अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा पिडीजी भाऊसाहेब !
पिडीजी रो भाऊसाहेब कुदळे आणि शोभाताई कुदळे ह्यांच्याकडून पुणे साऊथ रोटरी चॅरिटेबल ट्रस्टला रु १,००,००० ची देणगी.
श्री भाऊसाहेब हे एक प्रेरणदायी व्यक्तिमत्त्व आहे. रोटरी पुणे साऊथ चा सदस्य असल्याने त्यांचा दुर्मिळ सहवास लाभला हे आमचे मोठे भाग्य आहे. 🙏🏻
भाऊसाहेब, अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावर्षी जन्मलेले अरुण कुदळे यांना ८ डिसेंबरला ७५ वर्षे पूर्ण झाली तरी पंचविशीच्या तरुणाला लाजवेल असा उत्साह त्यांच्यात आहे. जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळालेले उच्च विद्या विभूषित असूनही पिठाची गिरणी आणि नंतर चित्रपटगृहाचा व्यवसाय सुरु करणारे कै. लक्ष्मणराव कुदळे यांचा सुसंस्कृत वारसा अरुण याना लाभला. नूमवी प्रशालेतून बोर्डात ५ वा क्रमांक पटकावल्यानंतर त्यांनी अभियांत्रिकीची पदवी प्राविण्यासह संपादन केली.
घरचा भरभराटीचा व्यवसाय होता तरी त्यांनी स्वतःची वाट स्वतः शोधली. कै. विलासराव साळुंखे याचे मार्गदर्शनाखाली आयातीस पर्याय अशी “डायलगेज” हि मोजमाप यंत्रे विकसित केली आणि १९७४ साली “मायक्रोटेक” नावाने हडपसर येथे उत्पादन व्यवसाय सुरु केला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. लवकरच त्यांनी कुदळे इन्स्ट्रुमेन्ट्स प्रा. ली. हि दुसरी कंपनी सुरु केली. १९९३ साली खाजगी क्षेत्रातील राष्ट्रीय प्रमाणपत्र असलेली पहिली प्रयोगशाळा “कुदळे कॅलीब्रेशन लॅबोरेटरी प्रा. ली.” सुरु केली. पारखे पारितोषिक, हरीमालिनी जोशी, फाय फौंडेशन, आ.रा. भट औद्योगिक गुणवत्ता, गुण ग्राहक अशी अनेक पारितोषिके त्यांना मिळाली. हि पारितोषिके त्याच्या उत्पादनाच्या आणि सेवेच्या उच्च गुणवत्तेची निशाणी आहे.
व्यवसायात व्यग्र असले तरी त्यांनी अनेक क्षेत्र गाजविली आहेत. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, पुणे याच्या कार्यकारी मंडळावर अनेक वर्षे कार्यरत आहेत. लघुउद्योग कमिटीचे अध्यक्ष आणि चेम्बरचे उपाध्यक्षपद हि भूषविले. विवेकानंद औद्योगिक सहकारी वसाहत स्थापनेत त्यांचा महत्वाचा सहभाग आहे. हडपसर लघुउद्योग संघटनेचे ते संस्थापक आणि अध्यक्ष होते. अनेक शेक्षणिक संस्थाच्या कार्यकारिणीवर ते कार्यरत आहेत. ३० वर्षपूर्वी कौशल्य विकासचे महत्व लक्ष्यात घेऊन त्याची शिक्षणाशी सांगड घालून स्थापन झालेल्या ज्ञानेश्वर विद्यापीठाचे ते विश्वस्त आणि अनेक वर्षे अध्यक्ष होते. पुण्यातील प्रसिद्ध रॉयल कॅनॉट बोट क्लबचे उपाध्यक्षपद आणि सचिव पद सांभाळले सध्या ते त्याचे अध्यक्ष आहेत. १९८२ मध्ये आपल्या क्लबचे सभासद झाले. १९८८-८९ साली क्लबचे अध्यक्ष आणि १९९९-२००० साली डीस्ट्रीक्ट गव्हर्नर म्हणून त्यांची निवड झाली. रोटरी क्लब पुणे फार ईस्ट या क्लबच्या स्थापनेत त्यांचा सिहाचा वाटा आहे. सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. पुणे दक्षिणचे “श्रद्धास्थान” म्हटले तर वावगे होणार नाही.
अडचणी आणि समस्या यांना हसत सामोर जाऊन त्यातून सर्वाना संमत आणि कोणतीही कटुता येऊ न देता मार्ग काढण्याचे कसब त्यांचेकडे आहे. सुशिक्षित, सुसंस्कृत, सुहास्यवदन, सफल उद्योजक, उत्तम वक्ता अस विविध अंगानी बहरलेल प्रगल्भ व्यक्तिमत्व भाऊसाहेब कुदळे यांना लाभल आहे. त्यांच्या पत्नी सौ. शोभाताई यांची समर्थ साथ लाभली आहे. त्यांच्या कार्याचा ठसा आणि प्रभाव अनेकांवर पडला आहे. कर्तृत्वाचा वारसा सांभाळणारा पुत्र व सून, कन्या नि जावई, नातवंडे असा सुखी परिवार लाभलेले आणि पंचहत्तरी पार केलेले तरुण अरुण उर्फ भाऊसाहेब कुदळे यांना सुख, समृद्धी आणि शांतीचे दीर्घ आयुष्य लाभो हि ईश्वरचरणी प्रार्थना.
१२ डिसेंबर ते १६ डिसेंबर रोजी रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगरतर्फे आयोजित केलेल्या आंतर रोटरी क्लब एकांकिका स्पर्धेत आपल्या क्लबने 'निग्रह' ही एकांकिका सादर करत खालील पुरस्कार मिळवले.
- प्रकाश योजनेचे पारितोषिक
- नेपथ्य पारितोषिक
- रो. योगेश नांदुरकर ह्यांना लिखाणाचे तिसरे पारितोषिक मिळाले
- सहाय्यक भूमिका - ॲन यामिनी पोंक्षे
सर्व टीमचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन.
"कष्ट आधिक प्रारब्ध इज इक्वल टू कर्म. कष्ट जेवढे जास्त तेवढा प्रारब्धाचा परिणाम कमी होईल."- नक्षत्रा
टीम निग्रहला हे विधान समर्पित. 🙏
प्रचंड मेहनत आणि टीम स्पिरीट - टीम वर्क या जोरावर ही पारितोषिकं मिळाली आहेत. ती टीमला मिळाली आहेत. याचा आनंद तुमच्या शुभेच्छांच्या वर्षावानं दुणावला.
हे सगळं प्रेसिडेंट संजीव, फर्स्ट लेडी स्नेहा, कमिटी चेअर सुनीता प्रभुणे आणि तुम्हा सर्वांच्या सपोर्टमुळे होऊ शकलं. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद!
- टीम निग्रह
रो.पी.पी अभिजित जोग याच्या खूप गाजलेल्या 'असत्यमेव जयते?' या पुस्तकाच्या इंग्रजी, हिंदी आणि गुजराथी आवृत्तीचा प्रकाशन समारंभ काल दि.१७ डिसेंबर रोजी दिल्लीतील
'काॅन्स्टिट्यूशन क्लब' या प्रतिष्ठित व दर्जेदार व्हेन्यू मध्ये साजरा झाला. मी व अंजली या शानदार सोहळ्याचे साक्षीदार होतो.
आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू स्वामी परमात्मानंद सरस्वती यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. तसेच नाथ संप्रदायाचे प्रमुख निर्मलानंद नाथ, जे आयआयटी ग्रॅज्युएट आहेत, ते याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. दोन्ही स्वामीजींनी अभिजितच्या पुस्तकाचे मुक्तकंठाने कौतुक केले व हे पुस्तक भारताचा नॅरेटिव्ह बदलण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला. उत्तर प्रदेशचे माजी चीफ सेक्रेटरी दीपक सिंघल यांनीही अशाच भावना व्यक्त केल्या.
यानंतर सुप्रसिद्ध इतिहासकार मीनाक्षी जैन, टीव्ही डिबेटस् गाजवणारे विचारवंत आनंद रंगनाथन, शेफाली वैद्य व अभिजित यांचे पॅनेल डिस्कशन झाले. यात भारताच्या इतिहासातील असत्य कथनाच्या विविध पैलूंवर चर्चा झाली.
कार्यक्रमाला वेदवीर आर्य, शंतनू गुप्ता, अमित अग्रवाल यासारखे प्रथितयश लेखक, तसेच जेएनयू व दिल्ली विद्यापीठातील अनेक इतिहासतज्ञ उपस्थित होते. तसेच अनेक वृत्तपत्रे, टीव्ही व युट्यूब चॅनेल्सचे प्रतिनिधी उपस्थित होते. हाॅल संपूर्ण भरला होता व अनेकजण उभे राहून ऐकत होते.
हा कार्यक्रम म्हणजे एक वैचारिक मेजवानीच होती असे म्हणता येईल. आपला मित्र, सभासद आणि पास्ट प्रेसिडेंट अभिजितच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा भारताच्या राजधानीत इतक्या दिमाखदार पद्धतीने व्हावा ही आपल्या क्लबसाठी अभिमानाची बाब आहे.
रो.पी.पी. अभिजितचे मनःपूर्वक अभिनंदन !
पी.पी. रो. अभिजित जोग , हार्दिक अभिनंदन.
पुस्तकाचे दिल्लीतील प्रकाशन म्हणजे अटकेपार झेंडा! मुख्य भाषांमध्ये त्याचा अनुवाद झाल्यामुळे ते जागतिक दर्जाचे झाले; आणि ते तसे व्हायलाच हवे. अनेक सूज्ञांपर्यंत हा विचार पोहोचल्या नंतर आता व्यापक प्रमाणात मंथन सुरू होईल.
या उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
गुंडाळवाडी धरण प्रकल्पाची स्वप्नपूर्ती
बाजी - समाजकार्य आणि मैदानातही.
आंतर रोटरी क्रिकेट स्पर्धेत आपल्या क्लबचे भरघोस यश!
ड्रायव्हिंग स्कूलचे मोलाचे योगदान
अभिनंदन रो. विलास आपटे!
ही गोष्ट आहे नंदादेवी पर्वताची..भारतातील एका उंच पर्वताची.त्याची उंची आहे २५,६४५,फूट .तसा तो पर्वत एव्हरेस्ट, के२,माकालू,वगैरे पर्वतां पेक्षा ठेंगणाच.चारही बाजुने १८०००ते२२००० फूट शिखरांनी झाकलेला.त्याच्या पायथ्याशी जाणे म्हणजे एक दिव्यच.फक्त एकाच बाजुने रिशी नदीने पाडलेल्या मोठ्या घळीतून मार्ग जातो.जाण्याचा रस्ताही फारच कठीण.ह्या सर्व भागाला नंदादेवी अभयारण्य असे म्हणतात. सध्या या अभयारण्यात जाण्यास अथवा नंदादेवी पर्वतावर चढण्यास मनाई केली आहे.नंदादेवी जरी जगातील अती उंच पर्वतांपैकी एक नसला तरी पर्वत रोहणास अत्यंत कठीण समजला जातो.नंदादेवी अभयारण्यात जाण्यास सध्याचे ऊत्तरांचल किंवा पूर्वीचे गढवाल मधून जावे लागते.ऋषिकेश, देवप्रयाग, चामोली, जोशीमठ,लाटा,असा मार्ग आहे.लाटाहून पुढे पायीच जावे लागते.
ही कथा आहे विली अन्सोल्ड नावाच्या झपाटलेल्या माणसाची.अन्सोल्डने नंदादेवी प्रथम १९४९ साली गिरीभ्रमण करताना पाहिला.नंदादेवी पर्वत हा एक अत्यंत सुंदर पर्वत आहे.प्रथम दर्शनीच नंदादेवीच्या प्रेमात पडलेल्य ह्या माणसाने ठरविले की आपल्या मुलीचे नाव नंदादेवी ठेवायचे.अनसोल्ड हा एक प्रवीण गिर्यारोहक होता. त्याने केलेली १९६३ सालची एव्हरेस्ट च्या पश्चिम कड्यावरील चढाई ही गिर्यारोहणातील एक थरारक मोहीम समजली जाते. तो एव्हरग्रीन स्टेट कॉलेज,वॉशिंग्टन, यु एस ए येथे धार्मिक विषयाचा प्रोफेसर होता व त्याचा गुढज्ञानावर विश्वास होता.काही वर्षांनी त्याला एक मुलगी झाली.ठरल्याप्रमाणे त्याने मुलीचे नाव नंदादेवी असे ठेवले.
ही कहाणी आहे नंदादेवी नावाच्या मुलीची.एका झपाटलेल्या बापाची लाडकी लेक,सोनेरी केसांची ,निळ्या डोळ्यांची.तिची काही वर्षं नेपाळ मधे गेली.लहानपणापासून तिच्य मनात नंदादेवी पर्वता बद्दल ओढ असणार. आपल्या वडिलांचा हात धरून फिरायला जाताना विली अन्सोल्ड ने तिला नंदादेवी च्या गोष्टी सांगीतल्या असतील. त्याची नंदादेवी पर्वतारोहण करण्याची आकांक्षा, तिला लहानपणापासूनच जाणवली असेल.आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या या यज्ञाची पूर्तता करण्याची महत्त्वाकांक्षा तिला पहिल्यापासूनच असणार. १९७५साली तिने नंदादेवी वर मोहीम काढण्याचे ठरवीले.आपला भाऊ काग आणि वडील विली यांच्या बरोबर आणखी काही गिर्यारोहक तिने जमवीले.हिमालयातील पर्वतारोहणाची मोहिम आखणे हे सोपे काम नव्हे.हिमालयातील शिखरे काही एका दिवसात चढता येत नाहीत.असली मोहीम३-४महीन्यांची असते.प्रचंड खर्च येतो.खूप सामान गोळा करावे लागते.खाण्या पिण्या च्या वस्तू जमवाव्या लागतात.कुशल गिर्यारोहक एकत्र आणावे लागतात.असे कुशल गिर्यारोहक फार थोडेच असतात.उंच पर्वतावर चढाई करणाऱ्या प्रथम दर्जाच्या गिर्यारोहकांपैकी कित्येकजण पर्वतावरील अपघातात मरण पावले आहेत. एकापेक्षा एक अशा कठिण पर्वतावर चढण्याच्या हव्यासापायी त्यांचा मृत्यू होतो.कधीतरी पर्वताचा विजय होतोच.एव्हरेस्ट वर चढाई करणाऱ्या पैकी जवळ जवळ १५ टक्के गिर्यारोहक तेथे मरण पावले आहेत. अशा मोहिमेकरिता पैसा जमवावा लागतो.एखादा देणगीदार शोधावा लागतो.एक एक गिर्यारोहक जमविला गेला. अमेरिकेतील कित्येक संस्थांनी पैशांची मदत केली.भारताने देखील आपले दोन गिर्यारोहक त्यांच्या बरोबर धाडले व पैशांची पण मदत केली.
५ जुलै १९७६ रोजी न्यूयॉर्क हून ही मोहीम चालू झाली. ९ जुलै पर्यंत सर्व गिर्यारोहक दिल्लीत जमा झाले. भारतीय वर्तमान पत्रात या मोहिमेबद्दल नंदादेवी मुळे खूप कुतूहल होते.तिने दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणते ' मला लहानपणापासूनच नंदादेवी पर्वता विषयी खूप जवळीक वाटते.माझ्या रोमरोमात तो पर्वत भरला आहे.माझ्या वडिलांप्रमाणे माझी पण नंदादेवी शिखरावर जाण्याची इच्छा आहे.' विली अन्सोल्ड त्यावेळेस ४०-५० वर्षाचा होता.त्या वयात नंदादेवी चढणे त्याला कठिण होते. उत्तर भारतातली गर्मी सोसत ही मंडळी जोशीमठ येथे पोहोचली.जोशीमठ पासून लाटा पर्यंत ट्रक जाऊ शकत होती. त्या पुढिल खडतर प्रवास पायीच करावयाचा होता.येथील अन्न पाण्याची सवय नसल्याने कित्येकांना पोटाचे विकार चालू झाले होते.लाटाहून लाटा खराक ह्या१२००० फूटावरील जागेत ते पहील्या दिवशी पोहोचले.तूफान पाऊस व कठीण चढण,यांच्याशी सामना करावा लागत होता.१६ जुलैला धनरासी खिंडीतून ते १६०००,फुटावर पोहोचले.प्रवास अत्यंत खडतर होता.खाली काही हजार फूट खोलीवर रिशी नदी वाहत होती.वरून पाऊस व उंचावरून घसरत येणाऱ्या दगडांची बरसात होत होती.वाटेत नंदादेवीला पण चालण्याचा त्रास होऊ लागला.दिल्लीला सामान पेटारात भरून,ते अवजड पेटारे उचलण्याच्या प्रयत्नात तिला हार्नीया झाला होता व आता कठीण वाट चढण्याचा आणखीन ताण पडत होता.तिला जड सामान उचलण्यास मना केले गेले.अशा रीतीने सर्व जण १३,५०० फुटावरील बेस कॅम्प वर पोहोचले.दिल्लीहून ५जुलैला निघालेली ही मंडळी १७जुलैला बेस कॅम्प वर पोहोचली.समोर जवळ जवळ १२०००फुटाचा उभा डोंगर दिसत होता.भव्य आणि नयनमनोहर असा नंदादेवी पर्वत प्रिय नंदादेवी प्रथमच पहात होती.२९ ऑगस्ट १९३६ साली नंदादेवी प्रथम सर झाला होता.त्या वेळचे ते जगातील सर्वांत उंच पादाक्रांत झालेले शिखर होते.१४ वर्षानंतर त्यापेक्षाही उंच अन्नपूर्णा शिखर चढण्यास यश मिळाले.असा समज आहे की,चीनवर लक्ष ठेवण्यासाठी अणूशक्तीवर चालणारे राडार,नंदादेवी शिखरावर ठेवण्याचा प्रयत्न झाला होता,व ते यंत्र दरीत पडून तो प्रयत्न फसला. त्यामूळे त्या भागात जाण्यास आता संपूर्ण बंदी आहे.नंदादेवी त्या पर्वताच्या प्रेमात बघताच क्षणी पडली.पण ती आणखी एकाच्या प्रेमात पडली होती.त्याचे नाव अँडी हार्वर्ड.
ही एक प्रेम कथा आहे.एका सोनेरी केसांच्या ,निळ्या डोळ्यांच्या,रूपवतीची.प्रिय नंदादेवीची. लैला मजनू,हीर रांजा,रोमीयो ज्युलियट,यांच्या तोडीची.अँडी हा २७ वर्षांचा, कायद्याचा विद्यार्थी.बर्यापैकी गिर्यारोहक. कुठे जमले असेल हे प्रेम?कधी डोळ्याना डोळे भिडले असतील?कशी ही दोन मने जुळली असतील?जिथे गवताची पात सुद्धा उगवत नाही,तेथे हे प्रेमाचे फुल कसे उमलले असेल?जिथे बर्फाने सुद्धा थिजावे अशा वातावरणात ही प्रेमाची शेकोटी कशी बरी पेटली असेल?कदाचित एखादी अवघड चढण चढताना थकलेल्या नंदादेवीला आधार म्हणून अँडीने आपला हात पुढे केला असेल आणि त्या स्पर्शातून ती ठिणगी उडाली असेल?
अत्यंत कठीण परिस्थितीत अवघड चढणी चढत त्या गिर्यारोहकांनी १७,१०० फुटावर ॲडव्हान्स बेस कॅम्प उभारला.सतत बर्फाचे कडे कोसळत होते.तुफान वेगाने वारा वाहत होता.वार्याने तंबू उडून जाऊ नयेत म्हणुन त्यावर बसून रहावे लागे.थंडी तर शरीर गारठून जाण्याइतकी. नंदादेवी सगळ्यांच्या बरोबरीने पर्वतावर चढाई करत होती,मृत्यूला आव्हान देत होती.२ ऑगस्टला नंदादेवी सकट सर्व जण १९००० फूटावरील पहिल्या कॅम्पला पोहोचले.नंदादेवीला अजून एव्हढ्या उंचीची सवय झाली नव्हती.हिमालयातील अती उंच पर्वतावर चढतांना, बर्फावरून घसरून पडणे,वादळी वार्यात अडकणे,हिम वादळात सापडणे,बर्फ कोसळून त्याखाली दाबले जाणे,अशा अनेक संकटांबरोबर येणारे एक जीव घेणे संकट म्हणजे पर्वतावरील आजार.ह्यात, पोटात मळमळणे ,डोके दुखणे,अशक्तपणा येणे,शरीराची हालचाल मंद होणे,यांपासून ते भ्रम होणे,छातीत पाणीहोणे,मेंदूत पाणी होणे,आंधळे होणे व शेवटी मृत्यू,असे आजार होतात.त्यावर एकच ऊपाय म्हणजे अतिउंचीवरून कमी ऊंचीवरील जागेत येणे.हा आजार कोणाला कधी होईल हे सांगता येत नाही. नेपाळमधील अतिउंचीवर राहणारे शेर्पा २८००० फुटावर, ऑक्सिजन शिवाय पाठीवर सामान घेऊन जातात. तर नंदादेवी मोहिमेत, सुरवातीला मार्टी नावाच्या स्त्रीला १४००० फुटांवरून हेलीकॉप्टरने परत पाठवावे लागले होते. ११ऑगस्टला राखी पौर्णिमा असावी.सामान वाहून नेणाऱ्या हमालांची नंदादेवी लाडकी होती. सर्वांनी तिच्या कडुन राखी बांधून घेतली.भारतीय इतिहासातील एव्हढ्या उंचीवरील हे एकमेव राखी बंधन असावे.ह्याच सुमारास अँडीने नंदादेवीला मागणी घातली व तिने हो म्हटले.एवढ्या उंचीवरील वाड़निश्चयाचा हा उच्चांक असावा. आता कॅम्प दोन बांधण्याचा प्रयत्न सुरू होता.कठीण चढण,वादळी वारे,हिमवादळे ,हिमपात व जीवघेणी थंडी यांनी नंदादेवीची दमछाक होत होती.कॅम्प दोन १९,९०७ फुटावर वसवण्यात येत होता.नंदादेवीला सारखा खोकला येत होता ,त्यामुळे तिने १९००० फुटांवरून १७००० फुटावरील अडव्हान्स बेस कॅम्प ला येण्याचे ठरवीले.११ ऑगस्ट ला हिमवादळसुरू झाले.२० ऑगस्ट पर्यंत सर्व जण कॅम्प मध्ये अडकून पडले होते.सूर्य २० ता.ढगा आडून बाहेर आला व मोहीम परत सुरू झाली.त्याचदिवशी कॅम्प २ बसवीला गेला. दुसर्या दिवशी कॅम्प तीन,२२,३००. फुटावर वसवीला. नंदादेवी व ईतर खालील उंचीवरून परत वर चढवायला लागले होते.२३०००व२४००० फूटांमध्ये एक उभा कडा होता.तो सर करणे अत्यंत आवश्यक होते.कडा चढून चौथा कॅम्प बसवण्यास एक सप्टेंबर चा दिवस उजाडला.दुसर्याच दिवशी २४००० वरील कॅम्प ४ वरून,२५,६४५.फूटावरील नंदादेवी शिखर गाठण्यात आले. रात्री ही बातमी नंदादेवीला रेडिओवर कळविण्यात आली.तिचा तर अगदी ऊर भरुन आला.तिची वर्षोवर्षांची महत्त्वाकांक्षा पुरी होण्याची वेळ आली होती.पहिल्या टीम पाठोपाठ,अँडी,पिटर व नंदादेवीची टीम शिखर सर करणार होती.जीम व जॉन ची पहीली टीम खाली येण्यास निघून, कॅम्प ३ वर ही जोडी पोहोचली होती. परन्तू नंदादेवीच्या टीमने अजून वर चढण्यास सुरवात सुद्धा केली नव्हती. अशा मोहिमेत टीमच्या हालचाली वेळापत्रकानुसार ठेवाव्या लागतात. कारण तंबूत जागा मर्यादित असते,त्याचप्रमाणे अन्नपुरवठा सुद्धा मर्यादित असतो नंदादेवीला बरे वाटत नसल्याने, जॉन ने तिला आणखी वर न जाण्याचा सल्ला दिला होता पण त्याचे कुणीच ऐकले नाही.नंदादेवी तर संतापलीच.तिचे वर्षोवर्षांचे मनसुबे धुळीस मिळाले असते.जॉनने तिच्या वडीलांना,विलीला पण समजावून सांगीतले. परन्तु त्याने सुद्धा हात वर केले.३ सप्टेंबर ला अँडी,पिटर,व नंदादेवी कॅम्प ४ ला जाण्यास निघाले.नंदादेवीला हार्नियाचा त्रास वाढलाहोता. सायंकाळी६ वाजेपर्यंत सुद्धा ती कॅम्प ४ वर पोहोचली नव्हती.रात्री ११ वाजता अँडी एकटाच कॅम्प ४ वर पोहोचला.विली कॅम्प ३ वर होता.त्याने तिथून नंदादेवीला हाका मारल्या.वडिलांच्या हाकेला तिने उत्तर सुद्धा दिले. रात्री १२ वाजता अँडी परत खाली आला.३० फूट खाली नंदादेवी त्या कठिण कड्यावर अडकून पडली होती व मदती करता हाका मारीत होती.तिच्या हाका १९००० फुटावरील कॅम्प ३.वर ऐकू आल्या परन्तु अँडी व पीटरला समजल्या नाहीत.रात्री २ वाजता नंदादेवीला कॅम्प ४ वरील तंबूत आणण्यात आले.४ सप्टेंबर ला कॅम्प ४ वरील सर्वजण दमल्यामुळे त्यांनी विश्रांती घ्यावयाची ठरविली. ५ सप्टेंबर ला पीटर ,अँडी,आणि नंदादेवी ने कपडे करून शिखरावर जाण्याचे ठरविले.परन्तू नंदादेवी खूप अशक्त झाली होती.तिच्या हालचाली मंदावल्या होत्या व हगवण पण चालू झाली होती.उंच पर्वतावर शरीराचे निर्जलीकरण खूप धोकादायक असते.थंड हवा असली तरी शुष्क वातावरणामुळे शरीरातून पाणी अतिप्रमाणात गळण्यची प्रक्रीया चालू असते. हगवणी मुळे पाणी गळण्याचे प्रमाण वाढते.अँडीने नंदादेवी बरोबर राहण्याचे ठरवीले.पीटर एकटाच पुढे निघाला,पण फार वर जाऊ शकला नाही.हवा खराब झाली होती.बर्फ पडण्यास सुरुवात झाली होती.नंदादेवी ने २४००० फुटावर तिसरी रात्र काढली.हिमालयात उंचीवर जास्त वेळ राहणे सुद्धा धोकादायक असते.६ सप्टेंबर चा दिवस उजाडला.नंदादेवी आता ना वर जाऊ शकत होती,ना खाली उतरू शकत होती.अँडी सतत तिच्या सोबतीला रहात होता.तो तीला सोडून एकटा शिखरावर जाण्यास तयार नव्हता.नंदादेवी मोहीम संपल्यावर दोघांनी लग्न करण्याचे ठरवीले.त्याने नंदादेवीला सांगीतले की तिच्या पुढे त्याला नंदादेवी पर्वताची काहिही किंमत नव्हती.तो थंड पर्वत चढण्यापेक्षा तिला उब देण्यात त्याला जास्त आनंद होता.त्या दोघांना ,नंदादेवी सर करण्यापेक्षा,त्यांचे सहजीवन जास्त महत्वाचे होते.पीटर,वीली,व अँडीने ठरवीले की ७ ता.ला नंदादेवी शिखरावर जावयाचे आणि मग नंदादेवीला खाली उतरवायचे .पण७ ता.ला प्रचंड वादळ सुरू झाले व त्यामुळे कुणीही तंबूच्या बाहेर येऊ शकले नाही.नंदादेवीचे पोट दुखत होते व फुगू लागले होते.८. सप्टेंबर ला पण खराब हवामान होते.नंदादेवीची प्रकृती अधीकच बिघडली.तिला बसून बरे वाटत होते.पण मदतीशिवाय बसता येत नव्हते.सर्वांनी तिला त्या स्थितीतही खाली न्यावयाचे ठरविले.नंदादेवी सारख्या अवघड पर्वतावर आजारी माणूस वाहून नेणे सोपे नसते.तिकडे अँब्यूलन्स नसते.आधार देणाऱ्यास पण धोका असतो.कधिही पाय घसरला तर कडेलोट होण्याचा संभव असतो.दुपारपर्यंत वादळ चालूच होते.नंदादेवी आता नीळी पडायला लागली होती.तिचे वडील बाहेर कपडे गोळा करण्यास गेले होते.नंदादेवी काहितरी पिण्याचा प्रयत्न करीत होती.तिचे पोट प्रमाणाबाहेर दुखत होते.अकस्मात ती पांढरी पडली.ती पिटरला म्हणाली, ' माझी नाडी बघ,मला वाटतेय कि मी मरतेय ' तिला एक उलटी झाली आणि तिने मान टाकली.अँडीने तिला कृत्रिम श्वासोश्वासदेण्याचा प्रयत्न केला पण,काहीही उपयोग झाला नाही. विलीने चालू केलेल्या यज्ञाची पूर्णाहुती झाली.
उंच पर्वतावर मोहीम करणार्यांत एक प्रथा आहे.जो जीवंत असतो त्याच्या जिवाला जास्त महत्व असते.जो मेला तो गेला. नंदादेवीचे पार्थिव शरीर त्या अवघड जागेतून परत खाली आणण्याचा धोका पत्करण्या पेक्षा तिला नंदादेवी पर्वतालाच अर्पण करण्याचे तिच्या वडिलांनी ठरवीले. तिच्या झोपण्याच्या पिशवीत गुंडाळून एका उंच कड्यावरून तिला, नंदादेवीच्या ताब्यात देण्यात आले.तिची एक चिरंतर समाधी तयार झाली.जसे सितामाईला धरतीने आपल्या पोटात घेतले तसेच आपल्या प्रिय नंदादेवीला नंदादेवी पर्वताने आपल्या कुशीत घेतले.असे अघटित का घडले? १९९६ सालच्या मे महिन्यात एव्हरेस्ट वर २४० गिर्यारोहक गेले होते.त्यातील कित्येकजण पर्यटकच होते.त्यावेळी त्यातील एका स्त्री पुरूषाचा एव्हरेस्टवर शारीरिक संबंध आला होता.याबद्दल तेथील शेर्पा हमालांनी तक्रार केली होती.शेर्पांच्या समजूती नुसार अशा उंच पर्वतावर देवांचे वास्तव्य असते व अशा प्रकारचे अश्लील चाळे केल्याने तेथील वातावरण अपवित्र होते आणि देवांचा कोप होतो.मे १९९६ च्या मोहीमेत एका रात्रीत ९ गिर्यारोहक मरण पावले व एकंदर १२ जणांना मृत्यू आला.गिर्यारोहणाच्या इतिहासातील ही सर्वात भयंकर घटना समजली जाते.परन्तु एव्हरेस्टवर वासना होती.नंदादेवीचे प्रेम होते.आणा भाका झाल्या होत्या.उद्याची स्वप्ने पाहीली गेली होती. मग देवांनी तिला क्षमा का केली नाही?देवांनाच माहीती.
अशारितीने ही प्रेमकहाणी संपली.जिथे सुरू झाली तिथेच. नंदादेवी नावाच्या पर्वतावर.
समाप्त
नमस्कार मंडळी... कवडसे पश्चिमप्रभेचे या पुस्तकातील एक लेख ऐकू या हं आज...
शीर्षक आहे... उजळी विवेकदीप...
And If I pray,the only prayer
That moves my lips for me
Is..Leave the heart that now I bear
And give me Liberty
एमिली ब्रांटे नावाच्या कवयित्रीच्या या ओळी आहेत.... त्यात तिनं एक प्रार्थना केलेली आहे...
प्रार्थना करायची... कशाकशासाठी? आणि कुणाकुणाकडे..? खरी प्रार्थना असते शब्दातीत पण अर्थपूर्ण....आणि ती करायची असते ईश्वराकडे कारण ताकद देणारा तो एकमेव.....!! पुन्हा पुन्हा त्याच्याकडेच जायचे.. त्यांनी काही दिले नाही तरीही.... कारण आशा असते ती फक्त त्याच्याच बाबतीत....मर्त्य मानवाकडून अपेक्षा करण्यात फारसा अर्थ नसतो.... म्हणून कवयित्री म्हणतेय की....," मी प्रार्थना केली तर.. हीच एक प्रार्थना माझ्या मुखातून बाहेर पडेल..
सहन करून थकलेले हे हृदय देवा
तू परत घे आणि त्याऐवजी मला स्वातंत्र्य दे
स्वातंत्र्य म्हणजे तरी काय हो??.. दुःखापासून मुक्ती की.. आनंदापासूनही?? अशी मुक्ती नेमक्या कोणत्या भावना आपल्या मनात निर्माण करते...??
जनसामान्य देवाची प्रार्थना कशासाठी करतात...?? कीर्ती...पैसा.. मानमरातब.. मुलांची प्रगती.. भौतिक ऐश्वर्य.. ही सारी झालीआपली उदाहरणे... पण कवयित्रीची विचारांची दिशाच वेगळी आहे.....
स्वातंत्र्याचा अर्थ काय काढतो हो आपण...?? भौतिक.. मानसिक.. वैचारिक...की आत्मिक...?? नक्की कोणत्या प्रकारचे स्वातंत्र्य अपेक्षित असते आपल्याला...??
कवयित्रीचे मन एका वेगळ्या स्वातंत्र्याचा विचार करते आहे... ते भौतिकतेत अडकलेले नाही.. धनदौलत.. कीर्ती.. मानसन्मान.. याची तिला आकांक्षा नाही... तिला हवे आहे मुक्त मन...!! आपले मन भौतिकतेच्या शृंखलांनी बद्ध असते ...त्याच त्या परिघात फिरत राहते आणि त्याच त्या गोष्टींची मागणी करत राहते... कवयित्रीला हे अजिबात मान्य नाही... तिच्या मनातील स्वातंत्र्याचा अर्थ वेगळा आहे.. तसे स्वातंत्र्य आपल्याला मानवेल का हो ...?? नाही सांगू शकणार आपण...
आपल्याला स्वातंत्र्य म्हणजे कसेही वागण्याचा परवाना असे वाटते.. पण स्वातंत्र्य म्हणजे अधिक जबाबदारी.. स्वातंत्र्य म्हणजे स्वयंशिस्त.. स्वातंत्र्य म्हणजे मनाला सकारात्मक मार्गावर नेणारी विचारधारा... स्वातंत्र्य म्हणजेच स्वैराचार नव्हे... आणि स्वैराचार हा केवळ लौकिक जगातीलच असतो का हो..?? असा स्वैराचार तर आपल्या मनात देखील चालू असतो.. मोह, क्रोध ,निराशा याची शिकार झालेले मन भरकटते अकरणात्मक मार्गावर कधी जाऊन पोहोचते कळत नाही.... अशावेळी मनाला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागते....तुका म्हणे मना पाहिजे अंकुश,नित्य नवा दिस जागृतीचा असे पुन्हा पुन्हा मनाला सांगावे लागते...कवयित्री प्रार्थना करते अशा स्वातंत्र्यासाठी.... लौकिक जगातील विकारांच्या कैदेत बद्ध झालेले मन अडखळते. ठेचकाळते... गतीभ्रष्ट आणि दिशाहीन होते... त्याची गती अवरुद्ध होते.आत्मभान फिकूटते. त्याची कृतीप्रवणता झाकोळते... म्हणून स्वातंत्र्य असे हवे... जे मनाला जाणिवेचा प्रकाश दाखवेल आणि चिरकालीन सत्त्याचा प्रत्यय देत राहील....
माऊली म्हणतात तसं
मी अविवेकाची काजळी
फेडून विवेकदीप उजळी
तै योगीया पाहे दिवाळी
निरंतर!!
सध्या इतकंच....
नमस्कार मंडळी, ओळख कुंडलीशी या लेख माले अंतर्गत या लेखात आपण कुंडलीतील सप्तम स्थान आणि त्यावरून आपल्या आयुष्यातील कोणकोणत्या गोष्टी दर्शविल्या जातात, तसेच सातवी राशी, तिचा थोडक्यात स्वभाव, तसेच शुक्रानंतर येणारा ग्रह शनी आणि त्याचा स्वभाव उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. मागच्या लेखात आपण कुंडलीतील षष्ठ स्थानाबद्दल माहिती घेतली. आता आपण कुंडलीतील सप्तम स्थानाबद्दल माहिती घेणार आहोत.
7)सप्तम स्थान: (जोडीदाराचे स्थान, विवाहाचे स्थान):
यात्रापुत्रकलत्र सौख्यमखिलं संचिन्तयेत सप्तमात।
या स्थानाचा संबंध
जोडीदाराशी आहे. Life partner तसेच Business Parthership साठी पण हे स्थान पहातात. जोडीदाराचे स्थान असल्यामुळे जोडीदार कसा असेल? लग्न कधी होईल ? कसे होईल? तसेच लग्नात काही अडचणी येणार असतील, तर तेही या स्थानावरून कळते. घटस्फोट, वैधव्य या सारखे योग असल्यास, तसेच काही affairs वगैरे असल्यास, ती कशी, कीती, हे पण या स्थानावरून कळते. थोडक्यात माणसाचे character कसे असेल हे सप्तम स्थान ठरवत असते. या स्थानावरून माणसाचा अधिकार योग ही सांगता येतो. पण त्यासाठी सप्तम स्थानाबरोबर दशम स्थानाचाही विचार करावा लागतो. या स्थानाचा उल्लेख मारक स्थान असेही करतात. पूर्वीच्या काळी असं मानलं जायचं की व्यक्तीचा ऱ्हास हा पैसा किंवा स्त्री यांच्या मागे लागल्यामुळे होतो त्यामुळे धनस्थान आणि सप्तम स्थान या दोन्ही स्थानांना या शास्त्रामध्ये मारक स्थान म्हटलं गेलेल आहे.
काही ठिकाणी ज्योतिष शास्त्रामध्ये या स्थानाचा उल्लेख हा यात्रा स्थान असाही केला गेलेला आढळतो. लहान प्रवास या स्थानावरून पाहतात.
आता आपण १२ राशींमधील सातवी तुळ रास पाहूया.
7) तुळ रास: वायुतत्वाची रास आहे. symbol balance आहे. सप्तम स्थानाची द्योतक आहे. शुद्ध प्रेमाची रास आहे. न्यायप्रिय रास आहे. स्वामी शुक्र आहे. कलेची आवड असते. सौंदर्य असते. वेगवेगळ्या विषयात रस घेणारी रास आहे. मिथुन प्रमाणे वरवरच्या नाही तर सखोल अभ्यासाची आवड असणारी रास आहे. पुरुष तत्वाची रास आणि स्वामी शुक्र यामुळे या राशीला कौटुंबिक प्रेमाची ओढ आहे. कुटुंब वत्सल रास आहे. पण वाहवत जाणारी रास नाही. तुळ राशीची स्त्री उत्तम माता होऊ शकते. निरूपद्रवी व सौम्य वाटणारी रास आहे. परंतु कीतीही कठीण प्रसंगातही न डगमगता उत्तम मार्ग काढणारी व कठीण परीस्थितीला तोंड देणारी रास आहे. दुसऱ्यांचे अश्रू पुसणारी रास आहे. पण पांघरूण घालणारी नाही. म्हणजेच यांच्या कडे Empathy आहे. Sympathy नाही.
ग्रहण शक्ती (Grasping power) उत्तम असते. Absorbing capacity खूप असते. General knowlage खूप असते. कोणत्याही प्रॉब्लेम वर Solutions उत्तम काढू शकतात. त्यामूळेच उत्तम सल्लागार असतात. शनी या राशीत उच्चीचा होतो.
याचा राशीस्वामी शुक्र आहे. कौटुंबिक जिव्हाळा जरी असला तरी detachment पण पटकन होते. हे लोक सगळ्यांच्यात असून नसल्यासारखे असतात. या लोकांमध्ये कामाची capacity पण खूप आहे आणि आळशीपणा पण खूप आहे. स्वतंत्र वृत्ती असल्याने सहसा कुणाच्या under काम करत नाहीत. सौंदर्य आहे. डोळे व केस विशेष चांगले असतात. हसणे मोहक आहे. हसण्यामुळे चेहरा उजळून निघतो.
या राशीचा अंमल Excretory organs वर तसेच reproductive organs वर असतो त्यामूळे Gynac problems कींवा urin infection वगैरे सारखे problems दिसतात.
या लेखातील पुढील भागात आपण शनी या ग्रहाबद्दल माहिती बघणार आहोत.
ग्रहांचे स्वभाव आणि ग्रहांचे कारकत्व.
7) शनी: ( मकर, कुंभ):
आयुष्यं मरणं भयं पतिततां दुःखावमानामयान्।
दारिद्र्यं भूतकापवादकलुषाशोचनिन्दयापदः।।
काटेकोर न्यायाचा ग्रह आहे. अत्यंत विचारी आहे. थोडा slow आहे. शनि प्रधान व्यक्ती पटकन react होत नाहीत. मंद ( गतीमंद) आणि विचारी ग्रह आहे. उत्तम Management, Administration, Planning, हे उच्च दर्जाचे असते. जबरदस्त Hard working आणि जबरदस्त Patience असे गुण असतात. टोकाचे कष्ट घेण्याची तयारी असते. हातात कधीही शस्त्र न घेणारा आहे. थोडासा निराशावादी, मागे-मागे राहण्याची वृत्ती असते. मोकळेपणा बिलकूल नाही. मनातल्या मनात कुढत बसण्याची वृत्ती आहे. आणि म्हणूनच सहनशक्ती खूप आहे. निर्णय क्षमता उत्तम असते. सहसा या व्यक्तिंकडून चूक होत नाही. सामान्य माणसे चार गोष्टींचा विचार करून निर्णय घेत असतील, तर शनि दहा गोष्टींचा विचार करून निर्णय घेईल. न्याय क्षमता इतकी काटेकोर असते, की स्वतःची चूक असेल तर स्वतःलाही शिक्षा करून घेतात. वर्षानुवर्षे, तेच काम करत राहून त्यात प्राविण्य मिळवणे हा शनिचा गुण आहे. त्यामुळे Phd सारख्या अभ्यासाला शनिचा हा गुण उपयुक्त ठरतो. दहा बाजूने विचार करत असल्याने, उत्तम दूरदृष्टी व सखोल अभ्यास आहे. उत्तम Planning असल्याने negative गोष्टींना आधीच overcome केलेले असते. त्यामुळे कितीही मोठी गोष्ट उत्तमपणे पार पाडण्याची क्षमता शनिकडे असते.
मोठे घाऊक प्रमाणातील व्यवहार शनिच्या कारकत्वात येतात. Law पण शनिच्याच कारकत्वात येतो.
स्वरूप :-
काळा सावळा रंग, उंच, हाडे व शिरा दिसतील असा बांधा, गाल आत गेलेले, त्रिकोणी चेहराअसतो. हा वृद्ध ग्रह आहे. Neutral कींवा नपुंसक ग्रह म्हंटले आहे. ऐहीक गोष्टींच्या बाबतीत थोडासा उदासिन ग्रह आहे. शनिप्रधान व्यक्ति नेहमीच आपल्या वयापेक्षा मोठ्या दिसतात. शनिच्या कारकत्वातले आजार दीर्घमुदतीचे असतात, पण त्यात जीव गमावण्याची भिती नसते.
शनि हा मृत्यूचा कारक ग्रह आहे. तो दीर्घायुष्य देतो म्हणजे कदाचित दीर्घायुष्याचा शाप म्हंटले तरी चालेल इतके आयुष्य मिळते. गुरुप्रमाणेच विचारी, ज्ञानी ग्रह आहे. कदाचित गुरु पेक्षाही जास्त ज्ञान असेल, पण ते स्वतःहून वाटणारा ग्रह नाही.
क्रमशः
मंडळी,
आपल्या आयुष्याचा प्रवास हा चंद्राच्या कलेप्रमाणे असतो, तो वाढत वाढत जातो पूर्ण तेजाळतो आणि पुन्हा नंतर कमी कमी होत जातो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात त्या त्या अवस्थेनुसार आपली मानसिकता बदलणे गरजेचे असते, आणि विशेष करून नंतरच्या टप्प्यात जिथे आपली क्षमता, आपला influence कमी कमी होत जातो.
या काळात स्वतःच्या स्वतःकडून अपेक्षा बदलणे गरजेचे असते आणि त्या नाही बदलल्या तर मात्र बऱ्यापैकी दुःखी आयुष्य वाट्याला येते. मला स्वतःकडून काय पाहिजे हा महत्त्वाचा प्रश्न, आणि त्याचे उत्तर आपले वय, आपली क्षमता आणि आसपासची परिस्थिती यांना अनुसरून दिले तर हा प्रवास निश्चितच सुखाचा होऊ शकतो.
दोनशे वर्षांपूर्वी पर्यन्त शासन व्यवस्था म्हणजे राजेशाही. वंश परंपरेने शासक(नेता) मिळत असे. सामाजिक संस्था फार कमी होत्या. आधुनिक काळात शासनाची कामे खूप वाढली आहेत. अनेक विषयात मोठी प्रगती झाली आहे. लोकशाहीतत्वावर अनेक संस्था उभ्या राहिल्या आहेत. त्यातील नेतृत्व हे नियुक्ती (Appointment), नामनिर्देशन (Nomination) आणि निवडणूक (election) अश्या विविध पद्धतीने केले जाते. एखाद्या व्यक्तीचे नाव सुचविताना कोणते निकष पाहिले जातात, पाहिले पाहिजेत?
काही वर्षांपूर्वी फील्ड मार्शल सॅम माणेकशा यांचे याच विषयावर व्याख्यान झाले होते. त्यांनी विषयाचे सखोल ज्ञान यास प्रथम क्रमांक दिला होता. नंतर निर्णयक्षमता, निष्पक्षता, नीतीमत्ता, निष्ठा, शिस्त, वक्तशीरपणा असे अन्य गुण सांगितले होते.
ज्या संस्थेचे नेतृत्व करायचे आहे ती संस्था काय काम करते त्या विषयाचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक गुण आहे या बद्दल दुमत असायचे कारण नाही. ज्ञान मिळविण्यासाठी कोणाला किती वेळ लागेल हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. काहीजण उपजत बुद्धिमान असतात. काही जण मेहनती असतात. काहीना संधि लवकर मिळते. काहीजण उत्साहाने शिकतात, सातत्याने अभ्यास करतात. काही अनुभवाने शिकतात. यापैकी कोणत्याही मार्गाने ज्ञानवंत झालेली व्यक्ति नेतृत्वास जास्त लायक समजावी.
अनेक वकील मी पहिले आहेत की २०/२० वर्षे प्रॅक्टिस करुनही कायद्याचे प्राथमिक ज्ञानही नसते. तर काही जण २/३ वर्षातच प्रगल्भ झालेले असतात. कमी अधिक प्रमाणात असा अनुभव प्रत्येक क्षेत्रात येतो.
उपरोक्त निकषात मी आणखी एकाची वाढ करीन, “इच्छाशक्ति”
सर्व गुण आहेत पण राजकारणाची भीती वा अन्य कारणाने नेतृत्व करण्याची इच्छाच नसते. त्याला केवळ विषयाचे ज्ञान चांगले आहे म्हणून निर्देशित करणे योग्य होणार नाही. अंतिमत: नुकसान संस्थेचे होईल. रोटरीचा विचार करता असे दिसते की अनेक सभासद अनेक वर्षे काठावर बसून असतात. तर काही जण सभासद होताच हिरीरीने विविध उपक्रमात भाग घेतात. त्यांच्या त्यांच्या व्यवसायात ते अग्रणी असतात म्हणून तर त्यांना आमंत्रित करण्यात येते. त्यामुळे बहुतेकांना संस्थात्मक अनुभव असतो. अश्या सभासदास संस्थेतील अनुभव कमी असला तरी अध्यक्ष म्हणून निवडणे जास्त योग्य ठरते.
नुकतेच रोटरी इंटरनॅशनलचे डायरेक्टर झालेले रो. महेश कोडबागी हे वयाच्या ३३ व्या वर्षी क्लबचे अध्यक्ष झाले होते. उपजत नेतृत्वगुण (born to lead) असलेले पीडिजी अरुण कुदळे ४१ व्या वर्षी अध्यक्ष झाले. त्यामुळेच त्यांना पुढील पदे भूषविता आली. पुढील संधीचा विचार करता तरुण रक्तास प्रोत्साहन दिले पाहिजे.
नुकतीच क्लबच्या बोर्डाची निवडणूक प्रक्रिया झाली. त्या निमित्ताने लिहावेसे वाटले.
दर वर्षी सिंधुदुर्ग मधे स्टेट लेव्हल जलतरण स्पर्धा आयोजित केली जाते. चिवळा बीच येथील समुद्रा मधे 500m, 1Km, 2Km, 3Km व 5Km अश्या विविध वयगटातील लोकांची खुली स्पर्धा घेतली जाते.
गेली कित्येक वर्षे मी स्विमिंग पूल मधे स्विमिंग करत आहे परंतू आतापर्यंत समुद्रात पोहणे झाले नव्हते. एकदा करून बघायचे होतेच त्यामुळे ही संधी साधून आम्ही दोघांनी म्हणजे मी, सुदर्शन नातू व पैलवान श्री बबन काशीद दोघांनी 2 किमी ह्या गटात (वय 55 आणि पुढील) व केतन कुलकर्णी ह्याने 3 किमी (36-45) ह्या गटात प्रवेश घेतला होता. चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, बुलढाणा, अहमदनगर, औरंगाबाद, बेळगाव, सोलापूर, सांगली, ठाणे, पुणे, मुंबई अश्या विविध ठिकाणची लहान मुले, मुली, बायका, माणसे सहभागी झाली होती. पार गोवा, अमदाबाद (गुजरात), कलकत्ता येथील पण काही जण आली होती.
आज सकाळी म्हणजे 17 डिसेंबरला 2 किमी ची स्पर्धा झाली. आमच्या गटात जवळजवळ 45 जण होते. सुरवातीच्या बाबी पूर्ण झाल्यावर आम्हाला बोटीने 2 किमी स्टार्ट पॉइंट वर नेले आम्ही सर्वजण भारत माता की जय, वंदे मातरम् अश्या घोषणा देत होतो त्यामूळे वातावरण पण जोषपूर्ण होते. सुरवातीला खाली मोठ्या जेली फिश पाहून आमची धडकी भरली पण स्पीड बोटीने त्यांना दूर करण्यात आले. 2 किमी अंतरावर किनारा असल्याने काहीही दिसत नव्हते त्यामुळे फिनिष लाईन गाठायची म्हणजे मोठीच कसरत होती.
अंदाजे 8.20 मिनिटांनी आमदार श्री निलेश राणे ह्यांनी फ्लॅग ऑफ केला आणि आम्ही बोटीतून उड्या मारल्या! उडी घेतल्यावर काही क्षण अंदाज घेण्यात गेला तो पर्यंत एक्स्पर्ट मंडळी पुढे गेली. मला वाटले की समुद्रात पोहणे सोपे असेल पण काही वेळातच लक्षात आले की आपली कसोटी लागणार! फ्री स्टाईल ने सुरवात केली पण मधे मधे ब्रेस्ट स्ट्रोक पोहत किनाऱ्याच्या अंदाज घेण्यात वेळ जात होता. थोडे दमायला होत होते. एकदा असेही वाटले की लाईफ गार्ड ला हात करून बाहेर यावे! पण मग एव्हढा अट्टाहास कशासाठी केला होता? सर्धा पूर्ण करायचीच अशी जिद्द बांधली आणि आणि हात मारायला सुरुवात केली. जसा जसा अंदाज येवू लागला तसा विश्वास पण वाढला आणि मग मात्र फ्री स्टाईल मारत निघालो. एकदाचा किनारा आणि फ्लॅग दिसू लागला आणि मग जोर पण वाढला. काही वेळातच पोहचलो आणि मग चालत जाऊन रिपोर्ट केले आणि माझी कॅप सबमिट केली. फिनिश बोर्डवर जाऊन स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल मेडल मिळालं! तो क्षण खरच आनंदाचा होता. त्याचा अनुभव वेगळाच होता आणि शब्दात मांडणं कठीण आहे. आता काशीद सरांची वाट पाहू लागलो. मला तर वाटले की ते आधीच आले असणार पण ते माझ्या थोडेच मागे ते होते. त्यांच्या खास बॅक स्ट्रोक स्टाईल व फ्री स्टाईल ने आले! त्यांनी पण कॅप सबमिट केली आणि बोर्ड वर जाऊन मेडल घेतलं. मग आम्ही दोघांनी एक छान फोटो पण काढला.
केतन चा इव्हेंट 18 ला असल्याने त्याने आमचे फोटो, व्हिडिओ काढले आणि महत्वाचे म्हणजे कपडे पण सांभाळले!
आता उद्या सकाळी केतन चा 3 किमी इव्हेंट पूर्ण होईल मग परत. त्याची तयारी छान आहे आणि तो तर फारच लवकर पूर्ण करील. आता त्याचे फोटो आणि व्हिडिओ आम्ही काढणार. आमचा मुक्काम 'मालवणी डेज' ह्या छोट्या पण टुमदार कॉटेज मधे होता.
एकदा तरी समुद्रात पोहायचे! ही आमची ईच्छा आज पुर्ण झाली आणि त्याची आनंदमयआठवण जन्मभर राहील.
आमच्या सौ. नी आम्हाला परवानगी दिली त्याकरिता त्यांचे पण कौतुक. आम्ही असले प्रयोग ह्या वयात करायचे म्हणजे कुटुंबाचा सहभाग व पाठिंबा हवाच. अहो त्यांना टेन्शन असणारच आणि आम्ही बेफिकीर!!!
आता समुद्र परत परत खुणावत राहणार ह्यात शंका नाही आणि मी पण त्याच्याकडे नक्कीच धाव घेणार!
ने मजसी ने परत परत त्या सागराच्या कुशी!
१० डिसेंबर २०२२
एड्स पेशंटसाठी धान्य वाटप
एड्स रिहॅबिटेशन कमिटीतर्फे १० डिसेंबर रोजी ग्राहक पेठ येथे संध्याकाळी ५ वाजता पेशंटसाठी धान्य वाटप कार्यक्रम करण्यात आला.
आपले प्रेसिडेंट रो.संजीव ओगले यांच्या हस्ते धान्य वितरण करण्यात आले.
- रो सुभाष चौथाई,
एड्स रेहाबिटेशन कमिटी
मित्र हो,
एड्स रीहाबिटेशन कमिटी तर्फे एड्स पेशंट ना महिन्याच्या प्रत्येक १० तारखेला १५ किलो धान्य वाटपाचा कार्यक्रम आपण करत असतो.गेली १५ वर्षे आपण हा उपक्रम राबवित आलो आहे.समाजातील अत्यंत गरीब आणि दुर्लक्षित असलेल्या साठी राबविण्यात आलेलया या उपक्रमास रोटरीतील अनेक सभासद मदत करीत असतात.त्यामुळेच आपण हे अत्यंत आवश्यक सामाजिक कार्य करत आलेलो आहे.आपले प्रेसिडेंट रो.संजीव ओगले,पी. पी. सोनल पटवर्धन आणि इतर अनेक सभासद यांनी आर्थिक मदत करून या कार्यक्रमास हातभार लावणार आहेत.
रो. मावळणकर,.रू10,000 /-, त्यांचे मित्र बोरकर रू.8000/-,रोटरी मिड टाऊन चे रो.पी.पी.संजय केसकर यांनी रू 2000/- ,रो.श्रीकांत चितळे यांनी दिवाळी फराळ वाटप अशी मदत या आधी केलेली आहे.
सध्याची प्रचंड वाहतूक,पेशंटना लागणारा प्रवास खर्च,जागेचा अभाव इत्यादी कारणामुळे कार्यक्रम ग्रllहक पेठ येथेच करावा लागत आहे.
आपणा सर्वांना विनंती आपण सर्वांनी धान्य वाटप कार्यक्रमास यावे व आपण करत असलेल्या सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हावे ही विनंती. आपली मादत रूपी देणगी रोटरी चारीटेबल ट्रस्ट या नावाने द्यावी.
-रोटरी एड्स कमिटी
मोतीबिंदू शस्त्रक्रिया
आक्काताई जानू भोसले,वय-७४, पत्ता- मु पो अंजनी तालुका तासगाव जिल्हा सांगली, ह्यांची आपल्या क्लबच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.
माझ्या आजीचे डाव्या डोळ्याचे मोतीबिंदू चे ऑपरेशन रोटरी क्लब पुणे व पाषाणकर सर यांच्या सहकार्याने ऑपरेशन चांगले झाले याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो.
पुतळाबाई नारायण पाटील. वय अवघे 85 वर्ष. पुण्यातील बिबवेवाडी येथे अष्टभुजा मंदिराशेजारील शिवतेज नगर मध्ये राहणाऱ्या पुतळाबाईंच्या उजव्या डोळ्याच्या जागी पाच वर्षांपूर्वी कृत्रिम डोळा बसविला होता. नुकतीच या कृत्रिम डोळ्याच्या आतल्या बाजूस जखम झाल्यामुळे त्यांना अतिशय त्रास व वेदना होत होत्या. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी डाॅक्टरांनी सांगितलेली रु. 42000 ही रक्कम भरणे शक्य नसलेल्या पुतळाबाईंना कोणीतरी सांगितलं की रोटरीतर्फे डोळ्याची शस्त्रक्रिया मोफत केली जाते.
ते ऐकून आशेचा किरण दिसलेल्या पुतळाबाई पत्ता शोधत आपले रो. दत्ता पाषाणकर यांच्याकडे पोचल्या. व्ही. बी. देसाई रुग्णालयाबरोबर आपण करत असलेल्या प्रकल्पात मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया होतात. ही वेगळी शस्त्रक्रिया त्यात कशी होणार? पण अशा अडचणींवर हार मानेल तर तो दत्ता पाषाणकर कसला ? त्याने रुग्णालयाला विनंती करून सगळी व्यवस्था केली आणि पुतळाबाईंची शस्त्रक्रिया चक्क मोफत करण्यात आली. या तपासणी दरम्यान त्यांच्या दुसर्या डोळ्यात मोतीबिंदू असल्याचे निदान करण्यात आले होते. आठवड्याभरात ती शस्त्रक्रियाही मोफत करण्यात आली. अशा रितीने नवी दृष्टी प्राप्त झालेल्या पुतळाबाईंनी रोटरीला मनापासून धन्यवाद, तर दत्ताला तोंड भरून आशिर्वाद दिले.
ही खरी रोटरी आणि हे खरं पुणे साऊथचं स्पिरिट ! रोटरीची प्रतिमा घडते ती अशा कामातूनच. धन्यवाद दत्ता, ज्या निष्ठेने तू या शस्त्रक्रियांचे काम करतोस त्याचा आम्हाला अभिमान आहे.
अभिनंदन रो. दत्ता पाषाणकर!
आंतर रोटरी क्लब एकांकिका स्पर्धेसाठी "निग्रह " टीमची तयारी आणि सेलेब्रेशन
लेखक आणि दिग्दर्शक: रो. योगेश नांदुरकर
नेपथ्य - ॲन अस्मिता आपटे
प्रकाश योजना - पी. पी. रो. सुदर्शन नातू
कलाकार-
रो. योगेश नांदुरकर , ॲन यामिनी पोंक्षे, रो. डॉ. संगीता देशपांडे, पी. पी. रो. सुदर्शन नातू , पी. पी. रो. अतुल अत्रे,ॲन अस्मिता आपटे, रो. मृदुला घोडके, ॲनेट संचिता वाळिंबे, ॲन सुनीता प्रभुणे
साहाय्य :
रो. कृष्णकिरण आणि स्वाती वेलणकर, रो. सुभाष आणि श्वेता करंदीकर,ॲन नेहा वाळिंबे, रो.जितेंद्र महाजन,रो. उल्का पासलकर, ॲनेट सिध्दराज नांदुरकर
१४ डिसेंबर २०२२
व्याख्यान : नैसर्गिक शेतीचे महत्व
१४ डिसेंबर रोजी, रोटेरिअन अभिजीत देशपांडे यांनी वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या आणि त्यांना समजेल अशा भाषेत नैसर्गिक शेतीचे महत्व समजावून सांगितले. मुलांचा कार्यक्रमातील सहभाग वाखाणण्यासारखा होता. रोटेरिअन अभिजीतच्या व्याख्यानाने मुलांना निश्चितच फायदा होईल.
२२ डिसेंबर २०२२
कीटकांचे विश्व
आज इको क्लब - वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय ला डॉक्टर राहुल मराठे यांनी कीटकांचे विश्व मुलांपुढे उलगडून दाखवले. मावा, तुडतुडे यांसारख्या कीटकांचे निसर्गातील महत्व मुलांबरोबर आम्हालाही नव्याने समजले. अतिशय उत्कृष्ठ असे हे आजचे व्याख्यान होते
२८ डिसेंबर २०२२
पेपरलेस व्यवहार - काळाची गरज
दिनांक २८ डिसेंबर रोजी, इको क्लब ह्या मीटिंग मध्ये सारस्वत बँकेतील अधिकाऱ्यांनी मुलांना बँकिंग चे धडे दिले. त्याच बरोबर डिजिटल बँकिंग चे महत्व आणि फायदे समजावून सांगितले. कार्यक्रमातील मुलांचा सहभाग, त्यांची बारकावे जाणून घेण्याची उत्सुकता यामुळे वक्त्यानाही हे मुलांना सांगताना वेगळा उत्साह वाटला.
पी पी रो.डॉक्टर राजेंद्र गोसावी यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम पार पडला.
१२ डिसेंबर २०२२
"कोकणातील काष्ठशिल्पे आणि मंदिर स्थापत्य" वक्ते - डॉ. नितीन हडप