

- ॲन मोहिनी नातू


कवितेचा ऑडिओ येथे ऐका 


मोहिनीजी,


आपली कविता वाचून खूप आनंद झाला. अगदी सुरेख आहे ही कविता. मनाला एकदम भावली. ही रचना म्हणजे ‘वाचे बरवे कवित्व। कवित्वी रसिकत्व। रसिकत्वी परतत्त्व। स्पर्शु जैसा।।’चे एक चांगले उदाहरण म्हणता येईल. अत्यंत थोड्या शब्दांत गहन-गंभीर विषय आपण सहज आणि हळुवारपणे मांडला आहे. जीवनविषयक व्यापक तत्त्वज्ञान, त्याचा शोध आणि बोध कवितेत सामावला आहे. ही कविता आपल्या अंतरीच्या ऊर्मीच्या उमाळ्याची आहे, तशीच भाषाप्रभुत्वाची साक्षी आहे. या शब्दवैभवाला एका सखोल वैचारिक बैठकीचे अधिष्ठान लाभले आहे. आपण जरी ही कविता सलग मांडली असली तरी मला ती चार-चार ओळींच्या तीन सुंदर कडव्यांची वाटली.


'कोऽहम्' हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्या मनात कायम असतो. आपल्या मूळ स्वरूपाची, ज्ञानाईच्या भाषेतली 'स्वधर्मा'ची ओळख आपल्याला नसते... पण ज्याच्याशी आपला मूळ अनुबंध निगडित असतो. त्याच्या काही पाऊलखुणा आपल्या तीव्र संवदनशील आणि ईश्वरप्रवृत्त मनाला आपल्या भोवतालात, निसर्गात दिसत असतात... त्यामुळेच ही फुले, ते तारे आणि त्यात लपलेले अनाहत नादाचे गाणे आपल्याला खुणावत असते. कुठेतरी आपली खरी 'ओळख' पटत असते. हे आपण फार सुंदर शब्दांत मांडले आहे. आपल्या आतल्या शक्तीशी त्या वैश्विक महाशक्तीचा असलेला संबंध आपण पहिल्या कडव्यातल्या चार ओळींत संकेताने पण निश्चितपणे प्रस्तुत केला आहे. त्यात सत्यम् शिवम् सुन्दरम् यांचा संमिलाप आहे... तसे विशाल व्यापकतेचे आणि विविधतेचे चित्रणही आहे. 


दुसर्‍या कडव्यातली आकाशाची निळाई, नक्षत्रांच्या रांगोळीतली धवलता, वात्सल्यरूप मायभूचा हिरवा पान्हा या पदबंधातून जसे कवित्व फुललेले दिसते तसा त्यातून मानवाचा निसर्गाशी, या पंचमहाभूतांशी असलेला लागाबांधाही व्यक्त होतो. चराचरांत भरून राहिलेल्या या व्यापक तत्त्वाशी असलेली आपली जवळीक स्पष्ट होते. रंग आपल्याला केवळ नयनसुख देत नाहीत तर त्यांतून त्यांच्या तत्त्वगुणांचे दर्शनही आपल्याला होत असते. इथे आकाश, रांगोळी, भूमीचा पान्हा यांतून निळ्या, पांढर्‍या, हिरव्या रंगांचा आणि त्यांतल्या नितळतेचा, शांतीचा आणि सर्जनाचा मार्मिक संकेत मिळतो. या कडव्यातल्या चार ओळींतून पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांचे दर्शन होतेच... शिवाय जललहरींतून गतीचा, शीतल तेजाच्या आकर्षणाचा आणि ओढीचा, दर्याच्या गाजेतून अनाहत नादाचा, भूमीतील ममत्वाचा प्रत्यय येतो. याच पंचतत्त्वांच्या माध्यमांतून आत्मा-परमात्म्याचा परस्परसंबंध स्पष्ट होत जातो. हे कडवे अत्यंत काव्यात्मक आणि सारग्राही ठरते ते त्यामुळे. 


तिसर्‍या कडव्यातल्या पहिल्या दोन ओळी गुरूगीतेची प्रकर्षाने आठवण करून देतात. गुरूचरणांचे महत्त्व, गुरूंप्रति असलेले समर्पण, त्यांनी ज्ञानबोधाधारे केलेले जागरण आणि त्यांतून दिसणारी वाट हा सारा प्रवास येथे या दोन ओळींत भरून राहिलेला दिसतो. त्यांतून जिवाशिवाची जवळीक, कर्मबंधातून जिवाने साठवलेले सुकृत आणि जिवशिवाची एकरूपता यांची सुंदर अभिव्यक्ती शेवटी दिसून येते. आदिअंतीमध्ये ते एकमेव, अखंड, अविनाशी तत्त्व आणि त्याच्याशी मिलन अर्थात अनन्यतेची आणि एकरूपतेची भावना दिसते. सर्व ब्रह्मांडाचा चालक, तो स्वामी, परब्रह्म आणि हा जीव यांच्यात असलेला अंशअंशी भाव आणि त्यांचे एकमेकांत सामावून जाणे शेवटच्या दोन ओळींत खूप मार्मिकतेने व्यक्त झाले आहे. कबीर म्हणतो, ‘बूँद समाणी समद में सो कत हेरी जाय।’ बिंदू सागरात जाऊन मिसळला, आत्मतत्त्व परमतत्त्वात मिसळले. आता द्वैत राहिलेच नाही, सारे एकरूप झाले. आपण याचे सुरेख चित्रण केले आहे. अरूपाला रूप देणे सोपे कामं नाही... ते इथे साधले आहे. या गोष्टीला मोजमाप नाही यातच त्याचे यश सामावलेले.

 

लाली मेरे लाल की,

जित देखौं उत हो गयी लाल।

लाली देखन मैं गयी,

मैं भी हो गयी लाल।।


म्या पामरे काय लिहावे, प्रतिभेला दंडवत!


- सदानंद महाजन

तिचं काय चुकलं...

ॲन अस्मिता आपटे


कालच माझ्या दोन्ही भावांनी सांगून टाकलं... आईला वृद्धाश्रमात ठेवायचं... पण हा त्यांचा निर्णय मला पटत नव्हता. माझ्या मनाची तयारी होत नव्हती.  मी माझ्या दोघा भावांच्या  निर्णयावर जवळजवळ सहा महिने विचार करत राहिले... पण माझा निर्णय होत नव्हता. एकोणनव्वद वर्षांची माझी आई माझ्याजवळच राहते. तिला माझ्याकडे राहायला आवडतं. मला दोन भाऊ, भावजया, भाचे, सगळे जण आहेत... पण  घरोघरी मातीच्या चुली! असो.


रात्रीचे जेवण उरकून निवांत पुस्तक वाचत पडले होते. तेवढ्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि पाठोपाठ पाणी वाहत असल्याचा  आवाज आला. आवाजाच्या दिशेनी जाऊन पाहिलं तर काय... समोरचं दृश्य  बघून मी अवाकच झाले. माझी आई बेसीनजवळ पडली होती आणि बेसीनच्या नळाचा पाईप तूटून पाणी जोरात वाहत होतं. घरात वावरतानाही वॉकरचा वापर कर असं अनेक वेळा सांगूनही आईनी ऐकलं नव्हतं. तोल जाऊन पडल्यामुळे डोक्याला लागलं होतं... शिवाय नळ तुटल्यामुळे पाणी वाहत होतं. कसंबसं आईला हाताला धरून उभं करायाचा प्रयत्न केला आणि अगदी ओढतओढत खोलीत आणलं. जखम स्वच्छ करून, कपडे बदलून तिला झोपायला सांगितलं... तोपर्यंत तिकडे घरात सर्वत्र पाणीच पाणी... उंबरठा कुठेच नाही... त्यामुळे घरभर पाणी पसरलं. उंबरठा आणि त्याची  गरज पहिल्यांदा जाणवली. पाईपमध्ये कसाबसा कपडा खोचला. पाणी काढून टाकून पुसायला सुरुवात केली. हा उपद्व्याप तासभर चालला. तेवढ्यात पाईपमध्ये कोंबलेला कपडा बाहेर येऊन परत पाणी वाहायला सुरुवात. डोक्याला हात लावून खुर्चीत बसले. रात्रीची वेळ... मी आणि आई दोघीच घरात आणि भरीत भर म्हणजे लॉकडाऊन! आता या वेळेस कोण येणार मदतीला... आता काय... परत एकदा पाईपमध्ये कपडा घट्ट बसवला. आता मात्र माझा हा प्रयत्न सफल झाला. आधीच दुखणारी कंबर आणखी दुखू लागली. उद्या सकाळपर्यंत काहीच करता येणार नव्हतं. तेवढ्यात लाईट गेले. स्वस्थ बसून राहण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता.


सकाळी लवकर उठून शेजाऱ्यांची मदत घेतली. त्यांच्या ओळखीचा माणूस येऊन काम करून गेला. आता मात्र माझ्या डोक्यात वृद्धाश्रम हा विषय घोळू लागला. माझ्या तब्येतीच्या तक्रारी आणि आईचे म्हातारपण यांचा मेळ काही जमत नव्हता. मदतीला कोणी नसताना सर्व काम करून आईची शुश्रूषा करणं मला कठीण वाटायला लागलं. दोघं भाऊ भेटायला आले आणि माझ्यावरच  डाफरले ‘अगंऽ आता तरी आमचं ऐक. आपण आईला वृद्धाश्रमात ठेवू या. मला खरंच खूप वाईट वाटलं. दोघांपैकी एकाच्याही मनात तिला त्यांच्या घरी न्यावं असं का नाही वाटलं? आईविषयी प्रेम, काहीच कसं नाही. जाऊ दे.  तरीही आठ दिवस विचार करण्यात घालवले... पण मलाही आता झेपत नव्हतं. भावनेला आवर घालून घरापासून जवळच असलेला वृद्धाश्रम पाहून आले. चौकशीअंती ठीक वाटला आणि माझा निर्णय झाला की, आईला तिथे ठेवायचं. आधीच माझी कमी असलेली झोप आता पूर्णपणे उडाली. तिथे आईला पाठवायचं म्हणजे तिथे जायची तयारी करायला हवी. सरकन काटा आला अंगावर. जन्मदात्या आईला असं सोडून द्यायचं... का? तर आपल्याला झेपत नाही म्हणून. इकडे आईची नजर चुकवत होते. काय सांगू तिला? जमेल का मला तिला सांगायला? विचारांचं काहूर माजलं. मन अधिकच अस्वस्थ झालं. मनावर दगड ठेवून वागणं याचा अर्थ आज मला कळला. कपड्यांच्या घड्या करताना हात थरथरत होते. तिची नेहमीची औषधं सगळी नीट एका ठिकाणी भरली. सगळी औषधं आहेत नाऽ हे परतपरत बघत होते. डोकं खूपच दुखत होतं. काही सुचत नव्हतं. परत गाडी तिथेच अडकत होती की, आईला कसं सांगायचं. आईनी तेवढ्यात विचारलं ‘अगंऽ कसली तयारी? कुठे जायचे?’ मी काहीच बोलले नाही. तिच्या नजरेला नजर द्यायला धीरच होत नव्हता. शेवटी डॉक्टरांकडे जायचंय असं सांगून वेळ मारून नेली.


कपड्यांची पिशवी भरून झाली. दुपारी भाऊ आला. दोघांनी मिळून तिला गाडीत बसवलं. माझे हातपाय थरथरू लागले. कसंबसं स्वतःला सावरलं. वृद्धाश्रमाची पायरी चढताना पाय खूप जड झाले... पण आता मागे फिरून चालणार नव्हतं. आईला सांगितलं ‘इथे नवीन डॉक्टर आहेत. त्या तुझ्यावर उपचार करणार आहेत... म्हणून तुला थोडे दिवस इथे राहावे लागणार आहे.’ 


बस... एका दमात सांगून बाजूला झाले... पण माझ्या आईची नजर सांगत होती की, तिला आपण कोठे आलो आहे हे लक्षात आलंय. आई मात्र अगदी गप्प होती. तेथील  सेविकेने आईला आत नेऊन तिची खोली दाखवली. 


आश्रमाच्या सगळ्या फॉर्‌मॅलिटीज् पूर्ण केल्या... म्हणजे फॉर्म भरणं, पैसे भरणं, आईच्या औषधांच्या वेळा तिच्या थोड्या आवडीनिवडी वगैरे. जड अंतःकरणानं उद्या नक्की भेटायला येते असं आईला सांगून तिथून काढता पाय घेतला. घरी आल्यावर मात्र माझं सगळं अवसान गळून पडलं. अक्षरशः ढसाढसा रडले. मी आईला वृद्धाश्रमात ठेवलं ही मी मोठी चूक केली आहे असं वारंवार मनात येत होतं. एक म्हणजे लॉकडाऊनच्या काळात मदतनीस बाई ठेवायला कोरोनाच्या भीतीमुळे अवघड वाटलं आणि दुसर म्हणजे माझी तब्येत. मी पूर्णपणे मोडून गेले.


तिचं काय चुकलं? मूलबाळ, सुखवस्तू घर असताना असं अनाथ असल्यासारखं तिनं का राहायचं? हा प्रश्न मला सतत भेडसावतोय. उद्या माझं मला होईनासं  झालं की  माझ काय... कारण माझी मुलगी अमेरिकेत असते... म्हणजे एकतर भारत सोडून अमेरिकेत जायचं किंवा स्वतःहून वृद्धाश्रमाची पायरी चढायची....


दशावतार आणि उत्क्रांती (भाग १)

रो. सुभाष देशपांडे


मी जेव्हा दशावतारांबद्दल विचार करत होतो तेव्हा माझ्या लक्षात आले की, पृथ्वीवरच्या जिवांच्या उत्क्रांतीशी दशावताराचा फार जवळचा संबंध आहे. माझ्या या आशंकेपोटी चौकशी अथवा अभ्यास करता असेही लक्षात आले की, या विचारांची मीच एकटीच व्यक्ती नसून फार पूर्वीपासून ही आशंका बऱ्याच जणांना आलेली आहे. सर्वप्रथम हेलन ब्लॉव्हॅटस्की यांनी सन १९८७ साली ही कल्पना मांडली. त्यांच्या मते डार्विनने मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या नियमांशी सुसंगत अशी दशावतारांची मांडणी आहे. जीवनाच्या सर्वात खालच्या स्तरावरून क्रमश: वरच्या स्तरांपर्यंत दशावतारांची मांडणी आहे. ही कल्पना अरबिंदोंनीपण निराळ्या रितीने मांडली होती. सर मोनिअर मोनिअर विल्यम्स यांनी असे प्रतिपादन केले की, डार्विनच्या कित्येक शतके अगोदर हिंदू पंडितांना उत्क्रांतीची माहिती आणि कल्पना होती. नबीनचंद्रसेन आणि सी. डी. देशमुखसुद्धा याच विचारांचे होते. काही वैष्णवपंथी लोकांना हे मान्य नव्हते... कारण त्यामुळे श्रीराम हे श्रीकृष्णांच्या खालच्या स्तरावर मानले जात होते. 


हे तत्त्वज्ञान अधिक समजून घेण्याकरता प्रथम आपण उत्क्रांतिवादासंबंधी आणि दशावतरांसंबंधी अधिक माहिती घेऊ.


पृथ्वी पूर्वी तप्त गोळा होती. तीनशे वीस ते तीनशे ऐंशी कोटी वर्षांपूर्वी ती थंड होऊ लागली आणि तिचे वरचे (बाह्य) आवरण घट्ट होऊ लागले. आतल्या गरम भागांतून बाहेर पडणाऱ्या वायूंमध्ये वाफ होती. जसजसे वायू वर गेले तसतसे ते थंड होऊन त्यांचे ढगांत रूपांतर झाले आणि पृथ्वी संपूर्णपणे ढगांनी झाकली गेली. शेकडो वर्षं पृथ्वीवर सतत पाऊस पडत होता. या पाण्यामुळे महासागर तयार झाले. ढगांतून होणाऱ्या विजेच्या वर्षावाने वातावरणात आणि महासागरात प्रक्रिया होऊन प्रथम रेणू (अणू) अथवा मॉलिक्युल्स (ॲटम) तयार झाले. वाहणाऱ्या पाण्याने जमिनीवरील रेणू (अणू) पाण्यात वाहून गेल्यामुळे त्यापासून प्रथम जीवनाचा साचा तयार झाला हे साधारणपणे तीनशे ऐंशी ते अडीचशे कोटी वर्षांपूर्वी झाले. साधारण साडेतीनशे कोटी वर्षांपूर्वी एकपेशीय जीव तयार झाले. अशा रितीने जीवन समुद्रामध्ये प्रथम तयार झाले. एकपेशीय जिवांपासून अनेकपेशीय प्राणी तयार झाले. हे समुद्रातील प्राणी पस्तीस कोटी वर्षांपूर्वी जमिनीवर आले. तोपर्यंत जमिनीवर जीवन नव्हते. सुमारे साडेबावीस कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील जीवसृष्टी काही कारणाने जवळ जवळ नष्ट झाली.


जवळ जवळ पृथ्वीवरील अर्धे प्राणी नाहीसे झाले. (सुमारे साडेबावीस कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरची जवळजवळ अर्धी जीवसृष्टी काही कारणाने नष्ट झाली.) या आपत्तीमधून सावरण्यासाठी पृथ्वीला दोन कोटी वर्षं लागली. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरचे प्राणी पुन्हा एकदा फार मोठ्या प्रमाणात नष्ट झाले. त्यावेळी पृथ्वीवर महाकाय डायनॉसॉर्सचे राज्य होते. सरपटणारे प्राणी, उडणारे पक्षी, त्याचप्रमाणे जमिनीखाली बिळात राहाणारे सस्तन प्राणीसुद्धा होते. असे समजले जाते की, पृथ्वीवर खूप मोठी उल्का आदळली... त्यामुळे आकाशात धुळीचे आणि धुराचे लोट उडाले... त्यामुळे पृथ्वी झाकोळली. हे कित्येक वर्षं चालू होते. सूर्याची किरणे पृथ्वीवर पोहोचेनाशी झाली आणि हवामानात बदल घडून आला... त्यामुळे डायनॉसॉर्ससारखे पृथ्वीच्या पृष्ठभागावर राहणारे प्राणी नष्ट झाले पण जमिनीखाली बिळात राहणाऱ्या उंदीर, घुशी, डुक्कर यांसारख्या सस्तन प्राण्यांचे प्राण वाचल्याने त्यांपासून पुढे मानवाची निर्मिती झाली. आपल्या आणि उंदरांच्या जनुकसूत्रांत खूप साम्य आहे. त्याचप्रमाणे डुकरांच्या अवयवांचे प्रतिरोपण माणसाच्या शरीरात करण्याचे प्रयत्नसुद्धा चालू आहेत.


(क्रमशः)


कलाकारी

सभासदांचा सहभाग वाढावा हा हेतू 

सभासदांच्या कलागुणांना वाव

चित्रकला, फोटोग्राफी, कथा, लेख, कविता...

व्यक्तिगत, कौटुंबिक, व्यावसायिक गवसणी

तुमचा लेख आवर्जून द्या समन्वयक - आनंद कुलकर्णी / यामिनी पोंक्षे
क्लबकारी
दृष्टिकोन